YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 9:1-17

लूक 9:1-17 MACLBSI

नंतर येशूने त्याच्या बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना भुते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सर्व सामर्थ्य व अधिकार दिला. देवाच्या राज्याची घोषणा करायला व रोग्यांना बरे करायला पाठवताना त्याने त्यांना सांगितले, “वाटेसाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकर किंवा पैसे घेऊ नका. दोन दोन अंगरखे घेऊ नका. ज्या घरात तुम्ही जाल, तेथेच राहा. तेथून निघेपर्यंत तिथेच मुक्काम करा. जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष म्हणून त्या नगरातून निघते वेळेस तुमच्या पायांची धूळ झटकून टाका.” ते निघून सर्वत्र शुभवर्तमान जाहीर करीत व रोग बरे करीत गावोगावी फिरू लागले. त्या वेळी घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी राज्यकर्त्या हेरोदने ऐकले आणि तो फार संभ्रमात पडला; कारण योहान मेलेल्यातून उठला आहे, असे कित्येक लोक म्हणत होते. आणखी काही लोक एलिया प्रकट झाला आहे, असे म्हणत होते व इतर काही लोक प्राचीन संदेष्ट्यांपैकी एखादा पुन्हा उठला आहे, असे म्हणत होते. हेरोद म्हणाला, “मी योहानचा शिरच्छेद केला असताना ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण असावा?” म्हणून त्याला भेटण्याची तो संधी शोधू लागला. प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते ते येशूला सविस्तर सांगितले. तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगरात एकांत स्थळी गेला. हे समजल्यावर लोकसमुदाय त्याच्यामागून गेले. त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता. ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना तो बरे करत होता. दिवस उतरू लागला, तेव्हा बारा प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले, “लोकांना निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावांत व शेतामळ्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे निर्जन ठिकाणी आहोत.” परंतु तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन ह्या सर्व लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी व दोन मासे ह्यांव्यतिरिक्त आमच्याजवळ काही नाही.” तेथे सुमारे पाच हजार पुरुष होते. त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “सुमारे पन्नास पन्नास जणांचे गट करून त्यांना बसवा.” त्यांनी त्याप्रमाणे सर्वांना बसवले. त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यांना आशीर्वाद दिला. त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. सर्व जण जेवून तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या.

लूक 9 वाचा

ऐका लूक 9