YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 9

9
1बाराव्या म्हणजे अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी, राजाची दोन्हीही फर्माने अंमलात यावयाची होती. त्या दिवशी यहूद्यांचे शत्रू यहूद्यांना धुळीस मिळविण्याची आशा बाळगून होते. परंतु प्रत्यक्षात अगदी उलटेच घडले. सर्व प्रांतांतील यहूदी लोक, त्यांना उपद्रव देणाऱ्यांना वरचढ झाले. 2त्या शत्रूपासून संरक्षण व्हावे म्हणून अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांतील यहूदी लोक आपआपल्या शहरांमध्ये एकत्र आले. परंतु त्यांना कोणीही उपद्रव दिला नाही, कारण सर्व जातीच्या लोकांना यहूद्यांची धास्ती वाटू लागली होती. 3सर्व प्रांतांच्या अधिपतींनी म्हणजे राज्यपाल, प्रांतप्रमुख, प्रतिष्ठित व सरकारी कर्मचाऱ्यांनी यहूद्यांनाच मदत केली, कारण ते मर्दखयाच्या भीतीने ग्रासून गेले होते. 4मर्दखया राजवाड्यात एक महत्त्वाचा व्यक्ती होता; त्याची किर्ती सर्व प्रांतात पसरली होती व तो आता अत्यंत प्रबळ झालेला होता.
5त्या नेमलेल्या दिवशी यहूदी लोकांनी आपल्या शत्रूंची कत्तल करून संहार केला व त्यांचा नाश केला आणि जे त्यांचा तिरस्कार करीत असत, त्यांना आवडेल तसे वागविले. 6यहूद्यांनी शूशन राजधानीत पाचशे पुरुष ठार करून नष्ट केले. 7-10त्यांनी यहूद्यांचा शत्रू म्हणजे हम्मदाथाचा पुत्र हामानच्या पर्शन्दाथा, दलफोन, अस्पाथा, पोराथा, आदल्या, अरीदाथा, पर्माश्ता, अरीसई, अरीदय व वैजाथा या दहा पुत्रांनाही ठार केले. परंतु त्यांनी त्यांच्या मालमत्तेवर हात टाकला नाही.
11शूशन राजधानीत ठार झालेल्यांची संख्या राजाला त्याच दिवशी कळविण्यात आली, 12तेव्हा त्याने एस्तेर राणीला बोलाविले व तो म्हणाला, “शूशन राजधानीतच यहूद्यांनी पाचशे लोक ठार केले आहेत आणि हामानाच्या दहा पुत्रांचाही संहार केला आहे. तर राज्याच्या इतर प्रांतात त्यांनी काय केले असेल? आता तुझी काय मागणी आहे? ते तुला दिले जाईल. तुझी काय विनंती आहे? ते देखील करण्यात येईल.”
13तेव्हा एस्तेर म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस येत असेल तर, येथे शूशन शहरातील यहूद्यांना उद्याही राजाज्ञेप्रमाणे करण्याची परवानगी द्यावी आणि हामानाच्या दहा पुत्रांची प्रेते खांबावर टांगण्यात यावी.”
14तेव्हा राजाने हे सर्व करण्याची आज्ञा दिली. फर्मान शूशन शहरात प्रसिद्ध करण्यात आले व हामानाच्या दहा पुत्रांची प्रेते खांबावर लटकविण्यात आली. 15मग अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी शूशन शहरातील यहूदी एकत्र गोळा झाले व त्यांनी शूशन शहरात आणखी तीनशे पुरुष ठार केले. परंतु त्यांनी कोणाच्या मालमत्तेला हात लावला नाही.
16इकडे राजाच्या सर्व प्रांतातील इतर यहूदी लोक स्वतःच्या संरक्षणार्थ एकवटले आणि त्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा संहार केला. त्यांनी पंचाहत्तर हजार लोकांचा वध केला. परंतु त्यांनी कोणाच्या मालमत्तेला हात लावला नाही. 17हे अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी घडले, मग चौदाव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली आणि हा दिवस मेजवान्या व आनंद करून साजरा केला.
18परंतु शूशन शहरातील यहूदी तेराव्या व चौदाव्या दिवशी एकत्र आले व पंधराव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली आणि हा दिवस मेजवान्या व आनंद करून साजरा केला.
19आणि म्हणूनच नगराच्या ग्रामीण भागातील यहूदी लोक अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी आनंद करून व एकमेकांना भेटी देऊन उत्सव साजरा करतात.
पुरीम उत्सवाची संस्थापना
20मर्दखयाने या सर्व घटनांची नोंदणी केली आणि अहश्वेरोश राजाच्या दूर व जवळ असलेल्या सर्व प्रांतांतील यहूद्यांना पत्रे पाठविली. 21या पत्रांच्या द्वारे अदार महिन्याच्या चौदाव्या व पंधराव्या दिवशी वार्षिक आनंदोत्सव म्हणून जाहीर केला. 22कारण त्या दिवशी यहूदी लोकांचे त्यांच्या शत्रूपासून रक्षण झाले आणि त्यांच्या दुःखाचे हर्षात आणि त्यांच्या शोकाचे आनंदोत्सवात रूपांतर झाले. आणि हा दिवस मेजवान्या देऊन व एकमेकांना सर्व प्रकाराच्या भेटी देऊन व गोरगरिबांना दानधर्म करून आनंदाने साजरा करावा असे त्याने पत्राद्वारे त्यांना कळविले.
23तेव्हा यहूदी लोकांनी मर्दखयाने लिहिल्यानुसार सूचना स्वीकारली आणि हा उत्सव सुरू केला. 24कारण अगागी हम्मदाथाचा पुत्र हामान, यहूद्यांच्या शत्रूने सर्व यहूदी लोकांचा विध्वंस करून नाश करण्यासाठी पूर (चिठ्ठ्या) टाकून कट केला होता. 25या कटाचे प्रकरण राजापुढे आले,#9:25 किंवा जेव्हा एस्तेर राजासमोर आली तेव्हा राजाने फर्मान काढले की यहूदी लोकांविरुद्ध रचलेला हामानाचा कट त्याच्याच डोक्यावर उलटविण्यात यावा आणि मग हामान व त्याचे पुत्र यांना फासावर लटकविण्यात यावे. 26(म्हणून या दिवसांना पूर वरून “पुरीम” हे नाव पडले.) जे घडले त्या सर्वांची या पत्रात नोंद करण्यात आली, कारण जे काही घडले व जे सर्व त्यांनी बघितले होते. 27राज्यातील सर्व यहूद्यांनी हा उत्सव सुरू करण्यास व आपल्या वंशजांनी आणि यहूदी होणार्‍या सर्वांनी न चुकता प्रत्येक वर्षी हे दोन दिवस योग्य वेळी साजरे करण्याचा संकल्प केला. 28आणि साम्राज्यातील प्रत्येक प्रांतात व शहरांमधील, प्रत्येक पिढीतील प्रत्येक कुटुंबात यहूदी लोक हे दोन दिवस वार्षिक उत्सवाचे प्रसंग म्हणून साजरे करतील. आणि हे पुरीम उत्सवाचे दोन दिवस साजरे करण्यास कधीही चुकू नये—यहूदी वंशातून या दिवसांची आठवण कधीही पुसली जाऊ नये.
29दरम्यानच्या काळात, अबीहाईलची कन्या एस्तेर राणीने व यहूदी मर्दखयासह आपल्या पूर्ण अधिकाराने पुरीमची सूचना देण्यासाठी दुसरे पत्र लिहिले. 30याशिवाय, यहूदी मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या साम्राज्यातील सर्व एकशे सत्तावीस प्रांतातील यहूद्यांना सदिच्छा व्यक्त करणारी पत्रे पाठविली. 31एस्तेर राणी व यहूदी मर्दखयाने यांनी पुरस्कृत केलेल्या पुरीम सणाचे हे दोन दिवस वार्षिक सण म्हणून साजरे करण्याचे फर्मान काढले, ज्याप्रकारे राष्ट्रीय उपासाचा आणि प्रार्थनेचा सण पाळल्या जातो, त्याच प्रकारे पुरीमचा सणही पाळण्यात यावा. 32अशा रीतीने एस्तेरच्या आज्ञेने या दोन दिवसांच्या तारखा निश्चित करण्यात झाल्या आणि ग्रंथात त्यांची नोंद झाली.

सध्या निवडलेले:

एस्तेर 9: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन