मत्तय 7:13-29
मत्तय 7:13-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अरुंद दरवाजाने आत जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद व मार्ग प्रशस्त आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ लोक आहेत. पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांस तो सापडतो ते फारच थोडके आहेत. खोट्या संदेष्ट्यांविषयी सावध असा. ते मेंढरांच्या वेषात घेऊन तुमच्याकडे येतात. पण खरे सांगायचे तर ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत. त्यांच्या फळांवरुन तुम्ही त्यांस ओळखाल. काटेरी झाडाला द्राक्षे लागतात काय? किंवा रिंगणीच्या झाडाला अंजिरे येताच काय? त्याचप्रमाणे चांगले झाड चांगले फळ देते, परंतु वाईट झाड वाईट फळ देते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत. जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते. यास्तव त्यांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल. मला प्रभू, प्रभू म्हणणारा प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही; तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. त्यादिवशी मला अनेक जण म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हास ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा. जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या मनुष्यासारखा आहे, अशा शहाण्या मनुष्याने आपले घर खडकावर बांधले. मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता. जो कोणी माझीही वचने ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा आहे, त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.” येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणाने थक्क झाला. कारण येशू त्यांना त्यांच्या नियमशास्त्र शिक्षकांप्रमाणे नव्हे, तर अधिकारवाणीने शिकवत होता.
मत्तय 7:13-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“अरुंद दाराने प्रवेश करा, कारण नाशाकडे नेणारा दरवाजा रुंद व पसरट आहे. पुष्कळ लोक त्याच दरवाजातून प्रवेश करतात. तरी जीवनाकडे नेणारा दरवाजा लहान असून मार्गही अरुंद आहे आणि अगदी थोडक्यांना तो सापडतो. “खोट्या संदेष्ट्यांच्या विषयी अतिशय सावधगिरी बाळगा. ते मेंढरांची वस्त्रे धारण करून तुमच्याकडे येतात पण आतून क्रूर लांडगे असतात. त्यांच्या फळांवरून तुम्हाला त्यांना ओळखता येते. लोक कधी काटेरी झुडपांवरून अंजीर किंवा रानगुलाबाच्या झुडपांवरून द्राक्षे काढतात काय? प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते आणि वाईट झाड वाईट फळ देते. चांगली झाडे वाईट फळे देणार नाहीत आणि वाईट झाडे चांगली फळे देणार नाही. या कारणामुळे चांगली फळे न देणारी झाडे तोडून टाकण्यात येतील व जाळून टाकली जातील. अशाप्रकारे त्यांच्या फळांवरून तुम्हाला त्यांना ओळखता येईल. “जो कोणी मला, ‘प्रभूजी, प्रभूजी’ म्हणत राहतो, तो प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल असे नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल. त्या दिवशी पुष्कळजण मला म्हणतील, ‘प्रभूजी, प्रभूजी आम्ही तुमच्या नावाने भविष्यवाणी केली नाही काय, तुमच्या नावाने भुते घालविली नाहीत काय, तुमच्या नावाने मोठे चमत्कार केले नाहीत काय?’ तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगेन, ‘मी तुम्हाला कधीच ओळखत नव्हतो. अहो दुष्टांनो, माझ्यापासून दूर निघून जा.’ “यास्तव माझी शिकवण ऐकणारे व त्याप्रमाणे वागणारे सर्वजण एका शहाण्या मनुष्यासारखे आहेत. त्याने आपले घर खडकावर बांधले. पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती आपल्या आचरणात आणत नाही, तो पाया न घालता आपले घर वाळूवर बांधण्यार्या मूर्ख माणसासारखा आहे. मग पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले आणि ते घर कोसळून पडले.” येशूंनी या गोष्टी सांगण्याचे संपविले, तेव्हा समुदाय त्यांच्या शिकवणीवरून थक्क झाले. कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते.
मत्तय 7:13-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय? त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही, आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. ह्यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल. मला ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे म्हणणार्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’ तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, ‘मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणार्यांनो, माझ्यापुढून निघून जा.’ ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणाएका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर खडकावर बांधले; मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर वाळूवर बांधले; मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले.” येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले; कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता.
मत्तय 7:13-29 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद व मार्ग सोपा आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाणारा मार्ग अरुंद व अवघड आहे. हा मार्ग थोड्यांनाच सापडतो. खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषात तुमच्याकडे येतात पण ते आतून क्रुर लांडगे असतात. त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय? त्याचप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. चांगले फऴ न देणारे प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. अर्थात, त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. ‘प्रभो, प्रभो’, म्हणून माझा धावा करणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करील असे नाही, पण जो माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तो करील. न्यायाच्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, “प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय?’ तेव्हा मी त्यांना जाहीरपणे सांगेन, “मी तुम्हांला मुळीच ओळखत नाही. अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा.’ म्हणून जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो खडकावर घर बांधणाऱ्या सुज्ञ मनुष्यासारखा आहे; पाऊस पडला; पूर आला; वाराही सुटला व त्या घरावर आदळला, तरी ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर घातलेला होता. उलट, जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो वाळूवर घर बांधणाऱ्या मनुष्याप्रमाणे मूर्ख ठरतो. पाऊस पडला; पूर आला; वाराही सुटला व त्या घरावर आदळला; ते घर कोसळले आणि त्याचा नाश भयानक होता.” येशूने हे सर्व बोलणे पूर्ण केल्यावर त्याच्या ह्या प्रबोधनामुळे लोकसमुदाय थक्क झाला; कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्र्यांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता.