दानीएल 8
8
दानीएलास मेंढा आणि बोकड यांचा दृष्टान्त
1बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी, मी जो दानीएलने पहिल्यासारखाच आणखी एक दृष्टान्त पाहिला. 2माझ्या दृष्टान्तात मी असे पाहिले की, मी एलाम प्रांतातील शूशनच्या किल्ल्यात आहे; मी दृष्टान्तात उलई नदीकाठी उभा होतो. 3मी आपले डोळे वर करून पाहिले की नदीच्या काठावर उभा असलेला एक मेंढा दिसला, त्याला दोन शिंगे होती आणि ती शिंगे लांब होती. एक शिंग दुसर्यापेक्षा अधिक लांब होते परंतु नंतर ते वाढले. 4मी पाहिले की तो मेंढा पश्चिमेकडे, उत्तरेकडे, आणि दक्षिणेकडे धडक मारीत होता. दुसर्या कोणताही प्राणी त्याच्यासमोर उभा राहू शकला नाही आणि त्याच्या सामर्थ्यापासून वाचू शकला नाही. त्याला ज्यात संतोष वाटला, ते त्याने केले आणि तो महान झाला.
5जेव्हा मी याचा विचार करीत होतो, तेव्हा मी पाहिले की एक बोकड त्याचे पाय जमिनीवर ठरत नव्हते, जो सर्व पृथ्वीला पार करून आला. या बोकडाला डोळ्यांच्या मधोमध एक ठळक शिंग होते. 6तो दोन शिंगे असलेल्या मेंढ्याजवळ आला जो नदीसमोर उभा होता आणि पूर्णशक्तीने त्याने त्यावर हल्ला केला. 7मी पाहिले की त्याने फार क्रोधित होऊन मेंढ्यावर हल्ला केला आणि धडक देत त्याचा दोन्ही शिंगांना मोडून टाकले. मेंढा त्याच्या विरोधात उभा राहण्यास शक्तिहीन होता; बोकडाने त्याला जमिनीवर आपटले आणि पायाखाली तुडविले आणि त्याच्या शक्तीपासून मेंढ्याला कोणालाही सोडविता आले नाही. 8तो बोकड फार महान झाला, परंतु तो बलिष्ठ झाल्यामुळे त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्या शिंगाच्या जागी चार ठळक शिंगे फुटली. त्यांची टोके चारही दिशांनी वाढली.
9त्यांच्यापैकी एकामधून दुसरे शिंग फुटले, लहान म्हणून त्याचा प्रारंभ झाला, परंतु दक्षिण, पूर्व आणि वैभवी देशाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाढले. 10तो आकाशाच्या सैन्यापर्यंत पोहोचेपर्यंत वाढला आणि त्याने काही ताऱ्यांचे सैन्य पृथ्वीवर फेकले आणि त्यांना तुडविले. 11त्याने स्वतःला याहवेहच्या अधिपतीप्रमाणे उच्च केले; त्याने दररोज याहवेहला अर्पण केले जाणारे यज्ञ काढून घेतले आणि त्यांचे पवित्रस्थान पाडून टाकले. 12दैनंदिन यज्ञ बंडखोरीमुळे याहवेहचे लोक#8:12 किंवा सैन्य त्याच्या हाती देण्यात आले. त्याने जे काही केले त्यात उन्नती केली आणि सत्य मातीला मिळविले.
13नंतर एका पवित्रजनाला बोलताना मी ऐकले आणि दुसरा पवित्रजन त्याला म्हणाला, “दृष्टान्त पूर्ण होण्यास किती काळ लागेल—त्या दृष्टान्तामध्ये रोजचे अर्पण, विध्वंसक पातक ज्यामुळे ओसाडी येते, पवित्रस्थानाचे समर्पण आणि याहवेहच्या लोकांना पायदळी तुडविले जाणे हे दाखविले आहे?”
14तो मला म्हणाला, “यासाठी 2,300 संध्याकाळ आणि सकाळ लागतील; नंतर पवित्रस्थान शुद्ध करण्यात येईल.”
दृष्टान्ताचा उलगडा
15मग मी दानीएल, या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा ते जाणून घेण्याच्या प्रयत्न करू लागलो, तेवढ्यात एकाएकी मानवासारखा दिसणारा कोणी एक पुरुष माझ्यासमोर उभा राहिला. 16आणि मी उलईपलीकडून आलेली एक मनुष्यवाणी मी ऐकली “हे गब्रीएला, या मनुष्यास त्याच्या दृष्टान्ताचा अर्थ सांग.”
17जिथे मी उभा होतो त्या जागेजवळ तो आला, तेव्हा मला धडकी भरली व मी जमिनीवर पालथा पडलो. तेव्हा तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, हे दृष्टान्त शेवटच्या काळाशी संबंधित आहे हे समजून घे.”
18तो माझ्याशी बोलत असतानाच मी जमिनीकडे तोंड करून गाढ झोपी गेलो. तेव्हा त्याने स्पर्श करून मला जागे केले व मला माझ्या पायांवर उभे केले.
19तो म्हणाला: “क्रोधाच्या अखेरच्या समयात काय घडणार आहे हे मी तुला सांगणार आहे, कारण हा दृष्टान्त नेमलेल्या काळाच्या समाप्तीच्या संबंधी आहे. 20जो मेंढ्याचा स्वामी आणि तू पाहिलेल्या मेंढ्याची दोन शिंगे म्हणजे मेदिया व पर्शियाचे राजे आहेत. 21तो केसाळ बोकड म्हणजे ग्रीस राष्ट्र होय आणि त्याच्या डोळ्यांच्या मधोमध मोठे शिंग म्हणजे त्या देशाचा पहिला राजा होय. 22तुटलेल्या शिंगाच्या जागी बाहेर आलेली चार शिंगे एकाच देशातून उदयास येणार्या चार राज्यांचे प्रतिनिधित्व करतात, परंतु त्यांची शक्ती पूर्वीच्या राज्यासारखी नसेल.
23“त्याच्या कारकिर्दी नंतरच्या काळात, जेव्हा बंडखोर पूर्ण दुष्टाईत येतील, तेव्हा एक भयानक रूपाचा राजा उदयास येईल, जो कूटप्रश्न समजणारा तज्ञ असेल. 24त्याचे सामर्थ्य मोठे असेल, पण ते त्याचे स्वतःचे नसेल. तो भयंकर नाश करणार आणि जे काही तो करेल, त्यामध्ये त्याला यश मिळेल. जे बलवान आणि पवित्र आहेत अशा लोकांचा तो नाश करेल. 25तो कपटाचा उपयोग समृद्ध होण्यास करेल आणि तो स्वतःला श्रेष्ठ समजेल. जेव्हा त्यांना सुरक्षित वाटेल तेव्हा तो अनेकांचा नाश करेल आणि राजपुत्रांच्या राजपुत्राच्या विरोधात उभा राहील. तरीही तो नष्ट होईल, परंतु मनुष्याच्या सामर्थ्याने नाही.
26“संध्याकाळ आणि सकाळचा दृष्टान्त जो तुला देण्यात आला आहे तो खरा आहे, पण हा दृष्टान्त तू गुप्त ठेव. कारण तो येणार्या भविष्यकाळाशी संबंधित आहे.”
27मग मी दानीएल, बेशुद्ध झालो आणि पुढेही कित्येक दिवस आजारी होतो. पुढे मी उभा झालो आणि राजाचा कारभार पाहू लागलो. परंतु या दृष्टान्तामुळे मी विस्मित झालो, माझे अंतःकरण फार अस्वस्थ झाले; ते समजण्यापलीकडे होते.
सध्या निवडलेले:
दानीएल 8: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.