2 इतिहास 2
2
मंदिर बांधण्याची तयारी
1शलोमोनाने याहवेहच्या नामाने मंदिर व स्वतःसाठी राजवाडा बांधण्याची आज्ञा दिली. 2या कामासाठी शलोमोनाने 70,000 मजूर, 80,000 पाथरवट व त्यांच्यावर देखरेखीसाठी 3,600 मुकादम यांची भरती केली.
3शलोमोनाने सोरचा राजा हीराम#2:3 हीराम हुरामचे दुसरे रूप याच्याकडे हा निरोप पाठविला:
“माझे पिता दावीद यांना महाल बांधण्यासाठी पाठविले त्याप्रमाणे मलाही गंधसरूचे लाकूड पाठवावे. 4आता मी याहवेह माझे परमेश्वराच्या नामाने मंदिर बांधण्याचे आणि ते त्यांना समर्पित करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या पुढे सुगंधी धूप जाळण्याचे, समर्पित भाकर तिथे नित्यनेमाने ठेवण्याचे आणि प्रतिदिनी सकाळ व सायंकाळी, तसेच शब्बाथ, चंद्रदर्शन उत्सव व याहवेह आमच्या परमेश्वरास होमार्पणे सादर करण्याचे योजले आहे. कारण हे सर्वकाळासाठी इस्राएलास नेमलेले नियम आहेत.
5“मी जे मंदिर बांधणार आहे ते फारच भव्य होईल, कारण आमचे परमेश्वर सर्व दैवतांपेक्षा महान आहेत. 6परंतु ज्यांना स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्ग सुद्धा अपुरा आहे, त्यांच्यासाठी मंदिर बांधण्यास कोण समर्थ आहे? तर मग मंदिर बांधणारा मी कोण? केवळ त्यांच्या पुढे अर्पणे करण्यासाठी स्थान मी बांधत आहे.
7“म्हणून या कामासाठी सोने, चांदी, कास्य व लोखंड या कामात एक कुशल व हुशार कारागीर, जांभळ्या, किरमिजी व निळ्या रंगांचे कापड विणण्यात आणि उत्तम नक्षीचे कोरीव काम करण्यात तरबेज कारागीर माझ्याकडे पाठवा. माझ्याजवळ यहूदीयात व यरुशलेममध्ये, माझे पिता दावीदाने निवडलेले जे निपुण कारागीर आहेत, त्यांच्याबरोबर तो काम करेल.
8“याशिवाय लबानोनच्या जंगलातून गंधसरू, देवदारू व रक्तचंदन यांची लाकडे माझ्याकडे पाठवा. लाकडे कापून पाठविण्याच्या कामी तुमचे लोक निष्णात आहेत हे मी जाणतो. माझे कारागीर तुमच्या कारागिरांसह काम करतील. 9जे मंदिर मी बांधणार आहे ते अत्यंत विशाल व भव्य असेल, म्हणून लाकडाचा फारच मोठा साठा लागेल. 10तुमच्या लाकूड तोडणाऱ्या सेवकांना मी वीस हजार कोर#2:10 अंदाजे 3,200 मेट्रिक टन झोडलेला गहू, वीस हजार कोर#2:10 अंदाजे 2,700 मेट्रिक टन जव, द्राक्षारसाचे वीस हजार बथ#2:10 अंदाजे 440,000 लीटर व वीस हजार जैतुनाच्या तेलाचे बथ देईन.”
11सोरचा राजा हीरामाने शलोमोन राजाच्या पत्रास असे उत्तर पाठविले:
“कारण याहवेह आपल्या लोकांवर प्रेम करतात, त्यामुळेच त्यांनी तुम्हाला त्यांचा राजा केले आहे.”
12हीराम पुढे हे देखील म्हणाला,
“इस्राएलचे परमेश्वर याहवेह धन्यवादित असो, ज्यांनी स्वर्ग आणि पृथ्वी उत्पन्न केली! त्यांनी दावीद राजाला तुमच्यासारखा सुज्ञ, बुद्धिमान व समजूतदार पुत्र दिला, जो याहवेहचे मंदिर व स्वतःसाठी राजवाडा बांधेल.
13“माझ्याकडे असलेला अत्यंत निष्णात असा हुराम-आबी हा कारागीर मी तुमच्याकडे पाठवित आहे. 14त्याची आई दान येथील एक इस्राएली स्त्री असून त्याचा पिता सोरचा आहे. सोन्याचांदीच्या कामाची तसेच कास्य व लोखंडी, दगडकाम, सुतारकी, जांभळा, निळा व किरमिजी रंगाच्या सुताचे व तलम कापडाच्या विणकामाची त्याला संपूर्ण माहिती आहे. तो उत्तम कोरीव काम जाणणारा असून त्याला देण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारचे नमुने तयार करण्यात निपुण आहे. तो तुमच्याकडील कामगार आणत असे तुमचे पिता व माझा प्रभू दावीद राजे यांनी नेमणूक केलेल्या तुमच्या कारागिरांबरोबर काम करेल.
15“आता माझ्या स्वामींनी कबूल केलेले गहू, जव, द्राक्षारस व जैतुनाचे तेल पाठवून द्या. 16आम्ही लबानोन डोंगरावरील सर्व लाकडे कापून ते ओंडके जलमार्गाने याफोला पाठवू, तिथून ते तुम्ही यरुशलेममध्ये घेऊ शकाल.”
17शलोमोनाने, त्याचा पिता दावीदाने केल्यानंतर, इस्राएल देशातील सर्व परदेशी लोकांची मोजणी केली; मोजणीत 1,53,600 परदेशी लोक आढळले. 18त्यातून त्याने 70,000 कष्टकरी मजूर, डोंगरात 80,000 पाथरवट व यांच्यावर देखरेख करण्यास 3,600 मुकादम यांची नियुक्ती केली.
सध्या निवडलेले:
2 इतिहास 2: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.