2 शमुवेल 9
9
दावीद आणि मेफीबोशेथ
1दावीदाने विचारले, “योनाथानप्रीत्यर्थ ज्याच्यावर मी कृपा करावी असा शौलाच्या घराण्यातील कोणी अजून राहिला आहे काय?”
2शौलाच्या घराण्यातील सीबा नावाचा एक सेवक होता. दावीदासमोर येण्यासाठी त्यांनी त्याला बोलावून घेतले आणि राजा त्याला म्हणाला, “तू सीबा आहेस काय?”
त्याने उत्तर दिले, “मी तुमच्या सेवेस हजर आहे,”
3राजाने विचारले, “मी परमेश्वराची कृपा दाखवावी असा शौलाच्या घराण्यातील कोणीही जिवंत नाही काय?”
सीबाने राजाला उत्तर दिले, “योनाथानचा एक पुत्र अजूनही जिवंत आहे; तो दोन्ही पायांनी अधू आहे.”
4“तो कुठे आहे?” राजाने विचारले.
सीबाने उत्तर दिले, “तो लो-देबार येथे अम्मीएलचा पुत्र माखीर याच्या घरी आहे.”
5तेव्हा दावीद राजाने त्याला लो-देबार येथून अम्मीएलाचा पुत्र माखीरच्या घरून बोलावून आणले.
6जेव्हा शौलाचा पुत्र योनाथान याचा पुत्र मेफीबोशेथ दावीदाकडे आला तेव्हा त्याच्या आदरार्थ त्याने खाली वाकून दंडवत घातले.
दावीद म्हणाला, “मेफीबोशेथ!”
“मी तुमच्या सेवेस हजर आहे,” त्याने उत्तर दिले.
7दावीद त्याला म्हणाला, “भिऊ नकोस! कारण तुझा पिता योनाथान याच्याप्रीत्यर्थ मी तुझ्यावर अवश्य दया करेन. तुझे आजोबा शौल यांच्या मालकीची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या मेजावर भोजन करशील.”
8मेफीबोशेथ दंडवत घालीत म्हणाला, “तुमचा सेवक कोण आहे की, माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्याची तुम्ही नोंद घ्यावी?”
9नंतर राजाने शौलाचा सेवक सीबा याला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला, “शौलाचे व त्याच्या घराण्याचे जे काही होते ते सर्व मी तुझ्या धन्याच्या नातवाला दिले आहे. 10तू, तुझे पुत्र आणि तुझे चाकर यांनी त्याच्यासाठी त्या जमिनीची मशागत करावी आणि तुझ्या धन्याच्या नातवाला पुरवठा असावा म्हणून ते पीक आणावे. आणि मेफीबोशेथ, तुझ्या धन्याचा नातू, नेहमीच माझ्या मेजावर भोजन करेल.” (सीबाची पंधरा मुले आणि वीस चाकर होते.)
11तेव्हा सीबा राजाला म्हणाला, “माझ्या धनीराजाने आपल्या सेवकाला दिलेल्या आज्ञेनुसार आपला सेवक करेल.” याप्रमाणे राजाच्या पुत्रांसारखा मेफीबोशेथ दावीदाच्या मेजावर भोजन करीत असे.
12मेफीबोशेथला मीखा नावाचा एक लहान पुत्र होता आणि सीबाच्या घरातील प्रत्येकजण मेफीबोशेथचे चाकर होते. 13आणि मेफीबोशेथ यरुशलेम येथे राहिला कारण तो नेहमी राजाच्या मेजावर भोजन करीत असे; तो दोन्ही पायांनी अधू होता.
सध्या निवडलेले:
2 शमुवेल 9: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.