2 राजे 1
1
अहज्याहवरील याहवेहचा न्याय
1अहाब राजा मरण पावल्यानंतर मोआबाने इस्राएलविरुद्ध बंड केले. 2अहज्याह, शोमरोन येथील आपल्या राजवाड्याच्या गच्चीवरून खाली पडून जखमी झाला होता. तेव्हा त्याने आपल्या दूतांना हे सांगून पाठविले, “जा आणि एक्रोनचे दैवत बाल-जबूबला विचारा की मी या दुखण्यातून बरा होईन की नाही.”
3परंतु याहवेहच्या दूताने तिश्बी एलीयाहला निरोप देऊन म्हटले, “वर जा आणि शोमरोनाच्या राज्याच्या दूतांना भेट आणि त्यांना विचार, ‘इस्राएलमध्ये परमेश्वर नाही की काय, म्हणून तुम्ही एक्रोनचे दैवत बाल-जबूब याला विचारावयास निघाले आहात?’ 4म्हणून याहवेह हे म्हणतात की: ‘ज्या अंथरुणावर तू पडला आहेस, त्यावरून तू उठणार नाही. तू खात्रीने मरशील!’ ” मग एलीयाह निघून गेला.
5जेव्हा दूत राजाकडे परत गेले, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का परत आलात?”
6त्यांनी उत्तर दिले, “वाटेत आम्हाला एक मनुष्य भेटण्यास आला, तो म्हणाला, ‘ज्या राजाने तुम्हाला पाठविले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याला सांगा, “याहवेहचा हा संदेश आहे: इस्राएलात परमेश्वर नाही म्हणून, तू एक्रोनच्या बाल-जबूब दैवताला प्रश्न विचारतोस? म्हणून तू ज्या अंथरुणावर पडून आहेस, त्या अंथरुणावरून उठणार नाहीस. तू खात्रीने मरशील!” ’ ”
7राजाने त्यांना विचारले, “कोणत्या प्रकारचा हा व्यक्ती होता जो तुम्हाला भेटण्यास आला आणि हे तुम्हाला सांगितले?”
8त्यांनी उत्तर दिले, “त्या मनुष्याने केसाळ झगा#1:8 किंवा तो केसाळ व्यक्ती होता घातला होता आणि चामाड्याचा कंबरपट्टा बांधलेला होता.”
राजाने म्हटले, “मग तो एलीयाह तिश्बीच असला पाहिजे.”
9नंतर राजाने आपल्या एका सेनाधिकार्याला पन्नास शिपायांसह एलीयाहकडे पाठविले. सेनाधिकारी एलीयाहकडे गेला जो एका डोंगराच्या शिखरांवर बसलेला होता आणि त्याला म्हणाला, “हे परमेश्वराच्या मनुष्या, राजाने आदेश दिला आहे, ‘खाली या!’ ”
10एलीयाहने सेनाधिकार्याला म्हटले, “जर मी खराच परमेश्वराचा मनुष्य असेन, तर स्वर्गातून अग्नी उतरो आणि तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो!” तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि सेनाधिकार्यास व त्याच्या सर्व शिपायांना भस्म केले.
11तेव्हा राजाने आणखी दुसर्या एका सेनाधिकार्यास पन्नास शिपायांसह एलीयाहकडे पाठविले. सेनाधिकारी त्याला म्हणाला, “हे परमेश्वराच्या मनुष्या, राजाने आदेश दिला आहे, ‘लवकर खाली उतरून या!’ ”
12एलीयाहने उत्तर दिले, “मी परमेश्वराचा मनुष्य असेन, तर स्वर्गातून अग्नी उतरो आणि तुला, व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो.” मग परमेश्वराचा अग्नी स्वर्गातून उतरला आणि त्याला व त्याच्या पन्नास माणसांना भस्म केले.
13यानंतर राजाने तिसर्या सेनाधिकार्यास त्याच्या पन्नास लोकांसोबत पाठविले. हा सेनाधिकारी वर गेला आणि एलीयाहपुढे गुडघे टेकून त्याला विनंती केली. “हे परमेश्वराच्या मनुष्या, तुमच्या दृष्टीत माझा जीव आणि या पन्नास माणसांचा, जे तुमचे सेवक आहेत त्यांचा जीव मोलवान असो! 14पाहा, स्वर्गातून अग्नी येऊन पहिल्या दोन्ही सेनाधिकार्यांना आणि त्यांच्या सर्व माणसांना भस्म केले. परंतु आता तुमच्या दृष्टीत माझा जीव मोलवान असो!”
15याहवेहच्या दूताने एलीयाहला म्हटले, “त्याला भिऊ नकोस, त्याच्यासोबत खाली जा.” तेव्हा एलीयाह उठला आणि त्याच्यासोबत राजाकडे गेला.
16एलीयाहने राजाला सांगितले, याहवेह हे म्हणतात: “इस्राएलात परमेश्वर नाही म्हणून, तू एक्रोनच्या बाल-जबूब दैवताला प्रश्न विचारण्यास दूत पाठविले होते काय? हे कृत्य केल्यामुळे तू या दुखण्यातून उठणार नाहीस; यातच तुला खात्रीने मरण येईल.” 17एलीयाहद्वारे याहवेहने भविष्य केल्याप्रमाणे अहज्याह मरण पावला.
अहज्याहला पुत्र नव्हता म्हणून त्याचा भाऊ योराम राजा झाला. ही घटना यहूदीयाचा राजा यहोशाफाटचा पुत्र यहोरामच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी घडली. 18अहज्याहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि जे काही त्याने केले ते इस्राएलांच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहून ठेवलेले नाही का?
सध्या निवडलेले:
2 राजे 1: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.