त्यादिवशी सभास्थानात, अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता आणि तो मोठ्याने ओरडून म्हणाला, हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे! देवाचा पवित्र! तो तूच आहेस. येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा आणि त्याच्यातून नीघ!” तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्यास जमिनीवर खाली पाडले व त्या मनुष्यास काहीही इजा न करता तो त्याच्यातून बाहेर निघाला. तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्याना देखील आज्ञा करतो व ते बाहेर येतात. अशाप्रकारे त्याच्याविषयीची किर्ती चहुकडील प्रदेशात पसरत गेली. येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू तापाने आजारी होती. त्यांनी तिला बरे करण्याविषयी त्यास विनंती केली. येशू तिच्याजवळ उभा राहिला व त्याने तापाला धमकावले आणि तिच्यातून ताप निघाला. ताबडतोब उठून ती त्यांची सेवा करू लागली. सूर्य मावळत असतांना, निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्या सर्व मनुष्यांना त्याच्याकडे आणले. त्याने प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले. कित्येकांमधून अशुद्ध आत्मे बाहेर आले. ते अशुद्ध आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते, तू देवाचा पुत्र आहेस. परंतु तो ख्रिस्त आहे हे त्यांना माहिती असल्याने त्याने त्यांना दटावले व काही बोलू दिले नाही. दिवस उगवताच, तो एकांत स्थळी गेला. पण लोक त्यास शोधत होते. तो जेथे होता तेथे ते लगेच आले आणि त्यांच्यातून त्याने निघून जाऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले. परंतु तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याची सुवार्ता मला इतर गावांमध्येही सांगितली पाहिजे कारण याच कारणासाठी मला पाठवले आहे.” मग तो संपूर्ण यहूदीया प्रांतातील सभास्थानामध्ये उपदेश करीत गेला.
लूक 4 वाचा
ऐका लूक 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 4:33-44
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