YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 33

33
यहेज्केलच्या पाचारणाचे नवीनीकरण
1याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“मानवपुत्रा, तुझ्या लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा मी एका देशावर तलवार आणतो, तेव्हा त्या देशाचे लोक त्यांच्या लोकांतील एकाची निवड करून त्याची पहारेकरी म्हणून नेमणूक करतात, 3आणि ती तलवार देशावर येत आहे असे पाहताच लोकांना सावध करण्यासाठी तो कर्णा वाजवितो, 4तेव्हा जर कोणी कर्ण्याचा आवाज ऐकूनही इशार्‍याकडे लक्ष देत नाही आणि तलवार येऊन त्यांचा जीव घेते, तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर असेल. 5जरी त्यांनी कर्ण्यांचा आवाज ऐकला तरी इशार्‍याकडे लक्ष दिले नाही, म्हणून त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर असेल. जर ते सावध झाले असते, तर त्यांनी स्वतःस वाचविले असते. 6परंतु तलवार येत आहे असे पाहूनही इशारा देण्यासाठी पहारेकरी कर्णा वाजवित नाही आणि तलवार येऊन त्यातील एकाचा जीव घेते, तर त्यांच्या पापामुळे त्या व्यक्तीचा जीव गेला तरी त्यांच्या रक्ताचा जाब मी त्या पहारेकर्‍याकडून घेईन.’
7“मानवपुत्रा, मी तुला इस्राएली लोकांचा पहारेकरी केले आहे; तर जे वचन मी सांगतो ते ऐक आणि माझ्यावतीने त्यांना सावध कर. 8जेव्हा मी दुष्टाला म्हणतो, ‘अरे दुष्टा, तू खचितच मरशील,’ आणि त्या व्यक्तीने आपल्या मार्गांपासून वळावे म्हणून तू सांगत नाहीस, तर ते दुष्ट व्यक्ती त्यांच्या पापामुळे मरतील आणि त्यांच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन. 9परंतु त्या दुष्ट व्यक्तीने त्याच्या मार्गापासून वळावे म्हणून तू त्याला सावध केलेस आणि ते तसे करीत नाहीत, तर ते त्यांच्या पापामुळे मरतील, परंतु तू स्वतः वाचशील.
10“मानवपुत्रा, इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही असे म्हणता: “आमचे अपराध व पापे आम्हावर भारी आहेत आणि त्यामुळे आम्ही नाश पावत आहोत. मग आम्ही कसे जगू शकतो?” ’ 11त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जीविताची शपथ, दुष्टाच्या मरणात मला संतोष नाही, परंतु त्यांनी आपल्या मार्गापासून वळावे व जगावे. वळा! आपल्या दुष्ट मार्गापासून वळा! मग अहो इस्राएली लोकहो तुम्ही का मरावे?’
12“म्हणून, हे मानवपुत्रा, तुझ्या लोकांना सांग, ‘एखाद्या नीतिमान व्यक्तीने जर आज्ञाभंग केला, तर त्या व्यक्तीची पूर्वीची नीतिमत्ता मोजण्यात येणार नाही. आणि एखादा दुष्ट पश्चात्ताप करतो, त्या व्यक्तीची पूर्वीची दुष्टता त्याच्यावर दंड आणणार नाही. नीतिमान व्यक्ती जो पाप करतो, तो जरी पूर्वी नीतिमान असला तरी त्याला जगू दिले जाणार नाही.’ 13जर मी एका नीतिमान व्यक्तीला म्हटले की ते अवश्य जगतील, परंतु त्यांच्या नीतिमत्तेवर भरवसा करून त्यांनी दुष्टाई केली, त्या व्यक्तीने केलेली कोणतीही नीतीची कृत्ये आठवली जाणार नाही; जी दुष्टाई त्यांनी केली, त्यामुळे ते मरतील. 14आणि मी जर एखाद्या दुष्ट मनुष्याला म्हटले, ‘तू खचित मरशील,’ परंतु ते त्यांच्या पापापासून वळले आणि जे न्याय्य व योग्य ते केले; 15गहाण ठेवलेल्या वस्तू त्यांनी जर परत केल्या, चोरून घेतलेले परत केले, जीवन देणारे नियम पाळले आणि काही वाईट केले नाही; तो व्यक्ती खचित जगेल; ते मरणार नाहीत. 16पूर्वी केलेल्या कोणत्याही पापांची त्यांच्याविरुद्ध आठवण केली जाणार नाही. जे न्याययुक्त व योग्य ते त्यांनी केले आहे; त्यामुळे ते खचितच जगतील.
