YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 4:1-15

लूक 4:1-15 MACLBSI

पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा येशू यार्देन नदीवरून परतला आणि आत्म्याने त्याला चाळीस दिवस रानात नेले. तेथे सैतानाने चाळीस दिवस त्याची परीक्षा घेतली. त्या दिवसांत त्याने काही खाल्‍ले नाही म्हणून ते दिवस संपल्यावर त्याला भूक लागली. सैतान त्याला म्हणाला, “तू देवाचा पुत्र असलास, तर ह्या धोंड्याला ‘भाकर हो’ अशी आज्ञा कर.” येशूने उत्तर दिले, “‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही’, असे लिहिले आहे.” त्यानंतर सैतानाने त्याला उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली आणि त्याला म्हटले, “ह्यांचे वैभव व हा सर्व अधिकार मी तुला देईन कारण हे माझ्या स्वाधीन करण्यात आले आहे आणि माझ्या मनास येईल त्याला मी ते देतो. म्हणून तू मला नमन करशील, तर हे सर्व तुझे होईल.” येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याला नमन कर व त्याचीच आराधना कर’, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.” नंतर त्याने त्याला यरुशलेममध्ये नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र असलास तर येथून खाली उडी टाक कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की, तुझे रक्षण करण्यासाठी तो आपल्या दूतांना आज्ञा देईल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.” येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याची परीक्षा पाहू नकोस’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.” येशूची सर्व प्रकारे परीक्षा पाहण्याचे संपवून सैतान योग्य वेळ येईपर्यंत त्याला सोडून गेला. येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलमध्ये परत आला व त्याच्याविषयीचे वृत्त चहूकडील प्रदेशांत पसरले. तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देऊ लागला आणि सर्व जण त्याची प्रशंसा करू लागले.

लूक 4 वाचा

ऐका लूक 4