YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 7

7
विवाहावरून केलेला बोध
1बंधुजनहो, नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे. मनुष्य जिवंत आहे तोपर्यतच नियमशास्त्राची सत्ता त्याच्यावर चालते, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? 2पती जिवंत आहे, तोपर्यत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते. पण पती मरण पावल्यावर तिची पतीच्या बंधनातून सुटका होते. 3म्हणून पती जिवंत असताना ती परपुरुषाची झाली, तर तिला व्यभिचारिणी म्हणतील, पण पती मरण पावल्यास ती कायद्याने त्या बंधनातून मुक्त होते. नंतर ती दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली असता व्यभिचारिणी होत नाही. 4त्याप्रमाणे, बंधुजनहो, तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्रासंबंधाने मृत झालात, अशासाठी की, तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यांतून जो उठला, त्याचे व्हावे आणि देवाच्या सेवेत उपयुक्त ठरावे. 5आपण देहस्वभावाच्या अधीन होतो, तेव्हा नियमशास्त्राद्वारे चेतविलेल्या पापवासना आपल्या अवयवांत मरणाचे फळ देण्यासाठी कार्य करत होत्या. 6पण आता ज्याने आपण बद्ध होतो, त्यासंबंधाने मृत झाल्यामुळे आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत, म्हणून जुन्या धर्मशास्त्रलेखास धरून नव्हे तर पवित्र आत्म्याकडून मिळणाऱ्या नवजीवनाने आपण सेवा करतो.
नियमशास्त्र व पाप
7तर मग नियमशास्त्र म्हणजेच पाप असे आपण म्हणावे काय? मुळीच नाही! तरीही पापाची ओळख मला नियमशास्त्रावाचून कशानेच झाली नसती. लोभ धरू नको, असे नियमशास्त्रात सांगितले नसते, तर मला लोभाचे ज्ञान झाले नसते. 8परंतु पापाने संधी साधून ह्या आज्ञेच्यायोगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला. नियमशास्त्रावाचून पाप निर्जीव आहे. 9पूर्वी मी नियमशास्त्राविरहित जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो. 10ह्याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हावयाचा तिचाच परिणाम माझ्या बाबतीत मरण झाला, असे माझ्या अनुभवास आले. 11कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसवले व तिच्या योगे मला ठार केले.
12तर मग नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, न्याय्य व चांगली आहे. 13म्हणजे जे चांगले आहे, त्याने मला मरण आणले काय? कदापि नाही! हे पापाने केले. पाप ते पापच दिसावे, म्हणून जे चांगले आहे, त्याच्या योगे पाप माझ्या मध्ये मरण घडवणारे असे झाले. आज्ञेच्या योगे पापाचे खरे स्वरूप प्रकट व्हावे म्हणून असे झाले.
दैहिक व आध्यात्मिक भावनांचा लढा
14आपणाला ठाऊक आहे की, नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. मी मात्र मर्त्य मानव असून पापाला गुलाम म्हणून विकलेला आहे, 15मी काय करतो, ते माझे मलाच कळत नाही, म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर ज्याचा मला द्वेष वाटतो ते करतो. 16जे मी इच्छीत नाही, ते जर मी करतो तर नियमशास्त्र चांगले आहे, हे मी मान्य करतो. 17तर आता ह्यापुढे ते कृत्य मी स्वतः करतो असे नव्हे, तर माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते. 18मला ठाऊक आहे की, माझ्यामध्ये म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही. इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. 19कारण जे चांगले करावेसे मला वाटते, ते मी करत नाही, तर करावेसे वाटत नाही, असे जे वाईट, ते मी करतो. 20आता जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो, तर ते कृत्य मी स्वतः करतो असे नव्हे, तर माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते.
21सत्कृत्य करण्याची इच्छा असतानाही मी मात्र दुष्कृत्याची निवड करतो, हा नियम मला माझ्यामध्ये आढळतो. 22माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो. 23परंतु माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो, तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. 24किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील? 25आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देव हे करतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. तर मग माझी अवस्था ही अशी आहे: मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.

सध्या निवडलेले:

रोमकरांना 7: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन