YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 30

30
इजिप्तसाठी विलाप
1याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
“ ‘आक्रोश करून सांग,
“त्या दिवसाला हाय हाय!”
3कारण दिवस जवळ आहे,
याहवेहचा दिवस जवळ आहे;
तो आभाळाचा दिवस,
राष्ट्रांच्या नाशाचा दिवस असेल.
4इजिप्तविरुद्ध एक तलवार येईल
आणि कूशवर वेदना येतील.
जेव्हा वधलेले इजिप्तमध्ये पडतील,
तिची संपत्ती काढून घेतली जाईल
आणि तिचे पाये मोडून टाकले जातील.
5कूश आणि लिबिया, लूद व संपूर्ण अरब, कूब आणि कराराच्या देशाचे लोक इजिप्तबरोबर तलवारीने पडतील.
6“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
“ ‘इजिप्तचे मित्रगण पडतील
तिचे अहंकारी बळ सुद्धा पडेल.
मिग्दोलपासून असवानपर्यंत
सर्व तिच्यामध्ये तलवारीने पडतील,
असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
7सर्व ओसाड पडलेल्या देशांमध्ये,
ते ओसाड पडतील,
आणि त्यांची शहरे
उद्ध्वस्त झालेल्या शहरांमध्ये पडतील.
8तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे,
मी जेव्हा इजिप्तला आग लावेन,
तेव्हा तिला मदत करणार्‍यांचाही चुरा होईल.
9“ ‘त्या दिवशी त्या कूशी लोकांना घाबरवून त्यांच्या निश्चिंतेतून बाहेर काढावे म्हणून माझ्याकडून जहाजामध्ये संदेष्टे जातील. इजिप्तच्या नाशाच्या दिवशी वेदना त्यांचा ताबा घेईल, कारण तो दिवस खचितच येत आहे.
10“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
“ ‘बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हातून
मी इजिप्तच्या टोळीचा अंत करेन.
11तो व त्याचे सैन्य; जे राष्ट्रांमध्ये सर्वाधिक क्रूर आहेत;
त्यांना इजिप्तचा नाश करण्यास आणले जाईल.
ते इजिप्तविरुद्ध त्यांची तलवार उपसतील
आणि वधलेल्यांनी देश भरून टाकतील.
12नाईल नदीचे पाणी मी आटवून टाकेन
आणि तो देश दुष्ट राष्ट्रांना विकून टाकेन;
विदेशी लोकांच्या हातून
मी तो देश व त्यातील सर्वकाही ओसाड करेन.
मी याहवेह हे बोललो आहे.
13“ ‘सार्वभौम याहवेह म्हणतात:
“ ‘मी मूर्तींचा नाश करेन
आणि मेम्फीस#30:13 किंवा नोफ येथील प्रतिमांचा मी शेवट करेन.
इजिप्तमध्ये यापुढे राजकुमार नसतील,
आणि संपूर्ण देशभर मी भय पसरवेन.
14इजिप्तचा पथरोस मी उजाड करेन,
सोअन नगराला आग लावेन
आणि नओ#30:14 किंवा थेबेस नगराला दंड देईन.
15सीन#30:15 किंवा पेलुसीअम जो इजिप्तचा बळकट दुर्ग,
यावर मी माझा कोप ओतेन,
आणि नओचे सैन्य नष्ट करेन.
16मी इजिप्तला आग लावेन;
सीन वेदनांनी तळमळेल.
नओ वादळात उडून जाईल;
मेम्फीस#30:16 किंवा नोफ सातत्याने कष्टात राहील.
17ओन#30:17 किंवा हेलिओपोलिस व पी-बेसेथचे#30:17 किंवा बुबास्तिस तरुण पुरुष
तलवारीने पडतील,
आणि शहरे बंदिवासात जातील.
18तहपनहेसमध्ये दिवसा काळोख होईल
जेव्हा मी इजिप्तचे जू मोडून टाकीन;
तेव्हा तिच्या अहंकाराच्या सामर्थ्याचा शेवट करेन.
ती ढगांनी झाकली जाईल,
आणि तिची गावे बंदिवासात जातील.
19याप्रकारे मी इजिप्तवर दंड आणेन
आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”
फारोहचे हात मोडले जातात
20अकराव्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 21“मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोह याचा हात मी मोडला आहे. तो बरा व्हावा म्हणून त्याला पट्टी बांधली नाही किंवा तलवार धरता येईल इतकी शक्ती मिळावी म्हणून दोरीतही ठेवला नाही. 22म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात, मी इजिप्तचा राजा फारोह याच्याविरुद्ध आहे. मी त्याचे हात म्हणजे जो अभंग आहे व जो मोडलेला आहे असे दोन्ही हात मोडेन, म्हणजे त्याच्या हातून तलवार गळून पडेल. 23मी इजिप्तच्या लोकांची राष्ट्रांमध्ये पांगापांग करेन आणि इतर देशांमध्ये त्यांना विखरून टाकेन. 24मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करेन आणि माझी तलवार त्याच्या हाती देईन पण फारोहचे हात मोडेन आणि तो बाबेलच्या राजासमोर मरणपंथास टेकलेल्या घायाळ मनुष्याप्रमाणे कण्हेल. 25मी बाबेलच्या राजाचे हात बळकट करेन, परंतु फारोहचे हात लुळे पडतील. जेव्हा मी बाबेलच्या राजाच्या हाती माझी तलवार देईन आणि जेव्हा तो ती इजिप्तविरुद्ध चालवील, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे. 26इजिप्तच्या लोकांना मी राष्ट्रांमध्ये पांगवेन आणि इतर देशांमध्ये त्यांना विखरेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 30: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन