YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 21:1-14

प्रेषितांचे कार्य 21:1-14 MACLBSI

आमचा व त्यांचा वियोग झाल्यानंतर आम्ही तारवातून सरळ कोसा या ठिकाणी गेलो व दुसऱ्या दिवशी रुदास व तेथून पातरा येथे गेलो. नंतर पलीकडे फेनीके येथे जाणारे तारू मिळाल्यावर आम्ही त्यात बसून निघालो. पुढे कुप्र दृष्टीस पडले, तेव्हा त्याच्या दक्षिणेकडे आम्ही सूरियाकडे जाऊन सोर येथे उतरलो कारण तेथे तारवातील माल उतरावयाचा होता. तेथे शोध घेतल्यावर आम्हांला काही शिष्य भेटले म्हणून आम्ही त्या ठिकाणी सात दिवस राहिलो. त्यांनी पवित्र आत्म्याद्वारे पौलाला म्हटले, “तुम्ही यरुशलेममध्ये पाऊल टाकू नका.” परंतु सात दिवसांनंतर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो. स्त्रिया व मुले ह्यांच्यासह सर्वांनी आम्हांला शहराबाहेर पोहचविले. तेथे समुद्राच्या किनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली. नंतर एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी परत गेले. आम्ही आमचा सोरपासूनचा जलप्रवास संपविला आणि प्‍तलमैस येथे येऊन व बंधुजनांस भेटून त्यांच्याजवळ एक दिवस राहिलो. दुसऱ्या दिवशी आम्ही निघून कैसरिया येथे आलो आणि शुभवर्तमान प्रचारक फिलिप ह्याच्या घरी उतरलो, यरुशलेममध्ये ज्या सात लोकांना साहाय्यक म्हणून निवडले होते, त्यांच्यापैकी हा होता. त्याला चार अविवाहित मुली होत्या. त्या ईश्वरी संदेश देत असत. तेथे आम्ही अनेक दिवस राहिलो असता अगब नावाचा एक संदेष्टा यहुदियाहून आला. त्याने आमच्याकडे येऊन पौलाच्या कमरबंदाने स्वतःचे हातपाय बांधले व म्हटले, पवित्र आत्मा असे म्हणतो की, “हा कमरबंद ज्या माणसाचा आहे, त्याला यरुशलेममध्ये यहुदी लोक ह्याप्रमाणे बांधून यहुदीतरांच्या हाती देतील.” हे ऐकून आम्ही व तेथल्या लोकांनीही “तुम्ही यरुशलेममध्ये जाऊ नका”, अशी पौलाला गळ घातली. पौलाने उत्तर दिले, “तुम्ही रडून माझे मन खचविता काय? मी नुसता तुरुंगात पडण्यासच नव्हे, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलममध्ये मरावयासदेखील तयार आहे.” तो ऐकत नाही, हे पाहून “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो”, असे म्हणून आम्ही त्याचे मन वळवणे सोडून दिले.

प्रेषितांचे कार्य 21:1-14 साठी चलचित्र