YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 35

35
एदोमविरुद्ध भविष्यवाणी
1याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“मानवपुत्रा, सेईर पर्वताकडे मुख करून त्याच्याविरुद्ध भविष्यवाणी कर 3आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे सेईर पर्वता, मी तुझ्याविरुद्ध आहे आणि मी तुझ्याविरुद्ध माझा हात उगारेन आणि तुला ओसाड करेन. 4मी तुझी नगरे निष्फळ करेन आणि तू उजाड होशील. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
5“ ‘कारण तुझ्याठायी तू निरंतर वैर ठेवले आणि संकटाच्या काळी, जेव्हा त्यांच्या शिक्षाकाळ कळसाला जाऊन पोहोचला, तेव्हा तू इस्राएली लोकांवर तलवार चालविली, 6म्हणून सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, मी तुला रक्तपाताच्या स्वाधीन करेन आणि रक्तपात तुमचा पाठलाग करेल. कारण तू रक्तपाताचा द्वेष केला नाही, म्हणून रक्तपात तुझा पाठलाग करेल. 7मी सेईर पर्वताला ओसाड करेन आणि जे त्यावरून येणे जाणे करतात त्यांचा मी नाश करेन. 8वधलेल्यांनी मी तुमचे पर्वत भरून टाकीन; जे तलवारीने मारले जातील ते तुझ्या टेकड्यांवर आणि तुझ्या खोर्‍यात आणि तुझ्या ओहोळात पडतील. 9मी तुला कायमचे ओसाड करेन; तुझ्या नगरांत पुन्हा कोणीही वसणार नाही. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
10“ ‘कारण मी याहवेह तिथे होतो तरीही तुम्ही म्हटले, “हे दोन देश व राष्ट्रे आमची होतील आणि आम्ही त्याचे वतन पावू,” 11म्हणून सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, त्यांच्याप्रीत्यर्थ तुम्ही जो राग व हेवा प्रकट केला त्यानुसार मी तुमच्याशी वागेन आणि जेव्हा मी तुमचा न्याय करेन, तेव्हा मी स्वतःला त्यांच्यामध्ये प्रकट करेन. 12तेव्हा तुम्ही जाणाल मी याहवेहने त्या तिरस्करणीय गोष्टी ऐकल्या आहेत ज्या तुम्ही इस्राएलच्या पर्वतांविरुद्ध उच्चारल्या. तुम्ही म्हटले, “ते उजाड पडले आहेत आणि आम्ही गिळून टाकावे म्हणून त्यांना आमच्या हाती दिले आहे.” 13तुम्ही माझ्याविरुद्ध फुशारकी मारली आणि संयम न ठेवता माझ्याविरुद्ध बोलला आणि ते मी ऐकले. 14सार्वभौम याहवेह असे म्हणतात: सर्व पृथ्वी हर्ष करीत असताना मी तुम्हाला उजाड करेन. 15कारण जेव्हा इस्राएलचे वतन उजाड पडत होते तेव्हा तू हर्ष केला, त्याचप्रमाणे मी तुला वागवेन. हे सेईर पर्वता तू व संपूर्ण एदोम उजाड पडेल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 35: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन