YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 3

3
जिभेवर ताबा
1माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका, कारण शिक्षक म्हणून आपला अधिक कडक न्याय केला जाईल, हे तुम्हांला माहीत आहे. 2आपण सगळेच अनेकदा चुका करतो. मात्र कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. 3घोड्याने आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घालतो व त्याला आपण हवे तसे फिरवतो. 4किंवा तारू पाहा, ते एवढे मोठे असते व प्रचंड वाऱ्याने लोटले जात असते, तरी सुकाणुदाराची इच्छा असते तिकडे तो अगदी लहानशा सुकाणूने ते फिरवतो. 5जिभेचे तसेच आहे:जीभ लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते!
6जीभ ही आग आहे. ती अनीतीचे घर आहे, आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे. ती आपल्या सृष्टिचक्राला नरकाग्नीने पेटवते. 7श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या सर्वांना मनुष्य वश करू शकतो व शकला आहे 8परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करावयास समर्थ नाही, ती दुष्ट व अनावर असून प्राणघातक विषाने भरलेली आहे. 9आपल्या प्रभूची व पित्याची स्तुती करण्यासाठी आपण ती वापरतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या माणसांना शाप देण्याकरिताही तिचा उपयोग करतो. 10एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत! 11झऱ्याच्या एकाच उगमातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? 12माझ्या बंधूंनो, अंजिराला ऑलिव्ह फळे किंवा द्राक्षवेलीला अंजीर येऊ शकत नाहीत; तसेच खाऱ्या पाण्याच्या झऱ्यातून गोड पाणी निघणे शक्य नाही.
खोटे व खरे ज्ञान
13तुमच्यामध्ये सुज्ञ व समंजस असा कोणी आहे काय? त्याने सुज्ञताजन्य लीनतेने आपली कृत्ये सदाचरणाच्या योगे दाखवावीत. 14पण तुमच्या मनात कटु मत्सर व स्वार्थी महत्त्वकांक्षा आहे तर सुज्ञतेचा ताठा मिरवून सत्याविरुद्ध पाप करू नका. 15ही सुज्ञता वरून उतरत नाही, तर ती ऐहिक, अध्यात्माविरुद्ध व सैतानाकडली आहे. 16जेथे मत्सर व स्वार्थी वृत्ती आहे, तेथे अव्यवस्था व प्रत्येक प्रकारचे कुकर्म आहे. 17परंतु वरून येणारी सुज्ञता ही मुळात शुद्ध असते. शिवाय ती शांतिप्रिय, सौम्य व स्नेहवर्धक असते; ती करुणायुक्त असून तिला सत्कृत्यांचे पीक येते; ती पक्षपात व ढोंगबाजी यांपासून अलिप्त असते 18आणि शांती निर्माण करणारे शांतीने जे बी पेरतात त्याला नीतिमत्त्वाचे पीक येते.

सध्या निवडलेले:

याकोब 3: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन