YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 29

29
इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी
फारोहचा न्याय
1दहाव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या बाराव्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2“मानवपुत्रा, इजिप्तचा राजा फारोहकडे आपले तोंड कर आणि त्याच्या व सर्व इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी कर. 3त्याच्याशी बोल आणि त्याला सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
“ ‘हे इजिप्तच्या फारोह राजा मी तुझ्याविरुद्ध आहे,
तू तो प्रचंड मोठा श्वापद आहेस जो पाण्याच्या प्रवाहात पडून असतो.
तू म्हणतोस, “नाईल नदी माझी आहे;
तिला मी माझ्यासाठी बनविले आहे.”
4मी तुझ्या जाभाडात गळ अडकवेन
आणि तुझ्या प्रवाहातील मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील असे मी करेन.
मी तुला तुझ्या प्रवाहातून ओढून बाहेर काढेन
आणि त्यातील सर्व मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील.
5मी तुला व तुझ्या प्रवाहातील सर्व माशांना
वाळवंटात सोडून देईन.
तू मोकळ्या मैदानात पडशील
आणि तुला ना कोणी जवळ करणार ना उचलणार.
पृथ्वीवरील प्राणी व आकाशातील पक्ष्यांसाठी
तू खाद्य होशील.
6तेव्हा इजिप्तमध्ये राहणारे जाणतील की मीच याहवेह आहे.
“ ‘तू इस्राएल लोकांसाठी बोरूच्या काठीप्रमाणे होतास. 7जेव्हा त्यांनी त्यांच्या हातांनी तुला पकडले, तू त्यांना खरडले व त्यांचे खांदे मोडले; जेव्हा ते तुझ्यावर टेकले, तेव्हा तू मोडलास व त्यांच्या कंबरा खचविल्या.
8“ ‘यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी तुझ्याविरुद्ध तलवार आणेन, मनुष्य व जनावरे या दोघांनाही मारून टाकीन. 9इजिप्त देश निर्जन व ओसाड होईल. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.
“ ‘तू म्हणालास, “नाईल नदी माझी आहे; मी ती निर्माण केली,” 10म्हणून मी तुझ्याविरुद्ध आणि तुझ्या प्रवाहांच्या विरुद्ध आहे आणि मिग्दोलपासून असवानपर्यंत, अगदी कूशच्या#29:10 म्हणजेच नाईल नदीचा वरचा भाग सीमेपर्यंत मी इजिप्त देश ओसाड व वैराण करेन. 11ना कोणी मनुष्य ना पशू त्यामधून जाईल; चाळीस वर्षे तिथे कोणी वस्ती करणार नाही. 12उजाडलेल्या देशांमध्ये इजिप्त देश मी सर्वात अधिक ओसाड करेन आणि सर्व ओसाड पडलेल्या देशांमध्ये इजिप्तची शहरे चाळीस वर्षे ओसाड पडतील आणि इजिप्तच्या लोकांना मी राष्ट्रांमध्ये विखरून टाकीन आणि इतर देशांमध्ये त्यांना पसरून टाकेन.
13“ ‘तरीही, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: चाळीस वर्षे संपल्यावर जिथे ते विखुरले गेले त्या राष्ट्रांमधून इजिप्तच्या लोकांना मी एकवट करेन. 14बंदिवासातून मी त्यांना इजिप्तच्या पथरोस भागात, त्यांच्या पूर्वजांचा देश पत्रोसला#29:14 पत्रोसला म्हणजे इजिप्तचा दक्षिणेकडील भाग परत आणेन, तिथे ते कमी दर्जाचे राज्य होईल. 15ते सर्वात कमी दर्जाचे राज्य असतील आणि कधीही इतर राष्ट्रांच्या वर होणार नाहीत. मी त्याला इतके कमी करेन की ते राष्ट्रांवर पुन्हा राज्य करणार नाही. 16इजिप्त यापुढे इस्राएल लोकांसाठी आणखी आधार नसतील परंतु त्यांच्या पापाची आठवण म्हणून ते त्यांच्याकडे मदतीसाठी जातील. तेव्हा ते जाणतील की मीच सार्वभौम याहवेह आहे.’ ”
नबुखद्नेस्सरचे प्रतिफळ
17सत्ताविसाव्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 18“मानवपुत्रा, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने त्याच्या सैन्याला कठोरतेने सोरविरुद्ध पाठवले; प्रत्येक डोके टकले झाले आणि प्रत्येक खांदा सोलून काढला. तरीही त्याने हे जे कठीण कष्टाचे अभियान सोरविरुद्ध चालविले त्याबद्दल त्याला व त्याच्या सैन्याला काहीही प्रतिफळ मिळाले नाही. 19यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी इजिप्त देशाला बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हाती देणार आहे आणि तो त्यांची संपत्ती घेऊन जाईल. तो हरण करून लुटून घेईल आणि तो देश त्याच्या सैन्याला मोबदला म्हणून होईल. 20त्याने केलेल्या परिश्रमासाठी मी त्याला इजिप्त देश त्याचे प्रतिफळ म्हणून दिला आहे, कारण त्याने व त्याच्या सैन्याने ते माझ्यासाठी केले, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
21“त्या दिवशी मी इस्राएलच्या घराण्याचे शिंग#29:21 किंवा सामर्थ्य लांब उगवेन आणि त्यांच्यामध्ये तुझे तोंड उघडेन. तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 29: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन