2 राजे 16
16
यहूदाचा राजा आहाज
1इस्राएलाचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकहच्या कारकिर्दीच्या सतराव्या वर्षी यहूदीयाचा राजा योथामचा पुत्र आहाज राज्य करू लागला. 2वयाच्या विसाव्या वर्षी आहाज राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. त्याचे वडील दावीदाने केले त्याप्रमाणे, याहवेह त्याच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले नाही. 3त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले आणि आपल्या पुत्राचे अग्नीत अर्पण केले, राष्ट्रांच्या ज्या अमंगळ प्रथा याहवेहने इस्राएल लोकांतून काढून टाकल्या होत्या त्यात तो गुंतला. 4त्याने डोंगरावर, टेकड्यांवर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली यज्ञार्पणे केली आणि धूप जाळला.
5मग अरामचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकह यांनी यरुशलेमवर हल्ला केला आणि आहाजाला वेढा दिला, परंतु ते त्याच्यावर विजय प्राप्त करू शकले नाहीत. 6त्यावेळी अरामचा राजा रसीनने एलाथ हे शहर जिंकून घेतले आणि त्याने यहूद्यांना हुसकावून लावले. ते अरामात सामील केले. त्या शहरातून व एदोमी लोकांनी येऊन एलाथ येथे वस्ती केली आणि आजही अरामी लोक तिथे राहत आहेत.
7आहाज राजाने अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसरकडे आपले दूत पाठवून त्याला संदेश दिला, “मी तुमचा दास आणि पुत्र आहे. वर येऊन अरामी राजा आणि इस्राएली राजा यांच्यापासून माझा बचाव करा, ज्यांनी माझ्यावर आक्रमण केले आहे.” 8आणि आहाजाने याहवेहच्या मंदिरातील आणि राजवाड्यातील भांडारांतील चांदी आणि सोने घेतले आणि अश्शूरच्या राजाला भेट म्हणून दिल्या. 9अश्शूरच्या राजाने त्याची मागणी ऐकली. त्याने दिमिष्कावर हल्ला केला आणि त्याला ताब्यात घेतले. तेथील लोकांना धरून कीर येथे नेले आणि रसीनलाही ठार मारले.
10मग आहाज राजा तिग्लथ-पिलेसर अश्शूरच्या राजाला भेटावयास दिमिष्क येथे गेला. त्याने दिमिष्क येथे एक वेदी पाहिली आणि त्याने, तिचा आकार व आराखडा तयार करून तो उरीयाह याजकाकडे पाठवून दिला. 11आहाज राजाने दिमिष्क येथून पाठविलेल्या सर्व आराखड्यानुसार उरीयाह याजकाने एक वेदी बांधली आणि राजा आहाज परत येण्यापूर्वी ती पूर्ण केली. 12जेव्हा राजा दिमिष्क येथून परत आला आणि त्याने वेदी पाहिली, तो वेदीजवळ गेला आणि त्यावर त्याने अर्पण सादर केले. 13त्याने वेदीवर त्याचे होमार्पण आणि अन्नार्पण अर्पण केले, त्याने आपले पेयार्पण अर्पण ओतले, आणि शांत्यर्पणाचे रक्त वेदीवर शिंपडले. 14मग त्याने कास्य वेदी जी याहवेहच्या समोर होती, ती त्याने मंदिराच्या पुढून आणली—नवीन वेदी आणि याहवेहच्या मंदिराच्या मधून आणली—आणि नवीन वेदीच्या उत्तरेस ठेवली.
15मग आहाज राजाने उरीयाह याजकाला हे आदेश दिले: “या नव्या मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे अन्नार्पण, राजाची होमार्पण, अन्नार्पण आणि देशातील सर्व लोकांची होमार्पण, आणि त्यांची पेयार्पण ही अर्पण करीत जा. होमार्पणाचे सर्व रक्त आणि यज्ञाचे सर्व रक्त या वेदीवर शिंपडावे. कास्याची जुनी वेदी माझ्यासाठी शकुन पाहण्यासाठी असावी.” 16आहाज राजाने आदेश दिल्याप्रमाणे उरीयाह याजकाने केले.
17आहाज राजाने बैठकीवरचे नक्षीकाम काढून टाकले आणि त्यावरील पाण्याची टाकी आणि त्यांचे आधार काढून टाकले. कास्याच्या बैलांच्या पाठीवर बसविलेले हौदही त्याने काढले आणि ते दगडाच्या ओट्यावर ठेवले. 18अश्शूरच्या राजामुळे त्याने शब्बाथ दिवशी वापरल्या जाणाऱ्या याहवेहच्या मंदिरातील द्वारमंडप#16:18 किंवा सिंहासनाचे व्यासपीठ आणि राजासाठी बाहेरचा दरवाजा काढून टाकला.
19आहाजाच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने काय केले हे यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेले नाही काय? 20आहाज आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. त्याचा पुत्र हिज्कीयाह वारस म्हणून राजा झाला.
सध्या निवडलेले:
2 राजे 16: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.