2 राजे 17
17
इस्राएलाचा शेवटचा राजा होशे
1यहूदीयाचा राजा आहाजच्या राजवटीच्या बाराव्या वर्षी एलाहचा पुत्र होशे शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला, त्याने नऊ वर्षे राज्य केले. 2त्याने याहवेहच्या दृष्टीत वाईट ते केले, परंतु त्याच्यापूर्वी जे इस्राएलचे राजा होऊन गेले त्यांच्याइतके केले नाही.
3अश्शूरचा राजा शल्मनेसरने होशेवर हल्ला करून, त्याला जहागीरदार केले आणि त्याला कर द्यावा लागला. 4परंतु अश्शूरच्या राजाला होशे फितूर झाल्याचे कळले, कारण त्याने इजिप्त देशाचा राजा सो#17:4 सो किंवा ओसोक्रोन नावाचे संक्षिप्त रूप याच्याकडे दूत पाठविले होते, आणि राजाला निरोप दिला आणि त्याने अश्शूरच्या राजाला दरवर्षीप्रमाणे कर देण्याचे नाकारले. म्हणून अश्शूरचा राजा शल्मनेसरने त्याला कैद केले आणि त्याला तुरुंगात डांबले. 5आता अश्शूरच्या राजाने संपूर्ण देशावर आक्रमण केले आणि शोमरोनवर चालून गेला आणि तीन वर्षे त्याला वेढा घातला. 6होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन ताब्यात घेतले आणि इस्राएली लोकांना बंदिवान करून अश्शूरला नेले आणि तिथे हलह आणि हाबोर नदीच्या काठावर वसलेल्या गोजान भागात तसेच मेदिया प्रदेशातील नगरांमध्ये वसविले.
इस्राएल पापांमुळे बंदिवासात जाते
7हे सर्व यासाठी घडले की इस्राएलने याहवेह त्यांच्या परमेश्वराविरुद्ध पाप केले, ज्यांनी त्यांना इजिप्तचा राजा फारोहच्या हातून इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले होते, त्यांनी इतर दैवतांची उपासना केली 8आणि जी राष्ट्रे याहवेहने त्यांच्यापुढून घालवून दिली होती, त्यांच्या चालीरीतींचे, त्याचप्रमाणे इस्राएली राजांनी घातलेल्या चालीरीतींचे अनुसरण केले. 9इस्राएली लोकांनी त्यांचे याहवेह परमेश्वराविरुद्ध गुप्तपणे, जे अयोग्य होते ते केले. त्यांनी स्वतःसाठी सर्व नगरामध्ये पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तर तटबंदीच्या सर्वठिकाणी उच्च स्थाने बांधली. 10त्यांनी प्रत्येक डोंगरावर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली मूर्ति स्थापिल्या आणि अशेरा मूर्तीचे स्तंभ उभारले. 11ज्या राष्ट्रांना याहवेहने त्यांच्यापुढून घालवून दिले होते, त्यांच्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक उंचस्थानी धूप जाळले. याहवेहला क्रोध येईल अशी वाईट कृत्ये केली. 12याहवेहने त्यांना सांगितले होते, “तुम्ही असे करू नये” तरी त्यांनी मूर्तींची उपासना केली. 13याहवेहने इस्राएल आणि यहूदीयाला सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे चेतावणी दिली होती: “तुमच्या दुष्ट मार्गापासून परावृत्त व्हा. मी तुमच्या पूर्वजांना आज्ञा दिलेल्या आणि माझ्या सेवक संदेष्ट्यांद्वारे तुमच्यापर्यंत पाठविलेल्या संपूर्ण नियमानुसार माझ्या आज्ञा व विधीचे पालन करा.”
14परंतु त्यांनी याहवेहचे ऐकले नाही आणि ज्यांनी याहवेह आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही, अशा आपल्या पूर्वजांप्रमाणे ते ताठ मानेचे राहिले, 15त्यांनी याहवेहचे विधी आणि त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार व त्यांचे नियम पाळण्याचा इशारा दिला होता तो त्यांनी नाकारला. ते निरर्थक मूर्तींच्या मागे लागले आणि स्वतःही निरर्थक झाले. जरी परमेश्वराने त्यांना आदेश दिला होता, “ते जसे करतात तसे करू नका,” तरी त्यांनी त्यांच्या सभोवतालच्या राष्ट्रांचे अनुकरण केले.
16त्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या, सर्व आज्ञांचा त्याग केला आणि स्वतःसाठी दोन वासरांच्या मूर्ती घडविल्याआणि अशेरास्तंभ घडविले. सर्व नक्षत्रगणांची आणि बआल दैवताची उपासना केली. 17त्यांनी आपल्या पुत्रकन्यांचे अग्नीत अर्पण केले. ज्योतिष्यांचा सल्ला घेतला. शकुनविद्येचा उपयोग केला व याहवेहच्या दृष्टीने जे वाईट त्याकरिता त्यांनी स्वतःला विकून त्यांचा क्रोध आपल्यावर भडकविला.
18म्हणून याहवेह इस्राएलावर फार संतापले आणि त्यांना आपल्या उपस्थितीतून घालवून दिले. फक्त यहूदाहचे गोत्र तेवढेच राहिले, 19परंतु यहूदीयानेही याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी इस्राएलींनी सुरू केलेल्या पद्धतींचे पालन केले. 20यामुळे याहवेहने सर्व इस्राएली लोकांचा त्याग केला; त्यांनी त्यांना पीडा देऊन लुटणार्यांच्या हाती दिले व आपल्या उपस्थितीतून काढून टाकले.
21जेव्हा याहवेहने इस्राएल दावीदाच्या घराण्यापासून फाडून काढला, तेव्हा इस्राएली लोकांनी नेबाटाचा पुत्र यराबामास आपला राजा केले. तेव्हा यरोबोअमाने इस्राएली लोकांना याहवेहच्या मागे जाण्यापासून बहकविले आणि त्यांना फार मोठे पाप करण्यास लावले. 22इस्राएली लोक यरोबोअमच्या सर्व पापांमध्ये टिकून राहिले आणि त्यांच्यापासून फिरले नाही, 23जोपर्यंत याहवेहने त्यांना आपल्या उपस्थितीतून घालवून दिले नाही. जी चेतावणी त्यांनी आपल्या सर्व सेवक संदेष्ट्यांद्वारे दिली होती. म्हणून इस्राएली लोकांना त्यांच्या देशातून बंदिवान म्हणून अश्शूरात नेण्यात आले व आजपर्यंत ते तिथेच आहे.
शोमरोनात पुनर्वसन झाले
24मग अश्शूरच्या राजाने बाबेलच्या, कूथाह, अव्वा, हमाथ व सफरवाईम येथील लोकांच्या वसाहती हालवून त्यांना शोमरोनात इस्राएलांच्या जागी वसाहती करावयास लावल्या. त्यांनी शोमरोन ताब्यात घेतला आणि त्या नगरात राहू लागले. 25जेव्हा ते तिथे राहू लागले, प्रारंभी त्यांनी याहवेहची उपासना केली नाही; म्हणून त्यांनी सिंहांना त्यांच्यामध्ये पाठवून त्यांच्यापैकी काही जणांना ठार केले. 26अश्शूरच्या राजाकडे याचा निरोप सांगण्यात आला: “ज्या लोकांना तुम्ही त्यांच्या देशातून हाकलून दिले आणि शोमरोनच्या नगरांत स्थायिक केले त्यांना त्या देशाच्या देवाला काय हवे हे माहीत नाही. त्यांनी त्यांच्यामध्ये सिंहांना पाठविले जे त्यांना ठार मारीत आहेत, कारण देवाला काय हवे हे त्या लोकांना माहीत नाही.”
