YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इतिहास 28

28
मंदिर बांधण्याची दावीदाची योजना
1दावीदाने इस्राएलच्या सर्व अधिकार्‍यांना यरुशलेम येथे एकत्र बोलाविले: त्यात गोत्रावरील अधिकारी, राजकीय सेवेतील विभागीय अधिकारी, हजार सैन्याचे आणि शंभर सैन्याचे सैन्याधिकारी, राजा आणि राजपुत्र यांच्या स्थावर मालमत्तेची आणि पशुधनाची देखरेख करणारे अधिकारी, युद्ध सैनिक व सर्व वीर योद्धे यांचा समावेश होता.
2राजा दावीद उभा राहिला व म्हणाला: “माझ्या इस्राएली बंधूंनो, माझ्या लोकांनो, माझे ऐका. याहवेहच्या पवित्र कराराच्या कोशासाठी आणि परमेश्वराच्या पादास्थानासाठी एक भवन असावे म्हणून मंदिर बांधण्याची माझी इच्छा होती. आणि मी मंदिर बांधावयास योजना केली आहे. 3परंतु परमेश्वराने मला सांगितले आहे, ‘तू माझ्या नामासाठी भवन बांधणार नाही, कारण तू योद्धा आहेस आणि तू रक्तपात केला आहेस.’
4“तरीपण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने माझ्या सर्व घराण्यातून इस्राएलावर सदासर्वदा राज्य करण्यासाठी मला राजा म्हणून निवडले आहे. त्यांनी प्रथम यहूदाहच्या गोत्राची आणि या गोत्रातून माझ्या पित्याच्या घराण्याची आणि माझ्या पित्याच्या सर्व पुत्रांमधून माझी निवड करून आनंद मानला असून मला इस्राएलावर राजा केले आहे. 5याहवेहने मला पुष्कळ पुत्र दिलेले आहेत—माझ्या अनेक पुत्रांमधून—याहवेहने इस्राएलींच्या राजगादीवर बसण्यासाठी माझा पुत्र शलोमोन याची निवड केली. 6याहवेहने मला सांगितले: ‘तुझा पुत्र शलोमोन माझे मंदिर आणि अंगण बांधील, कारण मी त्याला माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन. 7त्याने माझ्या आज्ञा आणि सूचना आतापर्यंत पाळल्या, त्याप्रमाणे जर तो यापुढेही काटेकोरपणाने पाळल्या, तर मी त्याचे राज्य सदासर्वकाळ टिकवेन.’
8“म्हणून आता सर्व इस्राएलसमोर, याहवेहच्या लोकांसमोर आणि आपल्या परमेश्वराच्या ऐकिवात: मी तुम्हाला सूचना देत आहे की याहवेह परमेश्वराच्या प्रत्येक आज्ञेचे काळजीपूर्वक पालन करा, म्हणजे तुम्ही ही उत्तम भूमी ताब्यात घेऊन, ती सदासर्वदा तुमच्या वंशजांना वारसाहक्क म्हणून देता येईल.
9“आणि तू, माझ्या पुत्रा शलोमोना, आपल्या पित्याच्या परमेश्वराचा अंगीकार कर, त्यांची सेवा पूर्ण अंतःकरणाने व स्वखुशीने कर, कारण याहवेह प्रत्येकाचे अंतःकरण पाहतात आणि त्यातील प्रत्येक इच्छा व विचार त्यांना कळतो. जर तू त्यांना शोधशील, तर ते तुला सापडतील; पण जर तू त्यांचा त्याग करशील, तर ते तुझा कायमचा त्याग करतील. 10म्हणून आता तू लक्ष दे, याहवेहने त्यांचे पवित्र मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे. शक्तिशाली हो आणि ते कार्य पूर्ण कर.”
11नंतर दावीदाने मंदिराची नियोजित जागा, तेथील भवने, भांडारगृहे, वरच्या खोल्या, आतील खोल्या, तसेच प्रायश्चिताची जागा यांचा नकाशा शलोमोनाला दिला. 12पवित्र आत्म्याने ज्या योजना त्याच्या मनात घातल्या होत्या त्या याहवेहच्या मंदिराच्या अंगणाचा, सभोवतालच्या खोल्यांचा, परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यांचा व समर्पित वस्तूंच्या कोठारांचाही नकाशा त्याला दिला. 13याजक व लेवी यांच्या विभागांच्या कामकाजाच्या सूचनाही राजाने शलोमोनाला दिल्या, त्याचप्रमाणे याहवेहच्या मंदिरातील भक्ती व सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचा तपशीलही त्याने त्याला दिला. 14त्याने वजन करून निरनिराळ्या सेवेसाठी लागणाऱ्या सोन्याच्या पात्रांसाठी लागणारे पुरेसे सोने व निरनिराळ्या सेवेसाठी लागणाऱ्या चांदीच्या पात्रांसाठी लागणारी पुरेशी चांदी दिली. 15दिव्यांना व दिवठणींना लागणारे ठराविक वजनाचे सोनेही त्याने दिले. त्याने चांदीच्या बैठकींसाठी व दिव्यांसाठी प्रत्येकाच्या कामाप्रमाणे पुरेल एवढी चांदी दिली. 16त्याने समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी व इतर सोन्याच्या मेजांसाठी सोने तोलून दिले. त्याने चांदीच्या मेजांसाठीसुध्दा चांदी तोलून दिली. 17शुद्ध सोन्याचे काटेरी चमचे, शिंपडण्यासाठी लागणारे कटोरे आणि प्याले; सोन्याच्या प्रत्येक ताटासाठी सोने, त्याप्रमाणेच चांदीच्या प्रत्येक ताटासाठी चांदी तोलून दिली; 18आणि त्याने धूपवेदीसाठी लागणारे शुद्ध सोने तोलून दिले. तसेच रथाचा नकाशा म्हणजे याहवेहच्या कराराच्या कोशावर आपले पंख पसरून त्याचे संरक्षण करणार्‍या करुबांचा नकाशा त्याने त्याला दिला.
19दावीद म्हणाला, “हा सगळा तपशील खुद्द याहवेहच्या सूचनांचा परिणाम आहे. आणि त्यांनीच मला या नकाशाचा सर्व तपशील समजण्याचे ज्ञान दिले.”
20दावीद त्याचा पुत्र शलोमोनला हे देखील म्हणाला, “हिंमत बांध, धैर्य धर आणि कामास लाग, भिऊ नकोस किंवा खचू नकोस, कारण याहवेह परमेश्वर, माझे परमेश्वर तुझ्याबरोबर आहेत. याहवेहच्या मंदिराचे प्रत्येक कार्य योग्यप्रकारे सिद्धीस जाईपर्यंत ते तुझा त्याग करणार नाहीत किंवा तुला अपयश देणार नाहीत. 21याजक आणि लेवी यांच्या विभागणी प्रमाणे परमेश्वराच्या मंदिरातील सर्व कामे करण्यास तयार आहेत आणि तसेच निरनिराळ्या कारागिरीमध्ये कुशल असलेला प्रत्येक उत्सुक मनुष्य तुला सर्व कामात मदत करण्यास तयार आहे. अधिकारी वर्ग आणि सामान्य लोक तुझ्या प्रत्येक आज्ञेप्रमाणे वागतील.”

सध्या निवडलेले:

1 इतिहास 28: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन