1 इतिहास 15
15
कोश यरुशलेमात आणतात
1आता दावीदाने स्वतःसाठी दावीद नगर यरुशलेममध्ये भवने बांधली व त्याने परमेश्वराच्या कोशाकरिता एक स्थान सिद्ध करून तिथे एक नवा तंबू ठोकला. 2नंतर दावीदाने म्हटले, “लेव्यांशिवाय इतर कोणीही परमेश्वराचे कोश वाहू नये, कारण याहवेहने त्यांना त्यांचे कोश वाहण्यासाठी निवडले आहे, त्यांची सेवा निरंतर करण्यासाठी निवडले आहे.”
3नंतर याहवेहचा कोश नव्या तंबूत आणण्याच्या समारंभासाठी दावीदाने इस्राएलाच्या सर्व लोकांना यरुशलेममध्ये एकत्र केले.
4दावीदाने अहरोनाच्या वंशजांना आणि लेवींना एकत्र बोलाविले:
5कोहाथी वंशातील,
प्रमुख उरीएल व त्याचे 120 भाऊबंद;
6मरारीच्या वंशातील,
प्रमुख असायाह व त्याचे 220 भाऊबंद;
7गेर्षोमाच्या वंशातील,
प्रमुख योएल व त्याचे 130 भाऊबंद;
8एलीजाफानच्या वंशातील,
प्रमुख शमायाह व त्याचे 200 भाऊबंद;
9हेब्रोनाच्या वंशातील,
प्रमुख एलीएल व त्याचे 80 भाऊबंद;
10उज्जीएलाच्या वंशातील,
प्रमुख अम्मीनादाब व त्याचे 112 भाऊबंद.
11नंतर दावीदाने सादोक व अबीयाथार या मुख्य याजकांना व उरीएल, असायाह, योएल, शमायाह, एलीएल व अम्मीनादाब या लेवी पुढार्यांना बोलाविणे पाठविले. 12तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी वंशातील कुटुंबप्रमुख आहात; आता तुमच्या सर्व बांधवांसमवेत तुम्ही शुद्ध व्हा, कारण इस्राएली लोकांच्या याहवेह परमेश्वराचा कोश मी तयार केलेल्या जागेवरील नव्या तंबूत आणावयाचा आहे. 13याहवेह आपले परमेश्वर आपल्यावर पूर्वी क्रोधाविष्ट झाले, कारण तुम्ही लेवी लोकांनी तो उचलून आणला नाही. नेमून दिलेल्या विधीनुसार आपण कोश कोणत्या पद्धतीने उचलावयाचा यासंबंधी कधी चौकशी केली नाही.” 14तेव्हा याजक व लेवी यांनी इस्राएलच्या याहवेह परमेश्वराचा कोश आणण्यासाठी स्वतःला विधिपूर्वक शुद्ध केले. 15याहवेह परमेश्वराने मोशेला ज्या सूचना दिल्या होत्या त्याबरहुकूम लेव्यांनी कोशाचे खांब खांद्यांवर घेऊन तो वाहिला.
16दावीदाने लेवी पुढार्यांना गायकवर्ग व वाद्यवृंद तयार ठेवण्यास सांगितले. या वाद्यवृंदानेः सतार, वीणा व झांजा उच्चस्वराने आणि हर्षाने वाजविल्या.
17लेवी लोकांनी योएलचा पुत्र हेमान, बेरेख्याहचा पुत्र आसाफ व मरारी कुटुंबातील कुशायाहचा पुत्र एथान, हे प्रमुख वादक नेमले. 18पुढे नमूद केलेल्या कुटुंबातील लोक त्यांचे सहायक म्हणून नेमले: जखर्याह, बेन, यजिएल, शमिरामोथ, यहीएल, उन्नी, एलियाब, बेनाइयाह, मासेयाह, मत्तिथ्याह, एलीफलेहू, मिकनेयाह. ओबेद-एदोम व ईयेल#15:18 व अजऱ्याह हे द्वारपाल होते.
19संगीतकार हेमान, आसाफ व एथान यांना कास्याच्या झांजा वाजविण्यासाठी नेमले होते. 20जखर्याह, अजीएल, शमिरामोथ यहीएल, उन्नी, एलियाब, मासेयाह व बेनाइयाह यांना अलामोथ या संगीत रागावर सारंगी वाजविण्यास नेमले. 21मत्तिथ्याह, एलीफलेहू, मिकनेयाह, ओबेद-एदोम, ईयेल, व अजज्याह यांना शमीनीथ सुरावर वीणा वाजविण्यास नेमले होते. 22लेव्यांचा प्रमुख कनन्याह गायनकर्त्यांना ती जबाबदारी देण्यात आली होती. तो गायनकलेत निपुण होता.
23बेरेख्याह व एलकानाह हे कोशाचे द्वारपाल होते. 24शबन्याह, योशाफाट, नथानेल, अमासय, जखर्याह, बेनाइयाह व एलिएजर हे सर्व याजक परमेश्वराच्या कोशापुढे कर्णे वाजवित व मिरवणुकीच्या वेळी अग्रभागी चालत. ओबेद-एदोम व यहीयाह हे कोशाचे द्वारपाल होते.
25म्हणून दावीद, इस्राएलचे वडीलजन, सैन्याचे उच्चाधिकारी याहवेहच्या कराराचा कोश यरुशलेममध्ये आणण्यासाठी मोठ्या हर्षाने ओबेद-एदोमच्या घरी गेले. 26याहवेह परमेश्वराच्या कराराचा कोश वाहून नेणार्या लेव्यांची याहवेहने मदत केली म्हणून सात बैल आणि सात गोर्हे अर्पण केले गेले. 27दावीद, कोश वाहणारे सर्व लेवी, सर्व गायक व गायकांचा मुख्य संगीतकार कनन्याह होता, या सर्वांनी तलम तागाची वस्त्रे परिधान केली होती. दावीदाने तागाचे एफोद घातले होते. 28अशाप्रकारे इस्राएलाच्या सर्व लोकांनी हर्षाने जयघोष करीत, रणशिंगे, कर्णे, झांजा, सतार व वीणा यांच्या मोठ्या निनादात याहवेहचा कराराचा कोश आणला.
29याहवेहच्या कराराचा कोश दावीदाच्या नगरात प्रवेश करीत असताना, शौलाची मुलगी मीखल हिने खिडकीतून पाहिले. आणि जेव्हा तिने दावीद राजाला याहवेहसमोर नाचत आणि हर्ष करीत असता पाहिले, तेव्हा तिने तिच्या अंतःकरणात त्याचा तिरस्कार केला.
सध्या निवडलेले:
1 इतिहास 15: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.