YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इतिहास 23

23
1सातव्या वर्षी यहोयादाने त्याचे सामर्थ्य दाखविले. त्याने शंभर तुकड्यांचे सरदार यांच्यासोबत करार केला: यरोहामचा पुत्र अजऱ्याह, यहोहानानचा पुत्र इश्माएल, ओबेदचा पुत्र अजर्‍याह, अदायाहचा पुत्र मासेयाह आणि जिक्रीचा पुत्र अलीशाफाट. 2त्यांनी यहूदीयामध्ये सर्वत्र फिरून सर्व गावातून लेवी आणि इस्राएली कुटुंबप्रमुखांना एकत्र केले. जेव्हा ते यरुशलेमकडे आले, 3तेव्हा सर्व मंडळीने परमेश्वराच्या मंदिरात राजाबरोबर एक करार केला.
यहोयादा त्यांना म्हणाला, “याहवेहनी दावीदाच्या वंशजांविषयी वचन दिल्याप्रमाणे राजाचा पुत्र राज्य करेल. 4आता तुम्ही असे करावे: तुमच्यापैकी एकतृतीयांश याजक आणि लेवी जे शब्बाथ दिवशी कर्तव्य बजावत आहेत, त्यांनी दारांवर पहारा ठेवावा, 5तुमच्यापैकी एकतृतीयांश राजवाड्यात आणि एकतृतीयांश लोकांनी पायाभरणीचे प्रवेशद्वार आणि इतर सर्वांनी याहवेहच्या मंदिराच्या प्रांगणात असावे. 6कार्यासाठी नियुक्त केलेले याजक व लेवी हे शुद्ध केलेले आहेत म्हणून यांच्याशिवाय याहवेहच्या मंदिरात कोणी प्रवेश करू नये; परंतु प्रवेश करू नये ही याहवेहची आज्ञा इतर सर्वांनी पाळावी. 7प्रत्येक लेवींनी हातात शस्त्र घेऊन राजाभोवती उभे राहावे. जो कोणी मंदिरात प्रवेश करेल त्याला जिवे मारावे. राजा जिथे जाईल तिथे तुम्ही त्याच्याजवळ राहावे.”
8यहोयादा याजकाच्या आज्ञेप्रमाणे लेवी आणि यहूदीयाच्या सर्व पुरुषांनी केले. प्रत्येकाने आपआपली माणसे घेतली; जे शब्बाथाच्या दिवशी सेवेला येणार होते आणि जे सेवा संपवून जात होते—कारण यहोयादा याजकाने कोणत्याही विभागांना सुट्टी दिली नव्हती. 9यहोयादा याजकाने परमेश्वराच्या मंदिरामधील दावीद राजाचे भाले व मोठ्या आणि लहान ढाली होत्या, त्या शताधिपतींच्या हाती दिल्या. 10त्याने सर्व पुरुषांना प्रत्येकाच्या हातात शस्त्र घेऊन राजाभोवती; मंदिराच्या दक्षिणेच्या बाजूकडून उत्तरेच्या बाजूपर्यंत; वेदीजवळ व मंदिराजवळ उभे केले.
11मग यहोयादाने व त्याच्या पुत्रांनी राजाच्या पुत्राला बाहेर आणले, त्याच्या शिरावर राजमुकुट ठेवला; त्यांनी त्याच्या हातामध्ये कराराची प्रत दिली आणि त्याला राजा म्हणून घोषित केले. मग त्यांनी त्याला अभिषेक केला व मोठ्याने जयघोष करून ते म्हणाले, “राजा चिरायू होवो!”
12जेव्हा अथल्याहने लोकांच्या धावपळीचा आणि राजाचा जयघोष करण्याचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली. 13तिने बघितले राजा प्रवेशद्वाराच्या खांबाजवळ उभा आहे. अधिकारी आणि कर्णेवादक हे राजाजवळ उभे होते आणि राष्ट्रातील सर्व लोक हर्षोल्हास करीत कर्णे वाजवित आणि वादक त्यांच्या वाद्यांसह स्तुती करीत होते. तेव्हा अथल्याहने आपली वस्त्रे फाडली आणि ओरडून म्हणाली, “फितुरी, फितुरी!”
14यहोयादा याजकाने नेमणूक केलेल्या शताधिपतीच्या सेनाधिकार्‍यांना बाहेर पाठवले, आणि त्यांना सांगितले: “सैन्याच्या रांगेतून तिला बाहेर काढा आणि जो कोणी तिच्यामागे जाईल त्याला तलवारीने मारा.” याजकाने म्हटले होते, “तिला याहवेहच्या मंदिरात जिवे मारू नये.” 15म्हणून ती राजवाड्याच्या मैदानात, घोड्यांच्या प्रवेशद्वाराकडे पोहोचताच त्यांनी तिला ताब्यात घेतले आणि तिथे त्यांनी तिला ठार मारले.
16मग यहोयादाने एक करार केला की तो, लोक आणि राजा याहवेहची प्रजा असणार. 17सर्व लोक बआलच्या मंदिराकडे गेले आणि त्यांनी ते तोडून टाकले. त्यांनी वेद्या आणि मूर्ती फोडून टाकल्या आणि बआलचा याजक मत्तान याचा वेदीसमोर वध केला.
18नंतर दावीदाने ज्यांची मंदिरात होमार्पणे करण्यासाठी नेमणूक केली होती, त्या याजकीय लेव्यांच्या हाती यहोयादाने याहवेहच्या मंदिराची देखरेख सोपविली. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे, दावीदाने सांगितल्याप्रमाणे ते आनंद करीत होते आणि गाणी गात होते. 19त्याने याहवेहच्या मंदिराच्या वेशींवर द्वारपालसुद्धा नेमले, ज्यामुळे कोणत्याही प्रकाराने अशुद्ध व्यक्तीने प्रवेश करू नये.
20त्याने त्याच्याबरोबर शताधिपती, लोकांचे राज्यकर्ते आणि देशातील सर्व लोकांना घेतले आणि याहवेहच्या मंदिरातून राजाला खाली आणले. ते वरच्या दरवाज्याने राजवाड्यात गेले आणि राजाला राजासनावर बसविले. 21राष्ट्रातील प्रत्येकजण आनंद करीत होता आणि शहर शांत झाले, कारण अथल्याहचा तलवारीने वध करण्यात आला होता.

सध्या निवडलेले:

2 इतिहास 23: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन