YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इतिहास 13

13
यहूदीयाचा राजा अबीयाह
1इस्राएलचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीयाह यहूदीयाचा राजा झाला. 2त्याने यरुशलेमात तीन वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव माकाह#13:2 मूळ भाषेत मिखायाह होते. ती गिबियाह येथील उरीएल याची कन्या होती.
अबीयाह व यरोबोअम यांच्यामध्ये युद्ध झाले. 3अबीयाहने चार लाख सक्षम योद्धे घेतले, यरोबोअम आठ लाख संख्या असलेले सक्षम सैन्य घेऊन त्याच्या विरोधात युद्धरेषेवर जाऊन थांबला.
4अबीयाह एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील सेमाराईम पर्वतावर उभा राहिला आणि म्हणाला, “यरोबोअम आणि सर्व इस्राएल लोकांनो, माझे ऐका! 5तुम्हाला माहीत नाही काय की, इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांनी मिठाच्या कराराद्वारे#13:5 किंवा कधीही न मिटणारा करार इस्राएलचे राज्यपद दावीद आणि त्याच्या वंशजांना कायमचे दिले आहे? 6तरीसुद्धा दावीदाचा पुत्र शलोमोनचा अधिकारी, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने त्याच्या धन्याच्या विरोधात बंड केले. 7कुचकामी गुंडांची टोळी त्याच्या सभोवती गोळा झाली व त्यांनी शलोमोनचा पुत्र रेहोबोअमचा विरोध केला, जो तेव्हा बालक असून व निर्णयक्षमता नसलेला होता व त्यांचा सामना करण्यास असमर्थ होता.
8“आणि आता तुम्ही याहवेहच्या राज्याला, जे दावीदाच्या वंशजांच्या हातात आहे, विरोध करण्याची योजना केली आहे. तुमचे खरोखरच प्रचंड सैन्य आहे आणि तुमच्याकडे यरोबोअमने तुमची दैवते केलेली सोन्याची वासरे आहेत. 9तुम्ही याहवेहचे याजक अहरोनाचे पुत्र आणि लेवी यांना हाकलून दिले आणि स्वतःचे याजक तयार केले, जसे इतर देशातील लोक करत नाहीत का? जो कोणी एक तरुण बैल आणि सात मेंढे घेऊन स्वतःला पवित्र करण्यासाठी येतो, तो जी दैवते नाहीत अशांचा पुजारी होऊ शकतो.
10“आमच्याविषयी म्हणाल, याहवेह हे आमचे परमेश्वर आहेत आणि आम्ही त्यांना सोडले नाही. जे याजक याहवेहची सेवा करीत आहेत ते अहरोनाचे पुत्र आहेत आणि लेवीय त्यांना मदत करतात. 11रोज सकाळी आणि संध्याकाळी ते याहवेह यांना होमार्पणे आणि सुगंधी धूप अर्पण करतात. ते विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या टेबलावर भाकरी ठेवतात आणि दररोज संध्याकाळी सोन्याच्या दीपमाळेवर दीप लावतात. आम्ही आमचे परमेश्वर याहवेहना हव्या असणाऱ्या गोष्टींचे पालन करीत आहोत. परंतु तुम्ही त्यांना सोडून दिले आहे. 12परमेश्वर आम्हाबरोबर आहेत; ते आमचे नेतृत्व करतात. त्यांचे याजक तुझ्याविरुद्ध युद्धाचे रणशिंग वाजवितील. इस्राएलच्या लोकांनो, तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह, यांच्याविरुद्ध लढाई करू नका, कारण तुम्ही यशस्वी होणार नाही.”
13यरोबोअमने पाठीमागील सर्व बाजूंनी सैन्य पाठवले होते, म्हणजे तो यहूदीयाच्या पुढे असताना, ते त्यांच्यामागे दबा धरून बसले होते. 14यहूदीयांनी सभोवार पाहिले, तेव्हा आपण मागे व पुढे वेढले गेलो आहोत असे त्यांना दिसून आले, तेव्हा त्यांनी मदतीकरिता याहवेहचा धावा केला आणि याजक रणशिंग वाजवू लागले. 15जेव्हा यहूदी लोकांनी रणगर्जना केली, तेव्हा परमेश्वराने यरोबोअम आणि संपूर्ण इस्राएली सैन्याचा अबीयाह आणि यहूदीयासमोर नायनाट केला. 16इस्राएली लोक यहूदीयांसमोरून पळून गेले आणि परमेश्वराने त्यांना त्यांच्या हाती दिले. 17अबीयाह आणि त्याच्या सैन्याने त्यांचे इतके मोठे नुकसान केले की, इस्राएलच्या सक्षम लोकांमधील पाच लाख लोक मारले गेले. 18त्या प्रसंगी इस्राएल लोकांचा पराभव झाला आणि यहूदीयाचे लोक विजयी झाले, कारण ते याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर यांच्यावर विसंबून राहिले होते.
19अबीयाहने यरोबोअम याचा पाठलाग केला आणि त्याच्याकडून बेथेल, यशनाह आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आजूबाजूची गावे घेतली. 20इस्राएलचा राजा यरोबोअम अबीयाहच्या हयातीत परत सत्ता मिळवू शकला नाही. शेवटी याहवेहने त्याला ताडण केले आणि तो मरण पावला.
21इकडे यहूदीयाचा राजा अबीयाह फारच बलशाली झाला. त्याला चौदा पत्नी, बावीस पुत्र व सोळा कन्या होत्या.
22अबीयाह याच्या शासनकाळातील इतर घटना, त्याने काय केले आणि तो काय म्हणाला, हे सर्व इद्दो संदेष्ट्याने लिहिलेल्या इतिहासात नमूद केलेले आहे.

सध्या निवडलेले:

2 इतिहास 13: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन