YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 34

34
याहवेह इस्राएलचे मेंढपाळ होतील
1याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“मानवपुत्रा, इस्राएलच्या मेंढपाळांविरुद्ध भविष्यवाणी कर; भविष्यवाणी करून त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएलच्या मेंढपाळांनो तुम्हास धिक्कार असो! तुम्ही केवळ स्वतःविषयी काळजी करता, मेंढपाळांनी आपल्या कळपाची काळजी घेऊ नये काय? 3तुम्ही दही खाता, उत्तम मेंढरे कापून तुम्ही आपल्यावर लोकर पांघरता, परंतु तुम्ही आपल्या कळपाची काळजी घेत नाही. 4तुम्ही अशक्तांस सशक्त केले नाही, ना रोग्याला आरोग्य दिले ना जखमेला पट्टी केली. भटकलेल्यास तुम्ही परत आणले नाही किंवा हरवलेल्यास शोधून आणले नाही. तुम्ही त्यांच्यावर कठोर व क्रूरतेने राज्य केले. 5म्हणून मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची पांगापांग झाली आणि जेव्हा ते पांगले गेले तेव्हा हिंस्र पशूंसाठी भक्ष्य झाले. 6माझी मेंढरे सर्व डोंगरांवर व प्रत्येक उंच पर्वतांवर भटकली. संपूर्ण पृथ्वीभर ते पसरले आणि कोणी त्यांचा शोध केला नाही किंवा त्यांची नोंद घेतली नाही.
7“ ‘म्हणून, तुम्ही मेंढपाळांनो, याहवेहचे वचन ऐका: 8सार्वभौम याहवेह जाहीर करतात माझ्या जीविताची शपथ, माझ्या कळपाला मेंढपाळ नाही आणि म्हणून त्यांची लूट झाली व हिंस्र श्वापदासाठी भक्ष्य झाली आणि माझ्या मेंढपाळांनी माझ्या कळपाचा शोध केला नाही आणि कळपाची काळजी न घेता स्वतःचीच काळजी घेतली, 9म्हणून मेंढपाळांनो, तुम्ही याहवेहचे वचन ऐका: 10सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी मेंढपाळांविरुद्ध आहे आणि माझ्या कळपाचा जाब त्यांच्यापासून घेईन. माझा कळप राखण्याचे काम मी त्यांच्यापासून काढून घेईन, म्हणजे मेंढपाळ पुन्हा स्वतःस पोसणार नाही. त्यांच्या तोंडातून मी माझ्या कळपाची सुटका करेन आणि यापुढे ते त्यांचा आहार होणार नाही.
11“ ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी स्वतः माझ्या मेंढरांचा शोध करेन आणि त्यांची काळजी घेईन. 12मेंढपाळ जेव्हा आपल्या मेंढरांमध्ये राहून पांगलेल्या मेंढरांची काळजी घेतो, तसेच मी माझ्या मेंढरांची काळजी घेईन. ढगाळ व अंधकाराच्या दिवसात ते पांगून गेले त्या सर्व ठिकाणातून मी त्यांना सोडवेन. 13राष्ट्रांतून मी त्यांना आणेन आणि देशांमधून त्यांना एकवट करेन आणि मी त्यांना स्वदेशात आणेन. इस्राएलच्या डोंगरांवर, ओहोळात व देशाच्या सर्व वस्त्यांमध्ये मी त्यांना चारीन. 14मी त्यांना उत्तम कुरणात पाळीन आणि इस्राएलच्या डोंगरांचे माथे त्यांची चरण्याची ठिकाणे होतील. तिथे ते चांगल्या कुरणात बसतील आणि तिथे इस्राएलच्या डोंगरांवर सर्वोत्तम कुरणात चरतील. 15मी स्वतः माझ्या मेंढरांना पाळीन आणि त्यांना विसावा देईन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. 16जे हरवले आहेत त्यांचा शोध मी करेन आणि भटकून गेलेल्यांना मी परत आणेन. जखमी झालेल्यांची पट्टी करेन आणि दुबळ्यांना शक्ती देईन, परंतु पुष्ट व बलवानांना मी नष्ट करेन. मी कळपाला न्यायाने पाळीन.
