YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 7:13-29

मत्तय 7:13-29 MACLBSI

अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद व मार्ग सोपा आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाणारा मार्ग अरुंद व अवघड आहे. हा मार्ग थोड्यांनाच सापडतो. खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषात तुमच्याकडे येतात पण ते आतून क्रुर लांडगे असतात. त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय? त्याचप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. चांगले फऴ न देणारे प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. अर्थात, त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. ‘प्रभो, प्रभो’, म्हणून माझा धावा करणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील असे नाही, पण जो माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तो करील. न्यायाच्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, “प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’ तेव्हा मी त्यांना जाहीरपणे सांगेन, “मी तुम्हांला मुळीच ओळखत नाही. अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा.’ म्हणून जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो खडकावर घर बांधणाऱ्या सुज्ञ मनुष्यासारखा आहे; पाऊस पडला; पूर आला; वाराही सुटला व त्या घरावर आदळला, तरी ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर घातलेला होता. उलट, जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो वाळूवर घर बांधणाऱ्या मनुष्याप्रमाणे मूर्ख ठरतो. पाऊस पडला; पूर आला; वाराही सुटला व त्या घरावर आदळला; ते घर कोसळले आणि त्याचा नाश भयानक होता.” येशूने हे सर्व बोलणे पूर्ण केल्यावर त्याच्या ह्या प्रबोधनामुळे लोकसमुदाय थक्क झाला; कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्र्यांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता.