YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 14

14
यहूदीयाचा राजा अमस्याह
1यहोआहाजचा पुत्र इस्राएलाचा राजा यहोआशच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी यहूदीयाचा राजा योआशचा पुत्र अमस्याह राज्य करू लागला. 2वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तो राजा झाला, त्याने यरुशलेमात एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहोअदान होते; ती यरुशलेमची होती. 3त्याने याहवेहच्या दृष्टीने योग्य ते केले, परंतु त्याचा पिता दावीदासारखे नव्हे. त्याने प्रत्येक गोष्टीत त्याचा पिता योआशचे अनुकरण केले. 4तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नाहीत आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत.
5राज्य त्याच्या पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर त्याने त्याचा पिता राजाचा वध करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्युदंड दिला. 6परंतु त्याने त्यांच्या मुलांना जिवे मारले नाही, कारण नियमशास्त्रात, मोशेच्या पुस्तकात याहवेहने आज्ञा दिली होती: “आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरतील.”
7त्याने क्षार खोर्‍यात दहा हजार एदोमी लोकांना ठार केले. त्याने सेला नगरावर हल्ला करून ते जिंकले व त्याचे नाव योकथएल असे ठेवले, आजही ते याच नावाने ओळखले जाते.
8मग अमस्याहने इस्राएलचा राजा, येहूचा पुत्र यहोआहाजचा पुत्र यहोआशला दूतांच्या द्वारे संदेश पाठवून असे आव्हान केले, “चल ये, युद्धात एकमेकांचा सामना करू.”
9परंतु इस्राएलचा राजा यहोआशने यहूदीयाचा राजा अमस्याहला उत्तर दिले: “लबानोनमधील एका काटेरी झुडूपाने लबानोनमधील एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या मुलीचा विवाह माझ्या मुलाशी करून दे.’ तेव्हा लबानोनमधून एका जंगली श्वापदाने येऊन त्या काटेरी झुडूपाला पायाखाली तुडविले. 10खचितच तू एदोमाचा पराभव केला आहेस आणि त्यामुळे तू उन्मत्त झाला आहेस. त्याचे गौरव करीत तू घरीच राहा! संकटांला आमंत्रण देऊन स्वतःचा आणि यहूदीयाचा नाश का करावा?”
11परंतु अमस्याहने ऐकले नाही, तेव्हा इस्राएलाचा राजा यहोआशने हल्ला केला. त्याने आणि यहूदीयाच्या राजा अमस्याहने यहूदीयातील बेथ-शेमेश येथे एकमेकांचा सामना केला. 12इस्राएलने यहूदाहचा पराभव केला आणि प्रत्येकजण आपआपल्या घरी पळून गेले. 13इस्राएलाचा राजा यहोआशने यहूदीयाचा राजा अहज्याहचा पुत्र, योआशाचा पुत्र अमस्याहला बेथ-शेमेश येथे कैद केले. नंतर योआश यरुशलेमास गेला आणि यरुशलेमची एफ्राईमच्या दरवाजापासून कोपर्‍याच्या दरवाजापर्यंत भिंत त्याने पाडून टाकली; जी चारशे हात लांब#14:13 अंदाजे 180 मीटर होती. 14याहवेहच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या तिजोरीतून सर्व सोने, चांदी व सापडतील ती पात्रे त्याने घेतली, त्याने कैद्यांना सुद्धा घेतले आणि तो शोमरोनास परतला.
15यहोआशाचा बाकीचा इतिहास, त्याने काय केले आणि त्याचे पराक्रम, तसेच यहूदीयाच्या अमस्याह राजाबरोबर झालेले त्याचे युद्ध यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहासग्रंथात नमूद केलेली नाही काय? 16यहोआश आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला इस्राएली राजांसोबत शोमरोनात मूठमाती देण्यात आली. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र यरोबोअम हा त्याच्या जागी राज्य करू लागला.
17इस्राएलचा राजा यहोआहाजचा पुत्र यहोआशच्या मृत्यूनंतर यहूदीयाचा राजा योआशचा पुत्र अमस्याह पंधरा वर्षे जगला. 18अमस्याहाच्या राज्यकाळातील इतर घटना, यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेल्या नाहीत काय?
19त्यांनी यरुशलेममध्ये त्याच्याविरुद्ध कट रचला आणि तो लाखीशकडे पळून गेला, परंतु त्यांनी त्याच्यामागे लाखीशकडे माणसे पाठवून दिली आणि त्याला तिथे मारले. 20त्याला घोड्यावरून परत आणण्यात आले आणि यरुशलेममध्ये दावीदाच्या शहरात त्याच्या पूर्वजांबरोबर पुरण्यात आले.
21मग यहूदीयाच्या सर्व लोकांनी अजर्‍याह#14:21 अजर्‍याह त्याचे दुसरे नाव उज्जीयाह ला घेतले, जो सोळा वर्षाचा होता आणि त्याला त्याचा पिता अमस्याहच्या जागी राजा केले. 22राजा अमस्याह आपल्या पूर्वजांना मिळाल्यानंतर अजर्‍याहाने एलाथ नगर पुन्हा वसविले व ते यहूदीयाला जोडले.
इस्राएलाचा राजा दुसरा यराबास याची कारकीर्द
23यहूदीयाचा राजा योआशाचा पुत्र अमस्याहच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी इस्राएलाचा राजा योआशचा पुत्र यरोबोअम शोमरोनात राज्य करू लागला आणि त्याने एकेचाळीस वर्षे राज्य केले. 24त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही. 25त्याने इस्राएलाची सीमा लेबो हमाथपासून अराबाच्या समुद्रापर्यंत#14:25 किंवा मृत समुद्र पुनः स्थापित केली. याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराच्या वचनाप्रमाणे गथ-हेफेर येथील संदेष्टा अमित्तयाचा पुत्र योनाहद्वारे हे भविष्य केले होते.
26इस्राएलातील प्रत्येकजण, मग तो गुलाम असो वा स्वतंत्र असो, त्यांचा फार छळ#14:26 किंवा ते कष्टात होते कारण त्यांना पुढारी नव्हता होत आहे हे याहवेहने पाहिले; त्यांना साहाय्य करणारे कोणीही नव्हते. 27आणि इस्राएलचे नाव पृथ्वीवरून पुसून टाकीन असे याहवेहने कधीच म्हटले नाही, मग याहवेहने योआशाचा पुत्र यरोबोअमद्वारे त्यांची सुटका केली.
28यरोबोअमचे बाकीचे जीवनचरित्र, त्याने केलेली कृत्ये, त्याचे थोर सामर्थ्य, त्याचे युद्ध आणि त्याने पूर्वी यहूदीयाने काबीज केलेले दिमिष्क व हमाथ परत कसे मिळविले या सर्व हकिकतीचे वर्णन, इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात लिहून ठेवले नाही काय? 29यरोबोअम त्याचे पूर्वज इस्राएली राजांना मिळाला. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र जखर्‍याह त्याच्या जागी इस्राएलावर राज्य करू लागला.

सध्या निवडलेले:

2 राजे 14: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन