YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहान 4:1-10

1 योहान 4:1-10 MACLBSI

प्रियजनहो, “मला पवित्र आत्मा मिळाला आहे”, असे म्हणणाऱ्या सर्व माणसांवर विश्वास ठेऊ नका, तर त्यांना मिळालेला आत्मा देवाकडून मिळालेला आहे किंवा नाही ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात वावरत आहेत. देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा: जो आत्मा कबूल करतो की, येशू ख्रिस्त मानव म्हणून आला तो देवाकडचा आहे. जो आत्मा येशू मानव म्हणून आला हे कबूल करत नाही, तो देवाकडचा नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे. तो येणार आहे, हे तुम्ही ऐकले आहे आणि तो आत्ता जगात आलाच आहे. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि खोट्या संदेष्ट्यांवर तुम्ही जय मिळवला आहे. कारण तुमच्यामध्ये जो आत्मा आहे, तो जो जगात आहे, त्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे. ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते आणि जग त्यांचे ऐकून घेते. परंतु आपण देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. ह्यावरून सत्याचा आत्मा कोणता व असत्याचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो. प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवाकडून येते. जो कोणी प्रीती करतो, तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही, तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे. देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले आहे, ह्यासाठी की, त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे, ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच:आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हांवर प्रीती केली आणि तुम्हाआम्हांला पापांची क्षमा मिळावी म्हणून त्याच्या पुत्राला पाठविले.