लूक 4:1-15
लूक 4:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला, आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले; तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसांत त्याने काही खाल्ले नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा सैतान त्याला म्हणाला, “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यास ‘भाकर हो’ असे सांग.” येशूने त्याला उत्तर दिले : “‘मनुष्य केवळ भाकरीने नाही, तर देवाच्या प्रत्येक वचनाने’ जगेल असे लिहिले आहे.” मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली; आणि त्याला म्हटले, “ह्यांच्यावरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपवून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल.” येशूने त्याला उत्तर दिले, “‘[अरे सैताना, माझ्या मागे हो, कारण,] परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर,’ असे शास्त्रात लिहिले आहे.” नंतर त्याने त्याला यरुशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी टाक, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल.’ आणि ‘तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.”’ येशूने त्याला उत्तर दिले की, “‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस’ असे सांगितले आहे.” मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलात परत आला व त्याची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देई आणि सर्व जण त्याचा महिमा वर्णन करीत.
लूक 4:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरून यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्यास अरण्यात नेले. तेथे सैतानाने त्याची चाळीस दिवस परीक्षा घेतली. त्या दिवसात येशूने काहीही खाल्ले नाही आणि ती वेळ संपल्यानंतर येशूला भूक लागली. तेव्हा सैतान त्यास म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडाची भाकर हो, अशी आज्ञा कर. येशूने त्यास उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.” मग सैतान त्यास उंच जागेवर घेऊन गेला आणि एका क्षणांत जगातील सर्व राज्ये त्यास दाखविली. सैतान त्यास म्हणाला, “मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व वैभव देईन कारण ते मला दिलेले आहे आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो. म्हणून जर तू मला नमन करशील आणि माझी उपासना करशील तर हे सर्व तुझे होईल.” येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे. प्रभू तुझा देव याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर.” नंतर सैतानाने येशूला यरूशलेम शहरास नेले आणि परमेश्वराच्या भवनाच्या टोकावर त्यास उभे केले आणि तो त्यास म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार! शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा करील, आणि तुझा पाय दगडावर आपटू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील.’” येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असेही म्हणले आहे; तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस.” म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे परीक्षा घेण्याचे संपविल्यावर योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला. मग पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशू गालील प्रांतास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली. त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले आणि सर्वांनी त्याची स्तुती केली.
लूक 4:1-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पवित्र आत्म्याने भरलेल्या येशूंनी यार्देन सोडले आणि आत्म्याने त्यांना अरण्यात नेले, तिथे चाळीस दिवस सैतानाने त्यांची परीक्षा घेतली. या दिवसांमध्ये त्यांनी काही खाल्ले नाही आणि ते संपल्यानंतर त्यांना भूक लागली. सैतान येशूंना म्हणाला, “जर तू परमेश्वराचा पुत्र असशील, तर या दगडाला भाकर होण्यास सांग.” पण येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे: ‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही.’ ” नंतर सैतानाने येशूंना एका उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखविली. आणि सैतानाने त्यांना म्हटले, “मी तुला या सर्वांवर अधिकार व वैभव देईन; कारण ती मला देण्यात आली आहेत आणि ज्याला पाहिजे त्याला मी देऊ शकतो. जर तू माझी उपासना करशील, तर हे सगळे तुझेच होईल.” येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे, ‘केवळ प्रभू तुझ्या परमेश्वरांनाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’ ” मग सैतानाने त्याला यरुशलेमास नेऊन मंदिराच्या सर्वात उंच टोकावर उभे केले आणि तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर येथून खाली उडी टाक,” कारण असे लिहिले आहे: “ ‘तुझे रक्षण व्हावे म्हणून तो आपल्या देवदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देईल; तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये, म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून धरतील.’ ” येशूंनी उत्तर दिले, “असे म्हटले आहेः ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ” या सर्व परीक्षा संपल्यानंतर, योग्य संधी मिळेपर्यंत सैतान त्यांना सोडून निघून गेला. यानंतर पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरलेले येशू गालील प्रांतात परतले आणि त्यांची किर्ती चहूकडील सर्व प्रांतात पसरली. ते त्यांच्या सभागृहांमध्ये शिक्षण देत होते आणि प्रत्येकाने त्यांची स्तुती केली.
लूक 4:1-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा येशू यार्देन नदीवरून परतला आणि आत्म्याने त्याला चाळीस दिवस रानात नेले. तेथे सैतानाने चाळीस दिवस त्याची परीक्षा घेतली. त्या दिवसांत त्याने काही खाल्ले नाही म्हणून ते दिवस संपल्यावर त्याला भूक लागली. सैतान त्याला म्हणाला, “तू देवाचा पुत्र असलास, तर ह्या धोंड्याला ‘भाकर हो’ अशी आज्ञा कर.” येशूने उत्तर दिले, “‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही’, असे लिहिले आहे.” त्यानंतर सैतानाने त्याला उंच ठिकाणी नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली आणि त्याला म्हटले, “ह्यांचे वैभव व हा सर्व अधिकार मी तुला देईन कारण हे माझ्या स्वाधीन करण्यात आले आहे आणि माझ्या मनास येईल त्याला मी ते देतो. म्हणून तू मला नमन करशील, तर हे सर्व तुझे होईल.” येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याला नमन कर व त्याचीच आराधना कर’, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.” नंतर त्याने त्याला यरुशलेममध्ये नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, “तू देवाचा पुत्र असलास तर येथून खाली उडी टाक कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की, तुझे रक्षण करण्यासाठी तो आपल्या दूतांना आज्ञा देईल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.” येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याची परीक्षा पाहू नकोस’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.” येशूची सर्व प्रकारे परीक्षा पाहण्याचे संपवून सैतान योग्य वेळ येईपर्यंत त्याला सोडून गेला. येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालीलमध्ये परत आला व त्याच्याविषयीचे वृत्त चहूकडील प्रदेशांत पसरले. तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देऊ लागला आणि सर्व जण त्याची प्रशंसा करू लागले.