YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 शमुवेल 23

23
दावीद कईलाहचे रक्षण करतो
1जेव्हा दावीदाला कळविण्यात आले, “पाहा, पलिष्टी लोक कईलाहच्या विरुद्ध लढाई करीत आहेत आणि धान्याची खळी लुटत आहेत.” 2तेव्हा त्याने याहवेहला विचारले, “मी तिकडे जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय?”
याहवेहने दावीदाला उत्तर दिले, “जा, पलिष्ट्यांवर हल्ला कर आणि कईलाहला वाचव.”
3परंतु दावीदाची माणसे त्याला म्हणाली, “येथे यहूदीयाच्या प्रदेशामध्ये असतानाच आम्हाला भीती वाटते, जर कईलाहकडे जाऊन आम्ही पलिष्ट्यांच्या सैन्याविरुद्ध गेलो तर किती अधिक धोका असेल!”
4दावीदाने पुन्हा एकदा याहवेहला विचारले आणि याहवेहने त्याला उत्तर दिले, “कईलाहकडे जा, कारण पलिष्ट्यांना मी तुझ्या हाती देणार आहे.” 5तेव्हा दावीद आणि त्याची माणसे कईलाहकडे गेली, पलिष्ट्यांशी लढले आणि त्यांची गुरे नेली. त्याने पलिष्टी लोकांचे मोठे नुकसान केले आणि कईलाहच्या लोकांना वाचविले. 6(आता अहीमेलेखचा पुत्र अबीयाथार दावीदाकडे कईलाह येथे पळून येताना त्याने आपल्याबरोबर एफोद आणला होता.)
शौल दावीदाचा पाठलाग करतो
7शौलाला कोणी सांगितले की, दावीद कईलाह येथे गेला आहे आणि तो म्हणाला, “परमेश्वराने त्याला माझ्या हाती दिले आहे, कारण ज्या नगरास वेशी व भिंती आहेत त्यात जाऊन दावीदाने स्वतःला कैद करून घेतले आहे.” 8तेव्हा कईलाहास जाऊन दावीदाला व त्याच्या माणसांना वेढावे म्हणून शौलाने त्याच्या संपूर्ण सैन्याला युद्धासाठी बोलाविले.
9जेव्हा दावीदाला समजले की, शौल त्याच्याविरुद्ध कट करीत आहे, तेव्हा तो अबीयाथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आणा.” 10दावीद म्हणाला, “याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, शौल माझ्यामुळे या कईलाह नगराचा नाश करण्यास पाहत आहे, असे तुमच्या दासाने नक्की ऐकले आहे. 11कईलाहचे लोक मला त्याच्या स्वाधीन करतील काय? तुमच्या सेवकाने ऐकल्याप्रमाणे शौल इकडे येईल काय? याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, मी विनंती करतो, तुमच्या सेवकाला हे सांगा.”
आणि याहवेहने उत्तर दिले, “तो येईल.”
12पुन्हा दावीदाने विचारले, “कईलाहचे लोक मला आणि माझ्या माणसांना शौलाच्या स्वाधीन करतील काय?”
आणि याहवेह म्हणाले, “होय, ते करतील.”
13तेव्हा दावीद आणि त्याची सुमारे सहाशे माणसे यांनी कईलाह सोडले आणि ते ठिकठिकाणी फिरत राहिले. जेव्हा शौलाला सांगण्यात आले की, दावीद कईलाहतून निसटून गेला आहे, तो तिकडे गेला नाही.
14दावीद अरण्यातील गडांमध्ये आणि जीफच्या डोंगराळ प्रदेशातील रानामध्ये राहू लागला. दिवसेंदिवस शौल त्याचा शोध घेत होता, परंतु परमेश्वराने दावीदाला त्याच्या हाती दिले नाही.
15दावीद जीफच्या वाळवंटातील होरेश येथे असताना त्याला कळले#23:15 किंवा घाबरला होता की, शौल त्याचा प्राण घेण्यासाठी बाहेर पडला आहे. 16आणि शौलाचा पुत्र योनाथान होरेश येथे दावीदाकडे गेला आणि त्याने दावीदाला मदत केली व परमेश्वराठायी सबळ केले. 17तो म्हणाला, “भिऊ नकोस, माझा पिता शौल तुझ्यावर हात टाकणार नाही. तू इस्राएलचा राजा होशील आणि मी तुझा दुय्यम होईन, हे माझा पिता शौलसुद्धा जाणून आहे.” 18तेव्हा त्या दोघांनी याहवेहसमोर एक करार केला. नंतर योनाथान घरी गेला, परंतु दावीद होरेश येथेच राहिला.
19जिफी लोक गिबियाह येथे शौलाकडे गेले आणि म्हणाले, “होरेशच्या गडांमध्ये, हकीलाहच्या डोंगरात, यशीमोनच्या दक्षिणेकडे दावीद आमच्यामध्ये लपून राहत नाही काय? 20तर आता, महाराज, जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा खाली या आणि त्याला तुमच्या हाती देण्याची जबाबदारी आमची असेल.”
21शौलाने उत्तर दिले, “तुम्ही माझ्यावर जी दया दाखविली त्यामुळे याहवेह तुमचे कल्याण करो. 22जा आणि अधिक माहिती मिळवा. दावीद नेहमी कुठे जातो आणि त्याला तिकडे कोणी पाहिले, याचा शोध करा. मला समजले की तो फारच धूर्त आहे. 23लपण्यासाठी ज्या ठिकाणांचा तो उपयोग करतो त्यांचा शोध करा आणि निश्चित माहिती घेऊन माझ्याकडे परत या. मग मी तुमच्याबरोबर जाईन; जर तो त्याच भागात असेल, तर यहूदाहच्या सर्व कुळांमधून मी त्याला शोधून काढेन.”
24तेव्हा ते बाहेर पडले आणि शौलाच्यापुढे जीफकडे गेले. आता दावीद आणि त्याची माणसे यशीमोनच्या दक्षिणेकडील अराबाह येथे माओनच्या वाळवंटात होती. 25शौल आणि त्याच्या माणसांनी शोध सुरू केला आणि जेव्हा दावीदाला याबद्दल सांगण्यात आले तेव्हा तो खाली खडकाकडे गेला आणि माओनच्या वाळवंटात राहिला. जेव्हा शौलाने हे ऐकले तेव्हा तो दावीदाचा पाठलाग करीत माओनच्या वाळवंटात गेला.
26शौल डोंगराच्या एका बाजूने जात होता तर दावीद आणि त्याची माणसे दुसर्‍या बाजूला होती, शौलापासून दूर जाण्याची ते घाई करत होते. कारण शौल आणि त्याचे सैनिक दावीद व त्याच्या माणसांना पकडण्यास जवळ येत होते, 27एक संदेशवाहक शौलाकडे आला, व म्हणाला, “लवकर या! पलिष्ट्यांनी देशावर हल्ला केला आहे.” 28तेव्हा शौलाने दावीदाचा पाठलाग करण्याचे सोडून दिले आणि तो पलिष्ट्यांशी लढण्यास गेला. याच कारणामुळे या ठिकाणाला सेला-हम्माहलेकोथ#23:28 सेला-हम्माहलेकोथ अर्थात् निसटून जाण्याचा खडक असे म्हटले जाते. 29नंतर दावीद तिथून पुढे गेला आणि एन-गेदीच्या गडांमध्ये राहिला.

सध्या निवडलेले:

1 शमुवेल 23: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन