1 थेस्सलनीकाकरांस 5
5
प्रभुचा दिवस
1आता, बंधू आणि भगिनींनो, वेळ आणि घटका याविषयी तुम्हाला लिहीण्याची गरज नाही, 2कारण तुम्हाला हे पक्के ठाऊक आहे की जसा चोर रात्री येतो तसा प्रभुचा दिवस येईल. 3“शांतता आणि सुरक्षितता,” असे लोक म्हणत असतानाच, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रीला प्रसूती वेदना होतात, त्याचप्रमाणे त्यांच्यावर अचानक नाश ओढवेल आणि त्यातून ते सुटणार नाहीत.
4परंतु बंधू आणि भगिनींनो, या गोष्टीसंबंधाने तुम्हाला चोरासारखा गाठावे असे तुम्ही अंधारात नाही; म्हणून तो दिवस चोरासारखा आला, तरी तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही. 5परंतु तुम्ही बंधू आणि भगिनींनो तुम्ही सर्व प्रकाशाची व दिवसाची मुले आहात. आम्ही रात्रीचे किंवा अंधकाराचे नाही. 6आपण जे झोपी गेलेले आहेत, त्यांच्यासारखे असू नये, परंतु आपण जागृत आणि शुद्धीवर असलेले असावे. 7झोप घेणारे, रात्री झोपतात, मद्य पिणारे, रात्री मद्य पितात. 8परंतु जे आपण दिवसाचे आहोत, ते आपण संयमी असावे, विश्वास आणि प्रीतिचे चिलखत धारण करावे, आणि तारणाची आशा हे शिरस्त्राण धारण करावे. 9क्रोध सहन करावा यासाठी नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून परमेश्वराने आपली निवड केली आहे. 10ते आपल्यासाठी मरण पावले, यासाठी की आपण जागे असलो किंवा झोपेत असलो तरी त्याच्याबरोबर जिवंत राहावे. 11म्हणून तुम्ही आता जे करीत आहात त्याचप्रमाणे एकमेकांना प्रोत्साहन द्या आणि एकमेकांची उन्नती करण्यासाठी झटा.
अंतिम बोध
12बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सांगतो की जे तुम्हामध्ये परिश्रम करतात, जे प्रभुमध्ये तुमची काळजी घेतात आणि तुम्हाला बोध करतात त्यांच्या मान राखा. 13त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतिने सर्वोच्च मान द्या एकमेकांबरोबर शांतीने राहा. 14बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की जे आळशी आणि लुडबूड करणारे आहेत त्यांना ताकीद द्या, जे निराश आहेत त्यांना उत्तेजन द्या, अशक्तांना आधार द्या, प्रत्येकाशी सहनशीलतेने वागा. 15कोणी वाईटाची फेड वाईटाने करीत नाही याची खात्री बाळगा, परंतु प्रत्येकाचे आणि सर्वांचे सर्वदा चांगले करण्यासाठी झटा.
16सर्वदा आनंदित राहा, 17निरंतर प्रार्थना करा, 18सर्व परिस्थितीत उपकारस्मरण करा, कारण ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा हीच आहे.
19पवित्र आत्म्याला विझवू नका. 20संदेशाला तुच्छ मानू नका. 21परंतु त्या सर्वांची परीक्षा करा; जे चांगले आहे ते धरून ठेवा, 22सर्वप्रकारच्या वाईटाचा निषेध करा.
23परमेश्वर स्वतः जे शांतीचे परमेश्वर आहेत, ते तुम्हाला परिपूर्ण पवित्र करो. आपले प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत तुमचा पूर्ण आत्मा, जीव आणि शरीर निर्दोष राखली जावोत. 24ज्यांनी तुम्हाला पाचारण केले आहे ते विश्वासू आहेत, आणि ते करतीलच.
25बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.
26परमेश्वराच्या सर्व लोकांना पवित्र चुंबनाने अभिवादन करा.
27हे पत्र सर्व बंधू आणि भगिनींना वाचून दाखवावे, अशी मी तुम्हाला प्रभुसमोर आज्ञा करतो.
28आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हावर असो.
सध्या निवडलेले:
1 थेस्सलनीकाकरांस 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.