1 इतिहास 13
13
कोश परत आणणे
1दावीदाने आपल्या सेनाधिकार्यांचा, म्हणजे प्रत्येक सहस्राधिपती, शताधिपतीचा सल्ला घेतला. 2जमलेल्या संपूर्ण इस्राएली सभेपुढे दावीदाने असे भाषण केले, “जर तुम्हाला योग्य वाटते आणि आपल्या याहवेह परमेश्वरानेही या गोष्टीला संमती दिली आहे, त्याअर्थी आपल्यात सामील होण्यासाठी, आपण इस्राएलातील सर्व बंधूना, तसेच याजक, लेवी, जे त्यांच्यासह नगरात व मळ्यात आहेत त्यांना आमंत्रणाचा संदेश पाठवू या. 3त्याचप्रमाणे आपण आपल्या परमेश्वराचा कोश परत आणू या. कारण शौल राजाच्या कारकिर्दीत आपण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते#13:3 किंवा त्याची विचारपूस केली नाही.” 4तेव्हा संपूर्ण सभेने एकमताने होकार दिला व सर्व लोकांना ते योग्य वाटले.
5मग दावीदाने परमेश्वराचा कोश किर्याथ-यआरीमहून आणण्याच्या वेळी इजिप्तच्या शिहोर नदीपासून ते लबो हमाथपर्यंत सर्वत्र विखुरलेल्या इस्राएली लोकांना एकत्र केले. 6दावीद व इस्राएलचे सर्व लोक यहूदीयातील बालाह म्हणजे किर्याथ-यआरीम येथे करुबांमध्ये आरूढ असलेला, जो त्या नावाने संबोधित केला जातो, तो याहवेह परमेश्वराचा कोश आणण्यासाठी निघाले.
7त्यांनी परमेश्वराचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अहियो हे बैलगाडी चालवित होते. 8दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक त्यांच्या सर्व शक्तीने परमेश्वरासमोर वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा व कर्णे वाजवित आनंद करीत होते.
9जेव्हा ते कीदोनाच्या खळ्याजवळ आले, तेव्हा बैल अडखळले म्हणून कोश धरण्यासाठी उज्जाहने आपला हात पुढे केला. 10त्यामुळे याहवेहचा कोप उज्जाहविरुद्ध पेटला आणि त्याने कोशाला हात लावला म्हणून त्यांनी त्याला मारून टाकले. आणि तो परमेश्वरापुढे मरण पावला.
11तेव्हा दावीदाला राग आला कारण याहवेहचा क्रोध उज्जाहवर भडकला होता आणि आजपर्यंत त्या ठिकाणाला पेरेस-उज्जाह#13:11 अर्थात् उज्जाविरुद्ध तडाखा असे म्हणतात.
12त्या दिवशी दावीदाला परमेश्वराचे भय वाटले, तो म्हणाला, “परमेश्वराचा कोश मी आपल्याकडे कसा नेऊ?” 13त्याने कोश त्याच्याबरोबर दावीदाच्या नगरात नेला नाही. त्याऐवजी त्याने तो गित्ती ओबेद-एदोम याच्या घरी नेला. 14परमेश्वराचा कोश ओबेद-एदोम याच्या घरात तीन महिने राहिला आणि याहवेहने त्याच्या घराण्यास व त्याचे जे काही होते त्या सर्वास आशीर्वाद दिला.
सध्या निवडलेले:
1 इतिहास 13: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.