2 शमुवेल 12
12
नाथानचा दावीदाला निषेध
1नंतर याहवेहनी नाथानला दावीदाकडे पाठवले. जेव्हा नाथान त्याच्याकडे आला, तो म्हणाला, “एका शहरात दोन माणसे राहत होती, एक श्रीमंत होता तर दुसरा गरीब. 2श्रीमंत माणसाजवळ पुष्कळ मेंढरे व गुरे होती, 3परंतु गरीब मनुष्याकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढीशिवाय काहीच नव्हते. त्याने ती वाढवली, ती त्याच्याबरोबर आणि त्याच्या लेकरांबरोबर वाढली. तिने त्याच्या अन्नामधून खाल्ले, त्याच्या प्याल्यातून पाणी प्याले आणि त्याच्या बाहूंमध्येच ती झोपी जात असे. त्याला ती आपल्या मुलीप्रमाणेच होती.
4“त्या श्रीमंत मनुष्याकडे एक पाहुणा आला. परंतु त्या श्रीमंत मनुष्याने त्या पाहुण्यासाठी भोजन बनवावे म्हणून त्याच्याकडील असलेल्या मेंढरे किंवा गुरातून घेतले नाही, त्याऐवजी त्याने त्या गरीब माणसाची ती लहान मेंढी घेऊन त्याच्याकडे आलेल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले.”
5हे ऐकून दावीद त्या माणसावर रागाने भडकला आणि नाथानला म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, ज्या मनुष्याने असे केले आहे तो मेलाच पाहिजे! 6त्याने त्या मेंढीसाठी चारपट किंमत मोजावी, कारण त्याने दया न करता असे कृत्य केले आहे.”
7तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तो मनुष्य तूच आहेस! याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुझा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला आणि तुला शौलाच्या हातातून सोडविले. 8तुझ्या धन्याचे घर मी तुला दिले आणि तुझ्या धन्याच्या स्त्रिया तुझ्या बाहूंमध्ये दिल्या. मी तुला संपूर्ण इस्राएल आणि यहूदीया दिले. आणि हे सर्व फार थोडेच होते तर, मी तुला अधिक दिले असते. 9याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते करून तू याहवेहचा शब्द का अवमानीत केला आहेस? उरीयाह हिथी याला तू तलवारीने मारून टाकलेस आणि त्याची पत्नी तू आपली स्वतःची पत्नी म्हणून घेतली आहेस. तू त्याला अम्मोन्यांच्या तलवारीने ठार मारलेस. 10तर आता, तलवार तुझ्या घराण्याला कधीही सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ लेखले आणि उरीयाह हिथीची पत्नी तू स्वतःची पत्नी म्हणून घेतली आहेस.’
11“याहवेह असे म्हणतात: ‘तुझ्याच घराण्यातून मी तुझ्यावर अरिष्ट आणणार आहे. तुझ्या डोळ्यांसमोर मी तुझ्या स्त्रिया घेऊन तुझ्या जिवलगाला देईन आणि तो दिवसाच्या प्रकाशात तुझ्या स्त्रियांशी संबंध ठेवील. 12तू हे गुप्तपणे केलेस, परंतु मी हे दिवसाच्या प्रकाशात सर्व इस्राएलसमोर करेन.’ ”
13नंतर दावीद नाथानाला म्हणाला, “मी याहवेहविरुद्ध पाप केले आहे.”
नाथानाने उत्तर दिले, “याहवेहने तुझे पाप दूर केले आहे. तू मरणार नाहीस. 14परंतु हे कृत्य करून तू याहवेहचा भयंकर अनादर#12:14 जुन्या इब्री प्रतींमध्ये शत्रूंपुढे अनादर केला आहेस, या कारणाने तुझ्यापासून जन्मलेला मुलगा मरण पावेल.”
15नाथान घरी निघून गेल्यानंतर, उरीयाहच्या पत्नीपासून दावीदाला झालेल्या मुलावर याहवेहने वार केला आणि तो आजारी पडला. 16दावीदाने मुलासाठी परमेश्वराकडे याचना केली. त्याने उपास केला व गोणपाट घालून रात्रभर जमिनीवर पडून राहिला. 17त्याच्या घरातील वडील लोक त्याला जमिनीवरून उठविण्यासाठी त्याच्या बाजूला उभे राहिले, परंतु त्याने नकार दिला आणि त्याने त्यांच्याबरोबर काहीही अन्न खाल्ले नाही.
18सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मूल मरण पावले आहे हे दावीदाला सांगण्यासाठी त्याचे सेवक घाबरत होते, कारण त्यांना वाटले, “मूल जिवंत असताना आम्ही त्याला समजाविले पण तो आमचे ऐकत नव्हता. तर आता आम्ही त्याला कसे सांगावे की, मूल मरण पावले आहे? तो स्वतःला काही अपाय करून घेईल.”
19आपले सेवक एकमेकात कुजबुज करीत आहेत असे दावीदाच्या लक्षात आले, आणि त्याला समजले की मूल मरण पावले आहे. त्याने विचारले, “मूल मरण पावले आहे काय?”
“होय, तो मरण पावला आहे.” त्यांनी उत्तर दिले.
20तेव्हा दावीद जमिनीवरून उठला, त्याचे स्नान झाल्यानंतर, तैलाभ्यंग करून आपले कपडे बदलले व याहवेहच्या घरात जाऊन त्याने आराधना केली, मग तो आपल्या स्वतःच्या घरात गेला व त्याने मागितल्यानुसार त्यांनी त्याच्यापुढे अन्न वाढले, आणि त्याने ते खाल्ले.
21त्याच्या सेवकांनी त्याला विचारले, “तुम्ही हे असे का वागत आहात? मूल जेव्हा जिवंत होते, तेव्हा तुम्ही उपास केला आणि रडलात, परंतु आता मुलाचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही उठून भोजन करीत आहात.”
22त्याने उत्तर दिले, “मूल अजून जिवंत होते तेव्हा मी उपास केला आणि रडलो, मला वाटले, ‘न जाणो याहवेहची कृपा कदाचित माझ्यावर होईल आणि ते मुलाला वाचवतील.’ 23परंतु आता तो मरण पावला आहे, तर मी उपास का करावा? मी त्याला पुन्हा परत आणू शकणार आहे काय? मी त्याच्याकडे जाईन, परंतु तो माझ्याकडे परत येणार नाही.”
24नंतर दावीदाने आपली पत्नी बथशेबा हिचे सांत्वन केले आणि तो तिच्याकडे गेला आणि त्याने तिच्याशी प्रीतिसंबंध केला. तिने एका पुत्राला जन्म दिला आणि त्यांनी त्याचे नाव शलोमोन असे ठेवले. याहवेहने त्याच्यावर प्रीती केली; 25कारण याहवेहने त्याच्यावर प्रीती केली, म्हणून याहवेहने नाथान संदेष्ट्याद्वारे निरोप पाठवून त्याचे नाव यदीदियाह#12:25 यदीदियाह म्हणजे याहवेहला प्रिय असे ठेवले.
26त्या कालांतरात योआबाने अम्मोन्यांचा राब्बाह नगर याच्याविरुद्ध लढाई केली आणि राजदूर्ग ताब्यात घेतले. 27नंतर योआबाने संदेशवाहकांना दावीदाकडे निरोप पाठवित सांगितले, “मी राब्बाहशी युद्ध केले आणि राजदूर्ग ताब्यात घेऊन त्या शहराचा पाणी पुरवठा हस्तगत केला आहे. 28तर आता उरलेले सैन्य गोळा करा आणि शहराला वेढा घाला आणि ते ताब्यात घ्या. नाहीतर मी ते शहर घेईन आणि ते माझ्या नावावर होईल.”
29त्याप्रमाणे दावीदाने संपूर्ण सैन्य एकत्रित केले आणि तो राब्बाह शहराकडे गेला आणि त्यावर हल्ला करून ते ताब्यात घेतले. 30दावीदाने त्यांच्या राजाच्या डोक्यावरून मुकुट काढून घेतला आणि तो स्वतःच्या डोक्यावर ठेवला. त्याचे वजन सोन्याचा एक तालांत#12:30 अंदाजे 34 कि.ग्रॅ. होते व त्यावर मोलवान रत्ने जडविलेली होती. दावीदाने त्या शहरातून मोठ्या प्रमाणात लूट घेतली 31आणि त्या शहरातील लोक जे तिथे होते त्यांना त्याने बाहेर आणले, व त्यांना करवती, लोखंडी कुदळ आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने मजुरी करण्यास लावले आणि त्याने त्यांना वीटभट्टीवर काम करावयास लावले. दावीदाने अम्मोन्यांच्या नगरांचे असे केले. नंतर तो व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमास परतले.
सध्या निवडलेले:
2 शमुवेल 12: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.