27तेव्हा अश्शूरच्या राजाने हे फर्मान काढले: “शोमरोनामधून बंदिवान करून आणलेल्या याजकांपैकी एका याजकाला तिथे पाठवा, जेणेकरून तो तिथे राहील आणि लोकांना त्या देशातील देवाला काय हवे ते शिकविल.” 28म्हणून शोमरोनातून बंदिवासात पाठविलेला एक याजक बेथेल येथे राहायला आला आणि त्याने त्यांना याहवेहची उपासना कशी करावी हे शिकविले.
29तरीसुद्धा, प्रत्येक राष्ट्रांतून आलेल्या लोकांनी आपआपले दैवत बनविले, आणि शोमरोनी लोकांनी बांधलेल्या उच्चस्थानी त्यांची स्थापना केली, प्रत्येक राष्ट्रांतून आलेल्या लोकांनी आपआपल्या नगरात असेच केले. 30बाबेलमधील लोकांनी सुक्कोथ-बनोथ मूर्ती केली. कूथमधील लोकांनी नेरगल केला व हमाथातील लोकांनी अशीमा केली; 31अव्वी लोकांनी निभज व तर्ताक केले आणि सफरवी लोकांनी तर अद्राम्मेलेक व अनम्मेलेक या आपल्या दैवतांच्या वेद्यांवर आपल्या मुलामुलींचे अग्नीत बळी दिले. 32त्यांनी याहवेहची उपासना केली, परंतु त्यांनी त्यांच्या लोकांची उच्च स्थानावरील मंदिरांमध्ये याजक म्हणून नियुक्त केले. 33ते याहवेहची उपासना करीत असले, तरी ज्या देशातून ते आले होते, त्या देशाच्या चालीरीतींप्रमाणे ते आपल्या स्वतःच्या दैवतांची उपासना करीत असत.
34ते आजवर याहवेहची उपासना करीत नाही किंवा याहवेहने ज्यांचे नाव इस्राएल असे ठेवले त्या याकोबाच्या वंशजांना जे विधी आणि नियम, कायदे आणि आज्ञा दिल्या त्याचे ते पालन करत नाहीत. 35जेव्हा याहवेहने इस्राएली लोकांसोबत करार केला, तेव्हा त्यांनी त्यांना आज्ञा केली: “इतर दैवतांची उपासना करू नका किंवा त्यांना नमन करू नका, त्यांची सेवा करू नका किंवा त्यांना यज्ञार्पणे करू नका. 36परंतु ज्या याहवेहने आपल्या अलौकिक सामर्थ्याने आणि वाढविलेल्या भुजांनी इजिप्तमधून त्यांना बाहेर आणले होते केवळ त्याच याहवेहची तुम्ही उपासना करावी. त्यांनाच तुम्ही नमन करावे आणि त्यांनाच यज्ञार्पणे अर्पण करावी. 37त्यांनी लिहून दिलेल्या विधी आणि नियम, कायदे आणि आज्ञा यांचे तुम्ही खात्रीने नेहमी काळजीपूर्वक पालन करावे. इतर दैवतांची उपासना करू नका. 38मी तुमच्याशी केलेला करार विसरू नका आणि इतर दैवतांची उपासना करू नका. 39तुम्ही फक्त याहवेह तुमच्या परमेश्वराचीच उपासना करावी; तेव्हा ते तुम्हाला तुमच्या सर्व शत्रूंच्या हातून सोडवितील.”
40त्यांनी याहवेहचे ऐकले नाही, परंतु त्यांच्या आधीच्या रीतींना ते चिकटून राहिले. 41हे लोक याहवेहची उपासना करीत असतानाही ते त्यांच्या मूर्तीची सेवा करीत होते. आजवर त्यांची मुले आणि नातवंडेही त्यांच्या पूर्वजांनी केले तसेच करीत आहेत.
सध्या निवडलेले:
2 राजे 17: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.