लूक 4:33-44
लूक 4:33-44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यादिवशी सभास्थानात, अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता आणि तो मोठ्याने ओरडून म्हणाला, हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे! देवाचा पवित्र! तो तूच आहेस. येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा आणि त्याच्यातून नीघ!” तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्यास जमिनीवर खाली पाडले व त्या मनुष्यास काहीही इजा न करता तो त्याच्यातून बाहेर निघाला. तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्याना देखील आज्ञा करतो व ते बाहेर येतात. अशाप्रकारे त्याच्याविषयीची किर्ती चहुकडील प्रदेशात पसरत गेली. येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू तापाने आजारी होती. त्यांनी तिला बरे करण्याविषयी त्यास विनंती केली. येशू तिच्याजवळ उभा राहिला व त्याने तापाला धमकावले आणि तिच्यातून ताप निघाला. ताबडतोब उठून ती त्यांची सेवा करू लागली. सूर्य मावळत असतांना, निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्या सर्व मनुष्यांना त्याच्याकडे आणले. त्याने प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले. कित्येकांमधून अशुद्ध आत्मे बाहेर आले. ते अशुद्ध आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते, तू देवाचा पुत्र आहेस. परंतु तो ख्रिस्त आहे हे त्यांना माहिती असल्याने त्याने त्यांना दटावले व काही बोलू दिले नाही. दिवस उगवताच, तो एकांत स्थळी गेला. पण लोक त्यास शोधत होते. तो जेथे होता तेथे ते लगेच आले आणि त्यांच्यातून त्याने निघून जाऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले. परंतु तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याची सुवार्ता मला इतर गावांमध्येही सांगितली पाहिजे कारण याच कारणासाठी मला पाठवले आहे.” मग तो संपूर्ण यहूदीया प्रांतातील सभास्थानामध्ये उपदेश करीत गेला.
लूक 4:33-44 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सभागृहामध्ये भुताने पछाडलेला, अशुद्ध आत्मा लागलेला, एक मनुष्य होता तो उच्चस्वराने म्हणाला, “नासरेथकर येशू येथून निघून जा! तुम्हाला आमच्याशी काय काम? आमचा नाश करावयास आले आहात काय? तुम्ही कोण आहात हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन!” “गप्प राहा!” येशूंनी धमकाविले, “यातून बाहेर ये!” मग त्या भुताने त्या मनुष्याला सर्वांसमोर खाली पाडले आणि त्याला काहीही उपद्रव न करता तो निघून गेला. सर्व लोक चकित झाले आणि आपसात म्हणू लागले, “हे काय आहे! काय हा अधिकार आणि त्यांच्या शक्तीने ते अशुद्ध आत्म्यांना आदेश देतात व ते बाहेर येतात!” त्यांच्याबद्दलची बातमी त्या आसपासच्या प्रदेशात पसरत गेली. येशू सभागृहातून बाहेर पडल्यानंतर शिमोनाच्या घरी गेले. तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली होती, तिला मदत करावी असे त्यांनी येशूंना सांगितले. त्यांनी तिच्यावर वाकून तापाला धमकाविले व तिचा ताप नाहीसा झाला. ती लगेच उठली आणि त्यांची सेवा करू लागली. सूर्यास्ताच्या वेळी, लोकांनी ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होते त्या सर्वांना येशूंकडे आणले आणि त्यांनी त्या प्रत्येकावर हात ठेऊन त्यांना बरे केले. याशिवाय, लोकांमधून पुष्कळ भुतेही, “तुम्ही परमेश्वराचा पुत्र आहात!” असे ओरडून बाहेर आले. येशूंनी त्यांना धमकाविले व बोलण्यास सक्त मनाई केली, कारण ते ख्रिस्त आहे, हे त्यांना माहीत होते. पहाटेच, येशू एकांतस्थळी गेले. लोक त्यांना शोधीत जिथे ते होते तिथे गेले. तेव्हा येशू त्यांना सोडून निघून जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. पण त्यांनी उत्तर दिले, “मला परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता दुसर्या गावांमध्येही सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.” आणि ते सर्व यहूदीया प्रांतातील प्रत्येक सभागृहांमध्ये उपदेश करीत राहिले.
लूक 4:33-44 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा अशुद्ध भुताच्या आत्म्याने पछाडलेला कोणीएक माणूस सभास्थानात होता; तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “अरे येशू नासरेथकरा! ‘तू आमच्यामध्ये का पडतोस?’ तू आमचा नाश करण्यास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र (पुरुष) तो.” तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, “गप्प राहा व ह्याच्यातून नीघ.” मग भूत त्या मनुष्याला त्यांच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाले. तेव्हा सर्व जण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात!” नंतर त्याच्याविषयीची ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली. मग तो सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू कडक तापाने पडली होती, तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले, तेव्हा तिचा ताप निघाला व लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली. मग सूर्यास्ताच्या वेळी, ज्या सर्वांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती त्यांना त्यांनी त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यांना बरे केले. “तू ख्रिस्त, देवाचा पुत्र आहेस,” असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली; परंतु त्याने त्यांना धमकावले व बोलू दिले नाही; कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांना ठाऊक होते. मग दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आले, आणि आपल्यापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते. परंतु तो त्यांना म्हणाला, “मला इतर गावांनाही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे.” मग तो गालीलाच्या सभास्थानांमध्ये उपदेश करत फिरला.
लूक 4:33-44 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अशुद्ध आत्म्याने पछाडलेला एक माणूस सभास्थानात होता, तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “आम्ही आमचे पाहून घेऊ! अरे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करायला आला आहेस काय? तू कोण आहेस, हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तू आहेस!” येशूने त्याला दटावले, “गप्प राहा व ह्याच्यातून निघून जा.” तेव्हा भूत त्या मनुष्याला त्यांच्यासमोर खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघून गेले. सर्व जण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने दुष्ट आत्म्यांना हुकूम सोडतो आणि ते निघून जातात!” ह्या घटनेनंतर त्याची ख्याती त्या प्रदेशात सर्व ठिकाणी पसरत गेली. तो सभास्थानातून उठून शिमोनच्या घरी गेला. शिमोनची सासू तापाने फणफणत होती. तिला बरे करावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. तिच्या खाटेजवळ उभे राहून त्याने तापाला आदेश दिला व तिचा ताप निघाला. ती लगेच उठून त्यांची सेवा करू लागली. ज्या सर्वांचे नातलग नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेले होते त्यांनी त्यांना सूर्यास्ताच्या वेळी येशूकडे आणले. त्याने त्यांच्यांतील प्रत्येकावर हात ठेवून त्यांना बरे केले. “तू देवाचा पुत्र आहेस”, असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली, परंतु त्याने त्यांना दटावून बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे, हे त्यांना ठाऊक होते. दिवस उगवल्यानंतर तेथून निघून तो एकांत ठिकाणी गेला. लोकसमुदाय त्याचा शोध घेत त्याच्याजवळ आले आणि आपणामधून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला आग्रह करू लागले. परंतु तो त्यांना म्हणाला, “मला इतर नगरांतही देवाच्या राज्याचे शुभवर्तमान जाहीर केले पाहिजे कारण त्यासाठीच मला पाठविण्यात आले आहे.” म्हणून तो यहुदियाच्या सभास्थानांमध्ये प्रबोधन करीत फिरला.