17“तरी तुझे लोक म्हणतात, ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ परंतु त्यांचेच मार्ग न्याययुक्त नाहीत. 18जर नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्तेपासून वळतात आणि जे वाईट ते करतात, तर त्यामुळे ते मरतील. 19आणि जर दुष्ट व्यक्ती त्यांच्या दुष्टाईपासून वळतील आणि जे न्याययुक्त व योग्य ते करतील, तर त्यामुळे ते जगतील. 20तरीही तुम्ही इस्राएली लोक म्हणता, ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ परंतु तुम्हा सर्वांच्या मार्गांनुसार मी तुमचा न्याय करेन.”
यरुशलेमच्या पतनाचे स्पष्टीकरण
21बंदिवासाच्या बाराव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, एक मनुष्य जो यरुशलेमहून निसटून आला होता, तो माझ्याकडे येऊन म्हणाला, “शहर पडले आहे!” 22तो मनुष्य आला त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, याहवेहचा हात माझ्यावर होता आणि याहवेहने सकाळी तो मनुष्य माझ्याकडे येण्यापूर्वी माझे तोंड उघडले. म्हणून माझे तोंड उघडलेले होते आणि मी आणखी शांत नव्हतो.
23तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 24“मानवपुत्रा, इस्राएलात ओसाडीमध्ये राहत असलेले लोक म्हणतात, ‘अब्राहाम केवळ एक मनुष्य होता, तरीही त्याला देश वतन मिळाला. परंतु आम्ही तर पुष्कळ आहोत; खचितच हा देश आम्हाला आमचे वतन म्हणून दिला गेला आहे.’ 25म्हणून त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मांसात रक्त असताच तुम्ही ते खाता आणि रक्तपात करत तुमच्या मूर्तींकडे बघता, तर मग तुम्ही या देशाचे वतन मिळविणार काय? 26तुम्ही तुमच्या तलवारीवर भिस्त ठेवता, तुम्ही अमंगळ कृत्ये करता, तुम्हातील प्रत्येकजण आपल्या शेजार्‍याच्या पत्नीला भ्रष्ट करतो. तरी तुम्हाला देशाचे वतन मिळावे काय?’
27“त्यांना असे सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या जीविताची शपथ, जे ओसाडीमध्ये उरलेले आहेत ते तलवारीने पडतील, जे शहराच्या बाहेर आहेत त्यांना जंगली जनावरांनी खावे म्हणून मी देऊन टाकेन, आणि जे गडात व गुहेत आहेत ते मरीने मरतील. 28मी या देशास वैराण करेन आणि तिच्या अहंकारी बळाचा शेवट होईल आणि इस्राएलचे डोंगर ओसाड पडतील व त्यातून कोणी पार जाणार नाही. 29त्यांनी केलेल्या अमंगळ कृत्यांमुळे जेव्हा मी हा देश ओसाड करेन, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’
30“मानवपुत्रा, तुझ्याविषयी म्हटले तर, तुझे लोक भिंतींजवळ व घरांच्या दरवाजांजवळ तुझ्याविषयी बोलत आहेत व एकमेकांना म्हणत आहेत, ‘या आणि याहवेहकडून आलेला संदेश ऐका.’ 31नियमाप्रमाणे येतात तसे माझे लोक तुझ्याकडे येतात आणि तुझे वचन ऐकण्यासाठी तुझ्यासमोर बसतात, परंतु ते त्याप्रमाणे अनुसरण करीत नाहीत. ते मुखाने प्रीतीविषयी बोलतात, परंतु त्यांची हृदये अन्यायाने लाभ मिळविण्यासाठी लोभी आहेत. 32खरोखर, त्यांच्यासाठी तू केवळ मंजूळ आवाजात चांगले वाद्य वाजवित सुंदर प्रेमगीत गाणार्‍या एका मनुष्यासारखा आहेस, कारण ते तुझे वचन तर ऐकतात परंतु त्याचे अनुसरण करीत नाहीत.
33“जेव्हा हे सर्वकाही घडेल; आणि ते खचितच घडेल; तेव्हा ते जाणतील की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा आहे.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 33: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन