अनुवाद 13
13
इतर दैवतांची उपासना
1जर तुम्हामध्ये कोणी ज्योतिषी किंवा स्वप्नांच्या आधाराने भविष्य सांगणारा असेल व त्याने दैवी चिन्ह आणि चमत्कारांची घोषणा केली, 2आणि जर त्याची चिन्हे आणि भविष्ये खरी ठरली आणि तो ज्योतिषी म्हणेल, “चला, आपण इतर दैवतांचे अनुसरण करू आणि त्यांची उपासना करू.” (अशी दैवते ज्यांची तुम्हाला ओळख नसेल) 3तर तुम्ही त्या ज्योतिष्याचे किंवा स्वप्नदर्शीचे शब्द ऐकू नका. कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर मनापासून प्रीती करता की नाही, हे पाहण्यासाठी परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहेत. 4याहवेह तुमच्या परमेश्वराचेच तुम्ही अनुसरण करावे व त्यांचेच भय बाळगावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, त्यांची वाणी ऐकावी; त्यांची सेवा करावी व त्यांनाच बिलगून राहावे. 5जो संदेष्टा किंवा स्वप्नदर्शी तुम्हाला बहकवील त्याला अवश्य जिवे मारावे, कारण ज्या याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला इजिप्त देशातील गुलामगिरीतून बाहेर काढले, त्यांच्याविरुद्ध बंड करण्यास त्याने तुम्हाला प्रवृत्त केले. तुम्ही स्वतःला या दुष्टाईपासून मुक्त केले पाहिजे.
6जर तुमचा स्वतःचा बंधू किंवा तुमचे पुत्र किंवा कन्या किंवा तुमची प्रिय पत्नी किंवा जिवलग मित्र तुम्हाला गुप्तपणे भुरळ पाडेल व म्हणेल, “चल, आपण जाऊ आणि इतर दैवतांची उपासना करू” (ज्यांना तुम्ही वा तुमचे पूर्वज ओळखत नाहीत, 7जे तुमच्या शेजार्यांचे देव आहेत, ते जवळ असो वा दूर, त्या भूमीच्या एका टोकापासून असो वा दुसर्या टोकापर्यंत), 8तर त्यांना संमती देऊ नका किंवा त्यांचे ऐकू नका. त्यांची गयही करू नका. त्यांना वाचवू नका किंवा संरक्षण देऊ नका. 9तर त्यांना अवश्य जिवे मारावे. त्यांना मृत्युदंड देत असताना, त्यांच्यावर तुमचा हात सर्वप्रथम पडला पाहिजे आणि त्यानंतर इतर लोकांचे हात पडावेत. 10त्यांना मरेपर्यंत धोंडमार करावी, कारण ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वरापासून तुम्हाला फूस लावून दूर नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. 11तेव्हा संपूर्ण इस्राएल ऐकेल व भयभीत होईल आणि तुमच्यामध्ये असा दुष्टपणा करण्यास कोणी धजणार नाही.
12याहवेह तुमचे परमेश्वर वस्ती करण्यास देत असलेल्या एखाद्या शहरातून तुमच्या कानावर आले की, 13तुमच्यापैकी काही अधम पुरुष निघाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या नगरातील लोकांना हे बोलून बहकविले, “चला आपण जाऊ आणि इतर दैवतांची उपासना करू” (अशी दैवते ज्यांना तुम्ही ओळखत नाहीत), 14तर तुम्ही त्याची चौकशी करावी, शोध करावा आणि सखोल तपासणी करावी आणि जर हे सत्य असेल की तुमच्यामध्ये असे घृणित कृत्य घडले आहे, 15तर तुम्ही त्या नगरातील लोकांना तलवारीने निश्चित मारून टाकावे. त्यातील सर्व रहिवाशांचा आणि गुरांचा समूळ नाश करावा. 16त्यानंतर युद्धात मिळालेल्या लुटीचा नगरातील रस्त्याच्या मधोमध ढीग करून त्याला आग लावावी आणि ते संपूर्ण नगर होमार्पण म्हणून याहवेह तुमच्या परमेश्वराला अर्पण करावे. हे नगर म्हणजे एक उजाड ठिकाण म्हणून कायम राहील. ते पुन्हा कधीही बांधले जाणार नाही, 17आणि निषिद्ध वस्तूंपैकी ज्या विनाशासाठी ठरविलेल्या आहेत त्यातील काहीही तुमच्या हातात राहू नये. मग याहवेहचा तीव्र क्रोध शमेल, ते तुमच्यावर दया करतील आणि तुम्हावर करुणा करतील. तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे ते तुम्हाला बहुगुणित करतील— 18कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची वाणी ऐकून, आज मी तुम्हाला ज्या आज्ञा देत आहे त्या पाळल्या आणि त्यांच्या दृष्टीने जे योग्य तेच केले आहे.
सध्या निवडलेले:
अनुवाद 13: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.