1 शमुवेल 22
22
अदुल्लाम आणि मिस्पाह येथे दावीद
1दावीदाने गथ सोडले आणि पळून जाऊन अदुल्लाम येथील गुहेकडे गेला. जेव्हा त्याच्या भावांनी आणि त्याच्या पित्याच्या घराण्यातील लोकांनी याबद्दल ऐकले तेव्हा ते त्याच्याकडे गेले. 2जे सर्व निराशेत किंवा कर्जात किंवा असमाधानी होते ते त्याच्याभोवती गोळा झाले आणि दावीद त्यांचा सेनापती झाला. सुमारे चारशे लोक त्याच्याबरोबर होते.
3तिथून निघून दावीद मोआबातील मिस्पाह येथे गेला आणि मोआबच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर माझ्यासाठी काय करेल, हे मला समजेपर्यंत माझ्या आईवडिलांना तुमच्याजवळ राहू द्याल काय?” 4तेव्हा त्याने त्यांना मोआबच्या राजाकडे सोडले आणि जोपर्यंत दावीद गडांमध्ये होता तोपर्यंत ते राजाकडे राहिले.
5परंतु गाद संदेष्टा दावीदाला म्हणाला, “गडांमध्ये राहू नकोस; यहूदीयाच्या प्रदेशामध्ये जा.” तेव्हा दावीद तिथून निघाला आणि हेरेथ नावाच्या जंगलात गेला.
शौल नोब येथील याजकाचा वध करतो
6आता शौलाने ऐकले की, दावीद आणि त्याच्या माणसांचा शोध लागला आहे. तेव्हा शौल हातात भाला घेऊन, गिबियाह येथील टेकडीवर चिंचेच्या#22:6 इब्री भाषेत एशेल झाड झाडाखाली बसला, त्याचे सर्व अधिकारी त्याच्या सभोवती उभे राहिले. 7शौल त्यांना म्हणाला, “बिन्यामीन पुरुषांनो, ऐका! इशायाचा पुत्र तुम्हा सर्वांना शेते आणि द्राक्षमळे देणार काय? तो तुम्हाला हजारांचे किंवा शंभरांचे सेनापती करणार काय? 8याच कारणामुळे तुम्ही सर्वांनी माझ्याविरुद्ध कट केला आहे काय? माझ्या पुत्राने इशायच्या पुत्राबरोबर करार केला तेव्हा कोणीही मला सांगितले नाही. तुमच्यापैकी कोणालाही माझी काळजी नाही किंवा जसे आज केले तसे माझ्याच मुलाने माझ्या सेवकाला माझ्यासाठी दबा धरून बसविले आहे याविषयी कोणी मला सांगितले नाही.”
9परंतु शौलाच्या अधिकार्यांबरोबर उभा असलेला दवेग एदोमी म्हणाला, “मी नोब येथे इशायच्या पुत्राला अहीतूब याचा पुत्र अहीमेलेख याच्याकडे येताना पाहिले. 10अहीमेलेखने त्याच्यासाठी याहवेहकडे चौकशी केली; त्याने त्याला काही अन्नसामुग्री व पलिष्टी गल्याथाची तलवार सुद्धा दिली.”
11तेव्हा राजाने अहीतूबचा पुत्र अहीमेलेख याजक आणि त्याच्या कुटुंबातील सर्व पुरुष, जे नोब येथे याजक होते यांना बोलाविणे पाठविले आणि ते सर्व राजाकडे आले. 12शौल म्हणाला, “अहीतूबच्या पुत्रा, ऐक.”
तो उत्तरला, “होय, माझ्या धन्या.”
13शौल त्याला म्हणाला, “तू माझ्याविरुद्ध कट का केलास, तू इशायच्या पुत्राला भाकर आणि तलवार देऊन त्याच्यासाठी परमेश्वराकडे चौकशी केली, ज्यामुळे त्याने माझ्याविरुद्ध बंड केले आहे आणि तो आज माझ्यासाठी दबा धरून बसला आहे?”
14अहीमेलेखाने राजाला उत्तर दिले, “तुमच्या सर्व सेवकांपैकी राजाचा जावई दावीद याच्याइतका विश्वासू असा दुसरा कोण आहे जो तुमच्या अंगरक्षकांचा प्रमुख आणि तुमच्या घराण्यात सर्वाधिक आदरणीय आहे? 15केवळ त्याच दिवशी मी त्याच्यासाठी परमेश्वराकडे चौकशी केली काय? नक्कीच नाही! राजाने आपल्या सेवकावर किंवा त्याच्या पित्याच्या घराण्यातील कोणावरही आरोप करू नये, कारण आपल्या सेवकाला या सर्व प्रकरणाबद्दल काहीच माहीत नाही.”
16परंतु राजा म्हणाला, “अहीमेलेख, तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब, तुम्ही खात्रीने मराल.”
17नंतर राजाने त्याच्या बाजूला असलेल्या अंगरक्षकांना हुकूम दिला: “पुढे येऊन याहवेहच्या याजकांना जिवे मारा, कारण ते सुद्धा दावीदाच्या बाजूने आहेत. दावीद माझ्यापासून पळून चालला होता, हे त्यांना माहीत होते, तरी त्यांनी मला सांगितले नाही.”
परंतु याहवेहच्या याजकांवर हात उगारण्यास अंगरक्षकांची इच्छा नव्हती.
18तेव्हा राजाने दवेगला आज्ञा केली, “तू मागे वळ आणि याजकांना मारून टाक.” तेव्हा एदोमी दोएग फिरला आणि त्यांना मारून टाकले. त्या दिवशी तागाचे एफोद वस्त्र घातलेल्या पंचाऐंशी पुरुषांना त्याने मारून टाकले. 19त्याने याजकांचे शहर नोब, यातील पुरुष आणि स्त्रिया, लेकरे आणि तान्ही बालके, आणि तेथील गुरे, गाढवे आणि मेंढरे सुद्धा तलवारीने मारून टाकले.
20परंतु अहीतूबचा पुत्र अहीमेलेख याचा एक पुत्र अबीयाथार निसटून दावीदाकडे पळून गेला. 21अबीयाथारने दावीदाला सांगितले की, शौलाने याहवेहच्या याजकांना मारून टाकले आहे. 22तेव्हा दावीद अबीयाथारला म्हणाला, “त्या दिवशी, एदोमी दवेग तिथे होता, मला माहीत होते की, तो नक्कीच शौलाला सांगेल. तुझ्या सर्व घराण्याच्या मृत्यूस मी जबाबदार आहे. 23माझ्याबरोबर राहा; घाबरू नकोस. जो मनुष्य तुला मारण्याचा प्रयत्न करत आहे, तो मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करत आहे. तू माझ्याबरोबर सुरक्षित राहशील.”
सध्या निवडलेले:
1 शमुवेल 22: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.