2 इतिहास 33
33
यहूदीयाचा राजा मनश्शेह
1वयाच्या बाराव्या वर्षी मनश्शेह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात पंचावन्न वर्षे राज्य केले. 2त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, याहवेहने इस्राएली लोकांतून काढून टाकलेल्या राष्ट्रांच्या अमंगळ प्रथांचे अनुसरण त्याने केले. 3त्याचे वडील हिज्कीयाहने पाडून टाकलेली उच्च स्थाने त्याने पुन्हा बांधली; त्याने बआल दैवतांसाठी वेद्या आणि अशेराचे स्तंभ तयार केले. त्याने सर्व तारांगणांना लवून नमन केले आणि त्यांची उपासना केली. 4त्याने याहवेहच्या मंदिरात वेद्या बांधल्या, ज्यासाठी याहवेहने म्हटले होते, “यरुशलेमात माझे नाव सर्वकाळासाठी राहील.” 5याहवेहच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात त्याने सर्व तारांगणासाठी वेद्या बांधल्या. 6बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने आपल्या लेकरांचे अग्नीत अर्पण केले, ज्योतिष आणि जादूटोणा केला, शुभशकुन शोधले आणि भूतविद्यांचा सल्ला घेतला. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट अशा अनेक गोष्टी करून याहवेहचा राग पेटविला.
7जी कोरीव मूर्ती त्याने घडविली होती, ती त्याने घेतली व परमेश्वराच्या मंदिरात ठेवली. या मंदिराविषयी परमेश्वर, दावीद व त्याचा पुत्र शलोमोन यांना म्हणाले होते, “इस्राएलांच्या सर्व गोत्रांतून मी निवडलेल्या यरुशलेम शहरात व या मंदिरात माझे नाव मी सर्वकाळासाठी ठेवेन. 8जर ते फक्त मोशेद्वारे दिलेले सर्व नियम, विधी आणि आज्ञांचे काळजीपूर्वक पालन करतील तर जी भूमी मी तुमच्या पूर्वजांस दिली आहे त्यातून इस्राएली लोकांची पावले भटकू देणार नाही.” 9परंतु मनश्शेहने यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांना मार्गभ्रष्ट केले, ज्यांचा इस्राएली लोकांसमोर याहवेहने नाश केला होता, त्या राष्ट्रांपेक्षा अधिक दुष्टपणा केला.
10याहवेह मनश्शेह आणि त्याच्या लोकांशी बोलले, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. 11तेव्हा याहवेहनी अश्शूर राजाच्या सेनापतींना त्यांच्याविरुद्ध केले, त्यांनी मनश्शेहला कैद केले, त्याच्या नाकात आकडा घातला, त्याला कास्य धातूच्या बेड्यांनी बांधले आणि बाबेलला नेले. 12त्याच्या संकटात त्याने त्याचे परमेश्वर याहवेह यांची कृपा मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पूर्वजांच्या परमेश्वरासमोर स्वतःला अधिक नम्र केले. 13आणि जेव्हा त्याने त्यांच्याकडे प्रार्थना केली, तेव्हा याहवेहना त्याच्या कळकळीच्या विनंतीमुळे दया आली आणि त्यांनी त्याची विनंती ऐकली; म्हणून त्यांनी त्याला यरुशलेम आणि त्याच्या राज्यात परत आणले. तेव्हा मनश्शेहला उमजले की, याहवेह हेच परमेश्वर आहेत.
14नंतर त्याने दावीदाच्या नगराची बाहेरील भिंत गीहोन झऱ्याच्या पश्चिमेकडील खोऱ्यात, मासे फाटकाच्या प्रवेशद्वारापर्यंत आणि ओफेलच्या टेकडीला वेढा घालून ती पुन्हा बांधली; त्याने त्या भिंती जास्त उंच केल्या. त्याने यहूदीयामधील सर्व तटबंदी नगरांमध्ये सैन्याचे सेनापती नेमले.
15त्याने परकीय दैवते टाकून दिली आणि याहवेहच्या मंदिरातून मूर्ती काढून टाकली, तसेच मंदिराच्या टेकडीवर आणि यरुशलेममध्ये ज्या वेद्या त्याने बांधल्या होत्या त्या सर्व वेद्या काढल्या आणि त्या शहराबाहेर फेकून दिल्या. 16नंतर त्याने याहवेहची वेदी पुनर्स्थापित केली आणि त्यावर शांत्यर्पणे आणि उपकारस्तुतीची अर्पणे केली आणि यहूदीयाला सांगितले की, त्यांनी इस्राएलचे परमेश्वर याहवेहचीच यांचीच सेवा करावी. 17तरीसुद्धा लोकांनी उच्च स्थानावर जाऊन त्यांचे परमेश्वर याहवेह यांनाच अर्पणे करण्याचे कायम ठेवले.
18मनश्शेहच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने त्याच्या परमेश्वराकडे केलेली प्रार्थना आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांच्या नावामध्ये संदेष्ट्यांनी सांगितलेली वचने ही इस्राएली राजांच्या पुस्तकात लिहिल्या आहेत. 19त्याची प्रार्थना आणि त्याच्या कळकळीच्या विनवणीमुळे परमेश्वर दयेने कसे हेलावून गेले, तसेच त्याची सर्व पापे आणि अविश्वासूपणा आणि जिथे घटनास्थळे आहेत, तिथे त्याने उच्च स्थाने बांधली आणि अशेराचे स्तंभ आणि मूर्ती स्थापित केल्या, स्वतःला नम्र करण्याआधी केलेल्या या सर्व गोष्टी संदेष्ट्यांच्या घटनांची नोंद यामध्ये लिहिलेल्या आहेत. 20मनश्शेह मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांना मिळाला आणि त्याला त्याच्या महालात दफन केले. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र आमोन राजा झाला.
यहूदीयाचा राजा आमोन
21वयाच्या बावीसाव्या वर्षी आमोन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात दोन वर्षे राज्य केले. 22त्याने आपला पिता मनश्शेह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. मनश्शेहने तयार केलेल्या त्या सर्व मूर्तींची आमोनने पूजा केली आणि त्यांना बलिदाने अर्पण केली. 23परंतु त्याचे वडील मनश्शेह याच्या उलट, त्याने याहवेहपुढे स्वतःला नम्र केले नाही; आमोनाने त्याचे अपराध वाढविले.
24आमोनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि त्याच्या राजवाड्यात त्याची हत्या केली. 25तेव्हा त्या देशातील लोकांनी आमोन राजाविरुद्ध ज्यांनी कट रचला होता, त्या सर्वांना ठार मारले आणि त्यांनी त्याचा पुत्र योशीयाह याला त्याच्या जागेवर राजा केले.
सध्या निवडलेले:
2 इतिहास 33: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.