याकोब 2
2
श्रीमंत व गरीब ह्यांच्याशी वागणूक
1माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही केवळ बाह्य रूप पाहून वागू नका. 2सोन्याची अंगठी घालून व भपकेबाज कपडे परिधान करून एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला आणि अस्वच्छ कपडे घातलेला एक गरीब माणूस आला असता 3तुम्ही भपकेबाज कपडे घातलेल्या इसमाकडे पाहून म्हणता, “ही जागा चांगली आहे, येथे बसा” आणि गरिबाला म्हणता, “तू येथे उभा राहा, किंवा माझ्या पायांशी बस.” 4तर तुम्ही आपल्यामध्ये भेदभाव ठेवता की नाही? आणि दुर्विचारी न्यायाधीश बनला की नाही?
5माझ्या प्रिय बंधूनो, ऐका, ऐहिक दृष्टीने जे गरीब आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले, त्याचे वारस होण्यासाठी त्याने निवडले आहे की नाही? 6पण तुम्ही गरिबांचा अपमान करता. धनवान लोक तुमच्यावर जुलूम करतात आणि तेच तुम्हांला न्यायसभेत ओढून नेतात की नाही? 7जे चांगले नाव तुम्हांला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतात की नाही?
8म्हणून ‘तू जशी स्वत:वर तशी तुझ्या शेजाऱ्यावर प्रीती कर’, हा धर्मशास्त्रातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत असाल तर ते बरे करता. 9परंतु जर तुम्ही बाह्यरूप पाहून वागत असाल तर पाप करता आणि उ्रंघन करणारे म्हणून नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता. 10जो कोणी एका नियमाविषयी चुकतो तो संपूर्ण नियमशास्त्राविषयी दोषी होतो; 11कारण ‘व्यभिचार करू नको’ असे ज्याने सांगितले त्यानेच, ‘खून करू नको’, हेही सांगितले. तू व्यभिचार केला नाहीस पण खून केलास, तर नियमशास्त्र उ्रंघणारा झाला आहेस. 12स्वातंत्र्याच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे, हे लक्षात घेऊन बोला व वागा; 13कारण ज्याने दया केली नाही, त्याचा न्याय परमेश्वर दयेवाचून करील; परंतु दया न्यायावर विजय मिळवते.
विश्वास व कृती ह्यांचा परस्परसंबंध
14माझ्या बंधूंनो, मी विश्वास ठेवतो, असे कोणी म्हणत असून तो कृती करीत नाही, तर त्याचा काय उपयोग? तो विश्वास त्याचे तारण करायला समर्थ आहे काय? 15भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे 16आणि तुमच्यामधील कोणी त्यांना म्हणतो, ‘सुखी राहा, कपड्यालत्याकडे व खाण्यापिण्याकडे लक्ष द्या’, पण जीवनावश्यक गोष्टी त्यांना तुम्ही देत नाही, तर त्याचा काय फायदा? 17म्हणजेच विश्वासाला अनुसरून जर कृती केली नाही, तर तो जात्या निर्जीव आहे.
18कोणी म्हणेल, एका माणसाकडे विश्वास आहे आणि दुसरा मनुष्य कृती करतो. माझे उत्तर असे आहे, कोणताही मनुष्य कृतीविना विश्वास कसा ठेवू शकतो, हे मला दाखवा. मी माझा विश्वास माझ्या कृतीद्वारे तुम्हांला दाखवीन. 19देव एकच आहे, असा विश्वास तू धरतोस ना? छान! भुतेही विश्वास धरतात व थरथर कापतात. 20अरे बुद्धिहीन मनुष्या, कृतीवाचून विश्वास निरर्थक आहे, हे तुला समजावून द्यावयास हवे काय? 21आपला बाप अब्राहाम ह्याने आपला पुत्र इसहाक ह्याला यज्ञवेदीवर अर्पिले ह्यात तो कृतींनी नीतिमान ठरला नव्हता काय? 22त्याचा विश्वास त्याच्या कृतींत कार्य करत होता, आणि कृतींनी विश्वास पूर्ण झाला, हे तुला दिसत नाही काय? 23‘अब्राहामने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले’, हा धर्मशास्त्रलेख पूर्ण झाला. 24तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे, तर कृतींनी माणूस नीतिमान ठरतो, हे तुम्ही पाहता.
25तसेच, राहाब वेश्या हिनेदेखील इस्राएली जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्या वाटेने निघून जाण्यास मदत केली, ह्यात ती कृतीने नीतिमान ठरली नाही काय?
26तर मग जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही कृतींवाचून निर्जीव आहे.
सध्या निवडलेले:
याकोब 2: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.