YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 23

23
न्याय आणि दयेविषयी नियम
1“तुम्ही खोट्या अफवा पसरवू नयेत. अन्यायाने साक्षीदार होऊन दोषी व्यक्तीला मदत करू नये.
2“दुष्कृत्य करण्याकरिता जमावाला अनुसरू नका आणि त्या जमावाशी एक होऊन न्यायवादात आपली साक्ष फिरवू नका, 3आणि गरिबाच्या न्यायवादात तो दोषी असता, त्यावर दया दाखवू नये.
4“तुमच्या वैर्‍याचा बैल किंवा गाढव भटकलेला असा तुमच्या नजरेस पडला, तर ते तुम्ही अवश्य माघारी आणून परत करावे. 5जे तुमचा द्वेष करतात त्यांचे गाढव ओझ्याखाली पडलेले तुम्हाला दिसले, ते तसेच सोडू नये; त्यांना अवश्य मदत करावी.
6“तुमच्यातील गरिबांच्या न्यायवादात त्यांचा न्याय नाकारला जाऊ नये. 7खोट्या आरोपांपासून स्वतःला दूर ठेवावे आणि निरपराधी किंवा प्रामाणिक व्यक्तीला मरणदंड देऊ नये, कारण मी दोषी व्यक्तीला सोडणार नाही.
8“तुम्ही लाच घेऊ नये, कारण लाच डोळस व्यक्तीस आंधळे करते व निरपराध्याचे शब्द विपरीत करते.
9“परदेशी व्यक्तीस जाचू नका; परदेशी असणे काय आहे हे तुम्ही समजता, कारण तुम्हीही इजिप्त देशात परदेशी होता.
शब्बाथाचे नियम
10“सहा वर्षे आपल्या भूमीत तुम्ही पेरणी करावी आणि पीक गोळा करावे, 11परंतु सातव्या वर्षी जमीन नांगरू नये आणि न वापरता तशीच पडीक राहू द्यावी. मग तुमच्यातील गरीब लोकांना त्यातील अन्न मिळेल आणि त्यातूनही उरलेले वनपशू खातील. तुमचे द्राक्षमळे व जैतुनाच्या बागांविषयी सुद्धा असेच करावे.
12“सहा दिवस आपले काम करावे, पण सातव्या दिवशी काम करू नये, अशासाठी की तुमच्या बैलांना व गाढवांना विसावा मिळावा, तसेच तुमच्या घरात जन्मलेले गुलाम आणि तुमच्यामध्ये राहणारा परदेशी सुद्धा ताजेतवाने होऊ शकेल.
13“जे काही मी तुम्हाला सांगितले आहे ते काळजीपूर्वक पाळावे. इतर दैवतांचा धावा करू नये; तुमच्या मुखांनी त्यांचे नावही घेऊ नये.
तीन वार्षिक सण
14“वर्षातून तीन वेळा तुम्ही माझ्यासाठी सण पाळावेत.
15“बेखमीर भाकरीचा सण पाळावा; मी तुम्हाला आज्ञापिल्याप्रमाणे, सात दिवस बेखमीर भाकर खा. अवीव महिन्यात नेमलेल्या वेळेत असे करावे, कारण त्या महिन्यात तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला.
“माझ्यासमोर कोणीही रिकाम्या हाताने येऊ नये.
16“जेव्हा तुम्ही तुमच्या शेतात पेरलेल्या पिकाचा हंगाम करता, तेव्हा त्याच्या प्रथमफळाने हंगामाचा सण पाळावा.
“वर्षाच्या शेवटी आपल्या शेतातून तुम्ही हंगाम गोळा करता, तेव्हा संग्रहाचा सण पाळावा.
17“वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी सार्वभौम याहवेह यांच्यासमोर हजर व्हावे.
18“अर्पणातील रक्त खमिराबरोबर मला अर्पण करू नये.
“मला अर्पण केलेल्या यज्ञपशूंची चरबी सकाळपर्यंत राहू देऊ नये.
19“तुमच्या भूमीच्या प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग तुमचे परमेश्वर याहवेह यांच्या भवनात आणावा.
“करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.
परमेश्वराचा दूत मार्ग तयार करणार
20“पाहा, मार्गात तुझे रक्षण करावे व जो देश मी तुमच्यासाठी तयार करून ठेवला आहे, त्यात तुम्हाला घेऊन यावे म्हणून तुमच्यापुढे मी एक दूत पाठवित आहे. 21त्याच्यापुढे सावध असा आणि तो जे काही सांगेल ते ऐका. त्याच्याविरुद्ध बंड करू नका; तो तुझ्या अपराधांची क्षमा करणार नाही, कारण माझे नाव त्याच्यामध्ये आहे. 22जर तुम्ही काळजीपूर्वक त्याचे ऐकाल आणि मी जे सांगतो ते कराल, तर मी तुमच्या शत्रूंचा शत्रू होईन आणि जे तुमचा विरोध करतात, त्यांचा मी विरोधक होईन. 23माझा दूत तुमच्यापुढे जाईल आणि तुम्हाला अमोरी, हिथी, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी यांच्या देशात पोहचवेल आणि मी त्या सर्वांचा नाश करेन. 24त्यांच्या दैवतांना नमन करू नये किंवा त्यांची उपासना करू नये किंवा त्यांच्या चालीरीतींचे अनुसरण करू नये. तुम्ही त्या मोडून टाकाव्यात आणि त्यांच्या पवित्र दगडांचा चुरा करावा. 25तुमचे परमेश्वर याहवेह यांची सेवा करा, म्हणजे तुमच्या अन्नावर व पाण्यावर त्यांचा आशीर्वाद राहील. तुमच्यातून मी आजार नाहीसे करेन, 26तुमच्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही, ना कोणी वांझ राहणार. तुमचा जीवनकाळ मी पूर्ण करेन.
27“तुम्ही जो देश जिंकून घ्याल त्यात मी आपले भय पाठवेन व त्यात गोंधळ निर्माण करेन. तुमचे शत्रू पाठ दाखवून पळ काढतील असे मी करेन. 28हिव्वी, कनानी, हिथी या लोकांनी तुमच्या मार्गातून बाजूला व्हावे म्हणून मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठवेन. 29पण एका वर्षातच मी त्यांना घालवून देणार नाही, कारण देश ओसाड होईल आणि वनपशू तुमच्यासाठी पुष्कळ होतील. 30तुमची संख्या वाढून तुम्ही त्या देशाचा ताबा घेईपर्यंत थोडेथोडे असे मी त्यांना तुमच्यापुढून घालवून देईन.
31“तांबड्या समुद्रापासून पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत#23:31 अर्थात् भूमध्य समुद्रापर्यंत व वाळवंटापासून फरात#23:31 फरात ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस म्हणून ओळखले जाते नदीपर्यंत मी तुमची सीमा स्थापित करेन. त्या देशात राहणारे लोक मी तुमच्या हाती देईन आणि तुम्ही त्यांना आपल्या पुढून घालवून टाकाल. 32त्यांच्याशी किंवा त्यांच्या दैवतांशी करार करू नये. 33त्यांना तुमच्या देशात राहू देऊ नये, नाहीतर ते तुम्हाला माझ्याविरुद्ध पाप करण्यास प्रवृत्त करतील, कारण त्यांच्या दैवतांची उपासना करणे तुमच्यासाठी खचितच पाश असे होईल.”

सध्या निवडलेले:

निर्गम 23: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन