प्रेषितांचे कार्य 21
21
मिलेतहून यरुशलेमकडे
1आमचा व त्यांचा वियोग झाल्यानंतर आम्ही तारवातून सरळ कोसा या ठिकाणी गेलो व दुसऱ्या दिवशी रुदास व तेथून पातरा येथे गेलो. 2नंतर पलीकडे फेनीके येथे जाणारे तारू मिळाल्यावर आम्ही त्यात बसून निघालो. 3पुढे कुप्र दृष्टीस पडले, तेव्हा त्याच्या दक्षिणेकडे आम्ही सूरियाकडे जाऊन सोर येथे उतरलो कारण तेथे तारवातील माल उतरावयाचा होता. 4तेथे शोध घेतल्यावर आम्हांला काही शिष्य भेटले म्हणून आम्ही त्या ठिकाणी सात दिवस राहिलो. त्यांनी पवित्र आत्म्याद्वारे पौलाला म्हटले, “तुम्ही यरुशलेममध्ये पाऊल टाकू नका.” 5परंतु सात दिवसांनंतर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो. स्त्रिया व मुले ह्यांच्यासह सर्वांनी आम्हांला शहराबाहेर पोहचविले. तेथे समुद्राच्या किनाऱ्यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली. 6नंतर एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी परत गेले.
कैसरियाकडे
7आम्ही आमचा सोरपासूनचा जलप्रवास संपविला आणि प्तलमैस येथे येऊन व बंधुजनांस भेटून त्यांच्याजवळ एक दिवस राहिलो. 8दुसऱ्या दिवशी आम्ही निघून कैसरिया येथे आलो आणि शुभवर्तमान प्रचारक फिलिप ह्याच्या घरी उतरलो, यरुशलेममध्ये ज्या सात लोकांना साहाय्यक म्हणून निवडले होते, त्यांच्यापैकी हा होता. 9त्याला चार अविवाहित मुली होत्या. त्या ईश्वरी संदेश देत असत. 10तेथे आम्ही अनेक दिवस राहिलो असता अगब नावाचा एक संदेष्टा यहुदियाहून आला. 11त्याने आमच्याकडे येऊन पौलाच्या कमरबंदाने स्वतःचे हातपाय बांधले व म्हटले, पवित्र आत्मा असे म्हणतो की, “हा कमरबंद ज्या माणसाचा आहे, त्याला यरुशलेममध्ये यहुदी लोक ह्याप्रमाणे बांधून यहुदीतरांच्या हाती देतील.”
12हे ऐकून आम्ही व तेथल्या लोकांनीही “तुम्ही यरुशलेममध्ये जाऊ नका”, अशी पौलाला गळ घातली. 13पौलाने उत्तर दिले, “तुम्ही रडून माझे मन खचविता काय? मी नुसता तुरुंगात पडण्यासच नव्हे, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलममध्ये मरावयासदेखील तयार आहे.”
14तो ऐकत नाही, हे पाहून “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो”, असे म्हणून आम्ही त्याचे मन वळवणे सोडून दिले.
यरुशलेम येथे पौल
15त्या दिवसानंतर आम्ही आपली तयारी करून यरुशलेम येथे गेलो. 16आमच्याबरोबर कैसरियातील कित्येक शिष्यही आले. त्यांनी आपल्याबरोबर कुप्र येथील म्नासोन ह्या जुन्या शिष्याला आणले, त्याच्या घरी आम्ही राहणार होतो.
व्रतस्थ पौल
17यरुशलेममध्ये आल्यावर बंधुजनांनी आनंदाने आमचे स्वागत केले. 18दुसऱ्या दिवशी पौल आमच्याबरोबर याकोबच्या घरी आला. सर्व वडीलजनही तेथे आले. 19त्याने त्यांना भेटून त्याच्या सेवेद्वारे जी कार्ये देवाने यहुदीतरांमध्ये केली होती, त्या एकेकाविषयी सविस्तर सांगितले. 20ते ऐकून त्यांनी देवाचा गौरव केला व पौलाला म्हटले, “भाऊ, ज्यांनी विश्वास ठेवला आहेत, असे हजारो लोक यहुदी लोकांमध्ये आहे. हे तुम्ही पाहातच आहात, ते सर्व नियमशास्त्राभिमानी आहेत. 21तुमच्याविषयी त्यांना असे सांगण्यात आले आहे की, तुम्ही यहुदीतरांत राहणाऱ्या सर्व यहुदी लोकांना मोशेच्या नियमशास्राचा त्याग करावयास शिकवता आणि आपल्या मुलांची सुंता करू नये व परिपाठाप्रमाणे चालू नये असेही सांगता. 22तर आता काय करावे? तुम्ही आला आहात हे ते खातरीपूर्वक ऐकतील. 23म्हणून आम्ही तुम्हांला सांगतो तसे करा, आमच्यात चौघे जण व्रतस्थ आहेत. 24त्यांना घेऊन त्यांच्यासह तुम्ही व्रतस्थ व्हा आणि त्यांनी मुंडण करावे म्हणून त्यांचा खर्च तुम्ही भरा म्हणजे तुमच्याविषयी जे कळविण्यात आले आहे, त्यात काही अर्थ नसून तुम्ही स्वतः नियमशास्त्र पाळून योग्य प्रकारे वागता हे सर्वांस कळेल. 25मात्र ज्यांनी विश्वास ठेवला आहे अशा यहुदीतरांसंबंधाने आम्ही निर्णय करून लिहून पाठवले आहे की, त्यांनी मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व लैंगिक अनैतिकता ह्यांपासून अलिप्त राहावे.”
26तेव्हा पौल त्या माणसांना घेऊन गेला व दुसऱ्या दिवशी त्याने त्यांच्याबरोबर शुद्धीकरणाचा विधी पार पाडला. नंतर मंदिरात जाऊन त्याने व्रताचे दिवस कधी संपतील याविषयी सूचना दिली कारण त्यानंतर तो त्यांच्यापैकी प्रत्येकासाठी अर्पण वाहणार होता.
यरुशलेममधील दंगल व पौलाला अटक
27ते सात दिवस पूर्ण होत आले तेव्हा आशिया प्रांतातल्या यहुदी लोकांनी त्याला मंदिरात पाहून सर्व लोकसमुदायाला चिथवले आणि त्याच्यावर हात टाकून 28ओरडून म्हटले, “अहो इस्राएली लोकांनो, धावा हो धावा, आपले लोक, नियमशास्त्र व हे स्थळ ह्यांच्याविरुद्ध जो चहूकडे सर्वांना शिकवतो, तोच हा आहे. शिवाय ह्याने ग्रीक लोकांना मंदिरात आणून हे पवित्र स्थान विटाळले आहे.” 29त्याने इफिसकर त्रफिम ह्याला पूर्वी त्याच्याबरोबर शहरात पाहिले होते. त्याला पौलाने मंदिरात आणले असावे, अशी त्यांची कल्पना होती.
30सर्व शहर गजबजून उठले व लोकांची एकच गर्दी उसळली. त्यांनी पौलाला धरून मंदिरातून बाहेर ओढून काढले. तोच दरवाजे बंद करण्यात आले. 31ते त्याला ठार मारू पाहत असता पलटणीच्या सरदाराला बातमी कळली की, संबंध यरुशलेममध्ये गोंधळ माजला आहे. 32शिपाई व रोमन अधिकारी ह्यांना घेऊन तो त्यांच्याकडे तत्काळ धावत गेला. सरदार व शिपाई ह्यांना पाहून त्यांनी पौलाला मारावयाचे थांबविले. 33सरदाराने जवळ येऊन त्याला धरले आणि दोन साखळ्यांनी बांधण्याचा हुकूम केला, मग हा कोण व ह्याने काय केले, असे तो विचारू लागला. 34लोक निरनिराळी ओरड करू लागले. ह्या गलबल्यामुळे त्याला खातरी लायक असे काही कळेना म्हणून त्याने त्याला गढीत नेण्याचा हुकूम केला. 35तो पायऱ्यांवर आला, तेव्हा लोकांच्या दांडगाईमुळे शिपायांनी त्याला उचलून नेले. 36लोकांचा समुदाय मागे चालत, ‘त्याला ठार करा’, असे ओरडत होता.
37पौलाला गढीत नेणार इतक्यात त्याने सरदाराला विनंती केली, “मला आपल्याबरोबर काही बोलावयाची परवानगी मिळेल का?” तो म्हणाला, “तुला ग्रीक भाषा येते काय? 38ज्याने थोड्या दिवसांपूर्वी बंड उठवून चार हजार सशस्त्र मारेकऱ्यांना रानात नेले, तोच मिसरी तू आहेस ना?”
39पौलाने म्हटले, “मी यहुदी असून किलिकिया नगरातील तार्स ह्या महत्त्वपूर्ण ठिकाणचा राहणारा आहे. मी आपल्याला विनंती करतो की, लोकांबरोबर बोलण्याची मला परवानगी द्या.”
40त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायऱ्यांवर उभे राहून लोकांना हाताने खुणावले आणि अगदी शांत झाल्यावर हिब्रू भाषेत तो पुढीलप्रमाणे बोलला:
सध्या निवडलेले:
प्रेषितांचे कार्य 21: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.