YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 9

9
दानीएलची प्रार्थना
1अहश्वेरोशचा पुत्र दारयावेशच्या कारकिर्दीचे ते पहिलेच वर्ष होते. दारयावेश हा मेदिया वंशातील होता, तो खाल्डियन राज्यावर राजा करण्यात आला होता; 2त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी मला, दानीएलला, संदेष्टा यिर्मयाहला दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार पवित्र शास्त्रातून समजले की यरुशलेम सत्तर वर्षे उजाड अशा अवस्थेत राहील. 3तेव्हा मी याहवेह परमेश्वराकडे वळून प्रार्थना आणि उपवास करून आणि गोणपाट नेसून आणि अंगाला राख फासून त्यांना विनंती केली.
4याहवेह माझ्या परमेश्वराला मी प्रार्थना केली आणि पापे कबूल केली:
“हे याहवेह, महान व प्रतापी परमेश्वरा, तुमच्यावर प्रीती करणार्‍यांना आणि तुमच्या आज्ञा पाळणार्‍यांकरिता तुम्ही केलेला तुमच्या प्रीतीचा करार पाळता, 5परंतु आम्ही पाप आणि चूक केली आहे. आम्ही दुष्ट आणि बंडखोर आहोत; तुमच्या आज्ञांपासून आणि नियमांपासून आम्ही बहकलो आहोत. 6आम्ही तुमचे सेवक संदेष्टे जे तुमच्या नावाने आमचे राजे, आमचे राजपुत्र आणि आमचे पूर्वज आणि देशातील सर्व लोकांना तुमच्या नावाने संदेश देत असत, त्यांचे आम्ही ऐकले नाही.
7“हे प्रभू, तुम्ही नीतिमान आहात, परंतु आज आम्ही लज्जित झालो आहोत; यहूदीयात राहणारे, यरुशलेमात राहणारे, जवळ व दूर राहणारे सर्व इस्राएली लोक आणि ज्यांना तुमच्याविरुद्ध केलेल्या अविश्वासाच्या कृत्यांमुळे सर्व देशांमध्ये तुम्ही घालवून दिले. 8हे याहवेह, आम्ही, आमचे राजे, आमचे राजपुत्र, आणि आमचे पूर्वज फार लज्जित आहोत, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. 9जरी आम्ही त्यांच्याविरुद्ध बंडखोरी केली, तरीही याहवेह आमचे परमेश्वर दयाळू आणि क्षमा करणारे आहेत; 10आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही आणि त्यांनी आपल्या सेवक संदेष्ट्यांच्या मार्फत दिलेले नियम आम्ही पाळले नाही. 11सर्व इस्राएली लोकांनी तुमच्या नियमांचे आज्ञाभंग केले आहे आणि तुमची आज्ञा पाळण्यास आपली पाठ फिरविली आहे.
“म्हणूनच परमेश्वराचा सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात लिहून ठेवलेले शाप आणि शपथेवरचा दंड आमच्यावर ओतला गेला आहे, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. 12आमच्यावर मोठी संकटे आणून तुम्ही आम्हाला आणि आमच्या अधिपतींविरुद्ध दिलेले वचन पूर्ण केले आहे. संपूर्ण स्वर्गाच्या खाली असे काहीही झाले नाही, जसे यरुशलेमसोबत करण्यात आले. 13मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आमच्याविरुद्ध लिहून ठेवलेली सर्व संकटे आमच्यावर आली आहेत, तरीही आमच्या अपराधांपासून वळून आणि तुमच्या सत्याकडे लक्ष लावण्यास आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराला विनंती केली नाही. 14म्हणूनच याहवेहने कोणताही संकोच बाळगता आमच्यावर संकटे पाठविली, कारण याहवेह आमचे परमेश्वर जे काही करतात त्यामध्ये ते नीतिमान आहेत; तरीही आम्ही त्यांच्या आज्ञा पाळल्या नाहीत.
15“आणि आता याहवेह आमच्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या महान हातांनी तुमच्या लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणले आणि आपल्या नावाची महिमा प्रस्थापित केली, जी आजपर्यंत आहे. आम्ही पाप केले आणि आम्ही चूक केली. 16हे प्रभू, तुमच्या पूर्ण न्यायकृत्यांप्रमाणे तुमच्या यरुशलेम नगरांवरून, तुमच्या पवित्र डोंगरावरील तुझ्या विश्वसनीय करुणेमुळे यरुशलेमवरील, तुझ्या स्वतःच्या नगरीवरील, तुझ्या पवित्र डोंगरावरील, तुमचा क्रोध आणि राग दूर करा. कारण आमच्या पातकांमुळे आणि आमच्या पूर्वजांच्या अपराधांमुळे यरुशलेम आणि तुमचे लोक सभोवतालच्या सर्वांना निंदा असे झालो आहोत.
17“आता हे आमच्या परमेश्वरा, आपल्या दासाची प्रार्थना आणि विनवणी ऐका. याहवेह, उजाड झालेल्या तुमच्या पवित्रस्थानावर तुमचे मुखतेज पडू द्या. 18हे आमच्या परमेश्वरा कान द्या आणि ऐका; आपले डोळे उघडा आणि ज्या नगरास तुमचे नाव दिले आहे ते कसे उद्ध्वस्त झाले आहे ते पाहा. आम्ही नीतिमान आहोत म्हणून विनवणी करीत आहोत असे नाही, परंतु तुमची दया विपुल आहे. 19हे याहवेह, ऐका! हे याहवेह, क्षमा करा! हे याहवेह, ऐका आणि कृती करा. अहो माझ्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या स्वतःकरिता विलंब करू नका, कारण तुमच्या नगराला आणि तुमच्या लोकांना तुमचे नाव दिले आहे.”
सत्तर “सप्तके”
20जेव्हा मी माझे पाप आणि आपल्या इस्राएली लोकांचे पाप कबूल करीत बोलत आणि प्रार्थना करीत होतो आणि याहवेह माझ्या परमेश्वर यांची त्यांच्या पवित्र डोंगरासाठी प्रार्थना करीत होतो; 21जेव्हा मी प्रार्थना करीतच होतो, गब्रीएल ज्याला मी आधीच्या दृष्टान्तात पाहिले होते, संध्याकाळच्या अर्पणासमयी माझ्याकडे आला; 22त्याने मला समज दिली आणि मला म्हटले, “दानीएला, आता मी तुला ज्ञान आणि समज देण्यासाठी आलो आहे. 23ज्या क्षणाला तू प्रार्थना करण्यास सुरुवात केलीस, त्याच क्षणाला एक आज्ञा देण्यात आली, ती काय आहे हे तुला सांगण्यासाठीच मी आलो आहे. कारण तू अतिशय प्रिय आहेस. म्हणून या गोष्टींचा विचार कर आणि दृष्टान्त नीट समजून घे:
24“तुमचे लोक आणि तुमचे पवित्र शहर यासाठी सत्तर ‘सप्तके’#9:24 किंवा सप्तके निर्धारित केली गेली आहे की त्यांनी अपराधाचा अंत करावा आणि पापाचा शेवट करावा आणि दुष्टतेसाठी पश्चात्ताप करावा, सनातन नीतिमत्व आणावे, दृष्टान्त आणि संदेश यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आणि परमपवित्रस्थानाला अभिषेक करण्यात यावा.
25“हे जाणा आणि समजून घ्या: यरुशलेमची पुनर्स्थापना आणि पुनर्बांधणी करण्यासाठी सात ‘सप्तके’ आणि बासष्ट ‘सप्तके’ निश्चित केली आहेत. ते शब्द बाहेर येण्यापासून तो अभिषिक्त शासनकर्ता होईपर्यंतचा वेळ ठरविला आहे. अडचणीच्या वेळी रस्त्यावर आणि खंदकाने पुन्हा बांधले जाईल, 26बासष्ट ‘सप्तके’ हा काळ संपल्यावर अभिषिक्ताचा वध करण्यात येईल आणि त्याला काही उरणार नाही. मग अधिपतीचे लोक शहराचा आणि पवित्रस्थानाचा विध्वंस करतील. शेवट महापुराप्रमाणे येईल: शेवट होईपर्यंत युद्ध चालू राहील आणि सर्वकाही ओसाड व्हावे असे ठरले आहे. 27तो एका ‘सप्तका’ साठी अनेकांसोबत कराराची पुष्टी करेल. ‘सप्तका’ मध्ये, यज्ञ करण्यास व अन्नार्पणे वाहण्याचे बंद करेल. आणि मंदिरात अमंगळ वस्तू स्थापित करेल, ज्यामुळे ओसाडी पडेल. नेमलेल्या समाप्तीपर्यंत सर्वनाश करणार्‍यावर कोपाचा वर्षाव होईल.”

सध्या निवडलेले:

दानीएल 9: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन