YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 13

13
इस्राएलाचा राजा यहोआहाज
1यहूदीयाचा राजा अहज्याहचा पुत्र योआशच्या कारकिर्दीच्या तेविसाव्या वर्षी येहूचा पुत्र यहोआहाज शोमरोनमध्ये इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने सतरा वर्षे राज्य केले. 2पण त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएलांकडून जी पातके करविली ती त्याने अनुसरली आणि त्यापासून तो मागे फिरला नाही. 3त्याच्या पातकांमुळे याहवेहचा क्रोध इस्राएलावर भडकला आणि त्यांनी त्याला अरामचा राजा हजाएल आणि त्याचा पुत्र बेन-हदादच्या अधीनतेमध्ये बराच काळ ठेवले.
4तेव्हा यहोआहाजाने याहवेहकडे विनवणी केली आणि याहवेहने त्याचे ऐकले, कारण अरामचा राजा इस्राएलाचा अत्यंत क्रूरपणे छळ करीत होता हे त्यांनी पाहिले. 5याहवेहने इस्राएली लोकांना सोडविणारा पाठविला आणि त्यांची अरामी लोकांपासून सुटका झाली. त्यानंतर इस्राएली लोक पूर्वीप्रमाणेच आपआपल्या घरात राहू लागले. 6परंतु ते यरोबोअमाच्या घराण्याच्या पातकांपासून मागे फिरले नाहीत; जी पातके त्याने इस्राएली लोकांना करण्यास लावली होती. शोमरोनात अशेरा मूर्तीचे स्तंभ देखील उभे होते.
7यहोआहाजाकडे पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजार पायदळ याशिवाय काही शिल्लक राहिले नाही, कारण अरामी राजाने त्याच्या बाकीच्या सैन्याचा पायांखालील धुळीच्या कणांप्रमाणे संहार केला होता.
8यहोआहाजाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने जे सर्व केले आणि त्याचे पराक्रम इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात नमूद केलेले नाहीत काय? 9यहोआहाज आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला शोमरोनात मूठमाती देण्यात आली. त्याच्यानंतर त्याचा पुत्र योआश त्याच्या जागी राज्य करू लागला.
इस्राएलाचा राजा यहोआश
10यहूदीयाचा राजा यहोआशच्या कारकिर्दीच्या सदतिसाव्या वर्षी यहोआहाजाचा पुत्र योआश शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने सोळा वर्षे राज्य केले. 11त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले आणि नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या पातकांपासून मागे फिरला नाही; जी पातके त्याने इस्राएली लोकांना करण्यास लावली होती, ती तो करत राहिला.
12योआशाच्या कारकिर्दीचा बाकीचा इतिहास आणि यहूदीयाचा राजा अमस्याह याच्याबरोबर झालेले त्याचे युद्ध व त्याचे पराक्रम यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहास या ग्रंथात केला नाही काय? 13योआश आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि यरोबोअम त्याच्या राजासनावर बसला. योआशाला शोमरोनात इस्राएलांच्या राजांसोबत मूठमाती देण्यात आली.
14आता अलीशा ज्या आजाराने मरणार होता त्या आजाराने तो ग्रस्त झाला. इस्राएलाचा राजा योआश त्याला भेटावयाला खाली आला आणि त्याच्यासाठी रडला. तो रडत म्हणाला, “माझ्या पित्या! माझ्या पित्या! तुम्ही इस्राएलचे रथ आणि त्याचे स्वार!”
15अलीशा म्हणाला, “एक धनुष्य व काही बाण घे.” आणि त्याने तसेच केले. 16“आपल्या हातात धनुष्य घे,” तो इस्राएलाच्या राजाला म्हणाला. जेव्हा त्याने ते आपल्या हातात घेतले, तेव्हा अलीशाने आपला हात राजाच्या हातावर ठेवला.
17“पूर्वेकडील खिडकी उघड.” असे अलीशाने म्हटले आणि त्याने ती उघडली. तेव्हा अलीशा म्हणाला, “बाण सोड!” आणि त्याने बाण सोडला. तेव्हा अलीशाने जाहीर केले, “हा याहवेहचा विजयी बाण, अरामावर विजय मिळवून देणारा बाण आहे. तू अफेक येथे अरामी लोकांचा संपूर्ण नाश करशील.”
18नंतर त्याने म्हटले, “बाण घे,” आणि राजाने बाण घेतले. अलीशा इस्राएलच्या राजाला म्हणाला, “ते बाण जमिनीवर मार.” त्याने ते बाण तीन वेळा जमिनीवर मारले आणि थांबला. 19परमेश्वराचा मनुष्य त्याच्यावर रागावला आणि म्हणाला, “तू पाच किंवा सहा बाण जमिनीवर सोडावयास हवे होतेस; तेव्हा तू अरामचा पराभव आणि पूर्ण नाश केला असतास. परंतु आता तू फक्त तीन वेळाच त्यांचा पराभव करशील.”
20अलीशा मरण पावला व त्याला मूठमाती देण्यात आली.
मोआबातील लुटारूंच्या टोळ्या प्रत्येक वसंतॠतूत देशावर हल्ला करीत असत. 21एके दिवशी काही इस्राएली लोक एका व्यक्तीला मूठमाती देत असताना त्यांनी लुटारूंची टोळी पाहिली; म्हणून त्यांनी त्या मनुष्याचा मृतदेह अलीशाच्या कबरेत लोटून दिला. त्या मृत शरीराला अलीशाच्या अस्थींचा स्पर्श होताच, तो मृत मनुष्य जिवंत झाला आणि आपल्या पायांवर उभा राहिला.
22यहोआहाज राजाच्या संपूर्ण कारकिर्दीत अरामचा राजा हजाएल इस्राएली लोकांचा छळ करीत राहिला. 23परंतु याहवेहची कृपा इस्राएली लोकांवर होती आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या करारामुळे त्यांनी त्यांच्यावर दया केली आणि त्यांची काळजी घेतली. आजपर्यंत त्यांचा नाश करण्याची किंवा त्यांना त्यांच्या उपस्थितीतून घालवून देण्याची त्यांची इच्छा नव्हती.
24अरामचा राजा हजाएल मरण पावला आणि त्याचा पुत्र बेन-हदादच्या जागी राज्य करू लागला. 25मग यहोआहाजचा पुत्र यहोआशने हजाएलचा पुत्र बेन-हदादच्या हातून त्याचा पिता यहोआहाजशी केलेल्या युद्धात घेतलेली नगरे परत हस्तगत केली. योआशाने त्याचा तीनदा पराभव केला आणि इस्राएलाची नगरे परत घेतली.

सध्या निवडलेले:

2 राजे 13: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन