2 शमुवेल 11
11
दावीद आणि बथशेबा
1त्याकाळी वसंतॠतूमध्ये राजे लोक युद्धावर जात असत, तेव्हा दावीदाने राजाची माणसे आणि संपूर्ण इस्राएली सैन्याबरोबर योआबाला पाठवले. त्यांनी अम्मोनी सैन्याचा नाश केला आणि राब्बाह शहराला वेढा घातला. परंतु दावीद यरुशलेमात राहिला.
2एके संध्याकाळी दावीद त्याच्या बिछान्यावरून उठला आणि आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरू लागला. गच्चीवरून त्याने एका स्त्रीला स्नान करताना पाहिले. ती स्त्री फार सुंदर होती, 3दावीदाने तिच्याबद्दल चौकशी करण्यासाठी कोणा एकाला पाठवले. तो मनुष्य म्हणाला, “ती एलीयामची कन्या, हिथी उरीयाहची पत्नी, बथशेबा आहे.” 4तेव्हा दावीदाने दूत पाठवून तिला बोलावून घेतले. ती त्याच्याकडे आली आणि त्याने तिच्याशी संबंध केला. (यावेळी ती तिच्या मासिक अशुद्धतेपासून शुद्ध होत होती.) नंतर ती परत तिच्या घरी गेली. 5ती स्त्री गर्भवती झाली आणि तिने दावीदाकडे निरोप पाठवित म्हटले, “मी गर्भवती आहे.”
6मग दावीदाने योआबाला निरोप पाठवला: “उरीयाह हिथी याला माझ्याकडे पाठव.” आणि योआबाने त्याला दावीदाकडे पाठवले. 7जेव्हा उरीयाह त्याच्याकडे आला, तेव्हा दावीदाने त्याची विचारपूस करत विचारले योआब कसा आहे, शिपाई कसे आहेत आणि युद्ध कसे चालले आहे. 8नंतर दावीद उरीयाहला म्हणाला, “तुझ्या घरी जा आणि आपले पाय धू.” तेव्हा उरीयाह राजवाड्यातून निघाला आणि त्याच्यामागोमाग राजाकडून एक बक्षीस पाठवले गेले. 9परंतु उरीयाह राजवाड्याच्या प्रवेशद्वारातच त्याच्या धन्याच्या सेवकांबरोबर झोपला, तो त्याच्या घरी गेला नाही.
10दावीदाला कोणी सांगितले, “उरीयाह घरी गेला नाही.” तेव्हा त्याने उरीयाहाला विचारले, “तू आताच लष्कराच्या मोहिमेवरून आलास नाही काय? तू घरी का गेला नाहीस?”
11उरीयाह दावीदाला म्हणाला, “कोश आणि इस्राएल आणि यहूदीया हे तंबूत#11:11 किंवा सुक्कोथमध्ये राहत आहेत आणि माझा सेनापती योआब आणि माझ्या धन्याची माणसे उघड्या मैदानात तळ देऊन आहेत. तर मी माझ्या घरी जाऊन खाणेपिणे आणि माझ्या पत्नीशी प्रेम कसे करू शकतो? तुमच्या जिवाची शपथ, मी अशी गोष्ट करणार नाही!”
12तेव्हा दावीद त्याला म्हणाला, “आणखी एक दिवस येथेच राहा, उद्या मी तुला परत पाठवेन.” त्याप्रमाणे उरीयाह तो दिवस आणि दुसरा दिवस यरुशलेममध्ये राहिला. 13दावीदाने त्याला आमंत्रण दिल्यावरून त्याने त्याच्याबरोबर खाणेपिणे केले आणि तो मस्त होईपर्यंत दावीदाने त्याला मद्य पाजले. परंतु संध्याकाळी उरीयाह त्याच्या धन्याच्या सेवकांमध्ये त्याच्या चटईवर झोपण्यासाठी गेला; तो घरी गेला नाही.
14सकाळी दावीदाने योआबाला एक पत्र लिहिले आणि ते उरीयाहच्या हाती पाठवले. 15त्यात त्याने असे लिहिले, “तुंबळ युद्धाच्या तोंडी उरीयाहला ठेवा; आणि त्याच्यापासून मागे या म्हणजे त्याच्यावर वार होईल व तो मरण पावेल.”
16म्हणून जिथे योआबने शहराला वेढा घातला होता, तेव्हा त्याला माहीत होते की, शूर योद्धे कुठे असतील तिथे त्याने उरीयाहला ठेवले. 17जेव्हा त्या शहराची माणसे बाहेर आली आणि त्यांनी योआबाविरुद्ध लढाई केली, तेव्हा दावीदाच्या सैन्यातील काही माणसे युद्धात पडली; व उरीयाह हिथी सुद्धा मारला गेला.
18योआबने दावीदाकडे लढाईचा संपूर्ण वृतांत पाठवला. 19त्याने संदेशवाहकाला सूचना दिली: “राजाला या लढाईचा वृत्तांत दिल्यानंतर, 20राजाचा राग भडकेल आणि ते तुला विचारतील, ‘लढण्यासाठी तुम्ही त्या शहराच्या इतक्या जवळ का गेला? ते नगराच्या तटावरून बाण सोडतील याची कल्पना तुम्हाला नव्हती काय? 21यरुब्बशेथचा#11:21 अर्थात् गिदोन पुत्र अबीमेलेख याला कोणी मारले? एका स्त्रीने जात्याची तळी भिंतीवरून टाकून तेबेस येथे त्याला मारले नाही काय? तुम्ही त्या भिंतीच्या इतक्या जवळ का गेला?’ जर राजा तुला असे विचारतील, तेव्हा त्यांना सांग, ‘तुमचा सेवक उरीयाह हिथी हा सुद्धा मरण पावला आहे.’ ”
22त्याप्रमाणे संदेशवाहक निघाला आणि पोहोचल्यानंतर त्याने दावीदाला ते सर्वकाही सांगितले जे सांगण्यासाठी योआबने त्याला पाठवले होते. 23संदेशवाहक दावीदाला म्हणाला, “ती माणसे आमच्यावर प्रबळ झाली आणि मोकळ्या मैदानात त्यांनी आमच्यावर हल्ला केला, परंतु आम्ही त्यांना शहराच्या प्रवेशद्वाराकडे परत लावून दिले. 24तेव्हा तिरंदाजांनी वेशीच्या तटांवरून तुमच्या सेवकांवर बाणांनी हल्ला केला आणि राजाची काही माणसे मारली गेली. याशिवाय, आपला सेवक उरीयाह हिथी हा सुद्धा मरण पावला आहे.”
25दावीदाने त्या संदेशवाहकाला म्हटले, “योआबाला सांग, ‘यामुळे तू निराश होऊ नकोस, कारण तलवार जसे एकाचा तसेच दुसर्याचाही नाश करते. त्या शहराविरुद्ध अधिक नेटाने हल्ला करा आणि त्याचा नाश करा.’ योआबाला उत्तेजित करण्यासाठी हे तू त्याला सांग.”
26जेव्हा उरीयाहच्या पत्नीने ऐकले की, तिचा पती मारला गेला, तिने त्याच्यासाठी शोक केला. 27शोककाळ संपल्यानंतर दावीदाने तिला आपल्या घरी बोलावून घेतले आणि ती त्याची पत्नी झाली आणि तिने त्याच्या पुत्राला जन्म दिला. परंतु दावीदाने जे केले होते त्यामुळे याहवेह असंतुष्ट झाले होते.
सध्या निवडलेले:
2 शमुवेल 11: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.