17“ ‘हे माझ्या कळपा, तुझ्याविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: एक मेंढरू व दुसरे मेंढरू आणि एडके व बोकडे यामध्ये मी न्याय करेन. 18चांगला चारा तुम्हाला खायला मिळाला ते तुम्हाला पुरेसे नाही काय? तुमचे बाकीचे कुरण तुम्ही तुमच्या पायाखाली तुडवावे काय? तुम्हाला पिण्यास स्वच्छ पाणी मिळाले ते तुम्हाला पुरेसे नाही काय? बाकीचे पाणी तुम्ही तुमच्या पायांनी गढूळ करावे काय? 19तुम्ही जे तुमच्या पायाखाली तुडविले ते माझ्या कळपाने खावे काय आणि जे तुमच्या पायांनी तुम्ही गढूळ केले ते पाणी त्यांनी प्यावे काय?
20“ ‘यास्तव सार्वभौम याहवेह त्यांना म्हणतात: मी स्वतः पुष्ट मेंढरे आणि दुबळी मेंढरे यांच्यात न्याय करेन. 21अशक्त मेंढरांना तुम्ही तुमच्या बाजूंनी व खांद्यांनी धक्के दिले आणि त्यांना तुमच्या शिंगांनी ढकलत बाहेर हाकलून दिले, 22म्हणून मी माझ्या कळपाला वाचवेन आणि त्यांची यापुढे लूट होणार नाही. मी एक मेंढरू व दुसऱ्या मेंढरांमध्ये न्याय करेन. 23मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन तो माझा सेवक दावीद असेल आणि तो त्यांचे राखण करेल; तो त्यांची जोपासना करेल व त्यांचा मेंढपाळ होईल. 24मी याहवेह त्यांचा परमेश्वर होईन आणि माझा सेवक दावीद त्यांच्यात राजपुत्र असेल. मी याहवेह हे बोललो आहे.
25“ ‘मी त्यांच्याशी शांतीचा करार करेन आणि क्रूर श्वापदांपासून देशाची सुटका करेन म्हणजे ते अरण्यात राहू शकतील आणि जंगलात सुरक्षित झोपतील. 26मी त्यांना आणि माझ्या डोंगराभोवती असलेल्या ठिकाणांना आशीर्वाद असे करेन.#34:26 किंवा ते व माझ्या डोंगराभोवती असलेले आशीर्वाद असे दिसावे असे मी करेन. मी नेमलेल्या ऋतूत पाऊस पाडेन; आशीर्वादाची वृष्टी असेल. 27झाडे त्यांची फळे देतील आणि भूमी तिचे पीक उपजवेल; लोक त्यांच्या देशात सुरक्षित राहतील. जेव्हा मी त्यांच्या जोखडाची बंधने तोडेन आणि ज्यांनी त्यांना गुलाम करून घेतले, त्यांच्या हातून त्यांना सोडवेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. 28ते यापुढे राष्ट्रांची लूट होणार नाहीत व हिंस्र पशू त्यांना फाडून खाणार नाहीत. ते सुरक्षिततेत राहतील आणि कोणीही त्यांना घाबरविणार नाही. 29आपल्या पिकासाठी प्रसिद्ध असणारा देश मी त्यांना देईन आणि यापुढे ते देशात दुष्काळाने पीडित होणार नाहीत किंवा राष्ट्रांची थट्टा त्यांना सोसावी लागणार नाही. 30तेव्हा ते जाणतील की मी याहवेह त्यांचा परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे आणि ते इस्राएली माझे लोक आहेत, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. 31तुम्ही माझी मेंढरे आहात, तुम्ही मानव माझ्या कुरणातील मेंढरे आहात आणि मी तुमचा परमेश्वर आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 34: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन