2 राजे 9
9
इस्त्राएलाचा राजा म्हणून येहूला अभिषेक
1अलीशाने, एका तरुण संदेष्ट्याला बोलावले. अलीशा त्यास म्हणाला, “तयार हो आणि ही तेलाची कुपी बरोबर घे. रामोथ-गिलाद येथे जा. 2येथे पोचल्यावर निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याला शोधून काढ. मग आत जाऊन त्यास त्याच्या भावांमधून उठवून आतल्या खोलीत ने. 3त्यानंतर ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर तेल ओत. तेव्हा ‘परमेश्वर म्हणतो की इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला आहे,’ असे म्हण. एवढे झाले की धावत परत ये. तेथे थांबू नकोस!” 4तेव्हा तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलाद येथे आला 5येथे पोचल्यावर त्यास सैन्यातील सरदार बसलेले आढळले. त्यांना तो म्हणाला, “तुमच्यासाठी एक निरोप आहे.” येहू म्हणाला, “आम्ही सर्वच इथे आहोत. निरोप नक्की कोणासाठी आहे?” तेव्हा तो तरुण म्हणाला, “हे सरदारा, तुझ्याशीच; माझे काम आहे.” 6यावर येहू उठून घरात आला. त्या तरुण संदेष्ट्याने त्याच्या मस्तकावर तेलाचा अभिषेक केला. येहूला तो म्हणाला, इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, “इस्राएलचा पुढचा राजा म्हणून मी तुला अभिषेक करत आहे.” 7तुमचा राजा अहाब याच्या घराण्याचा तू संहार करावास. अशा तऱ्हेने मी माझे सेवक, संदेष्टे, परमेश्वराचे सर्व सेवक यांच्या वधाचा सूड घेऊन ईजबेलला शासन करणार आहे. 8म्हणजे अहाबचे संपूर्ण घराणे नष्ट होईल. अहाबाच्या घराण्यात एकही मुलगा जिवंत राहणार नाही. मग ती इस्राएलमधील मुक्त व्यक्ती असो की गुलाम. 9नबाटचा मुलगा यराबाम तसेच अहीयाचा मुलगा बाशा यांच्या घराण्यासारखी अहाबाच्या घराण्याची मी गत करून टाकीन. 10“ईजबेलला इज्रेल भागात कुत्री खातील. तिचे दफन होणार नाही. एवढे बोलून हा तरुण संदेष्टा दार उघडून पळून गेला.” 11येहू पुन्हा राजाच्या सरदारांमध्ये आला. तेव्हा त्यांच्यातला एकजण म्हणाला, “येहू, सर्व कुशल आहे ना? तो वेडा तुझ्याकडे कशाला आला होता?” येहू त्यांना म्हणाला, “तो मनुष्य कोण आणि त्याचा संदेश तुम्हास माहित आहेच.” 12तेव्हा ते सर्व म्हणाले, “नाही, नाही खर काय झाले ते सांग. काय म्हणाला तो?” तेव्हा तो तरुण संदेष्टा काय म्हणाला ते येहूने सरदारांना सांगितले. येहू म्हणाला, “तो मला म्हणाला, ‘इस्राएलाचा राजा म्हणून परमेश्वराच्या सांगण्यावरुन मी तुला अभिषेक करत आहे.” 13हे ऐकून मात्र त्यांनी ताबडतोब आपले अंगरखे उतरवले, येहूच्या समोरच्या पायऱ्यांवर ते ठेवले आणि शिंग फुंकून येहू राजा झाला असल्याची घोषणा केली.
येहू योरामास ठार मारतो
14निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याने योरामाविरुध्द कट रचला. यावेळी, अरामाचा राजा हजाएल याच्यापासून रामोथ-गिलादाचे संरक्षण करण्यासाठी योराम सर्व इस्राएलांसह झटत होता. येहू इज्रेल येथे जातो 15राजा योथामाने हजाएलशी झुंज घेतली होती. पण अरामी लोकांनी योरामाला जायबंदी केले होते तेव्हा जखमा भरुन येण्यासाठी तो इज्रेलला गेला होता. तेव्हा येहू त्या सगळ्या सरदारांना म्हणाला, “नवीन राजा म्हणून मला तुमची मान्यता असेल तर ही बातमी नगरातून इज्रेलमध्ये जाऊ देऊ नका.” 16योराम इज्रेलमध्ये आराम करत होता. येहू रथात बसून इज्रेलला गेला. यहूदाचा राजा अहज्या देखील तेव्हा योथामाला भेटावयाला इज्रेलला आला होता. 17इज्रेलमध्ये बुरूजावर एक पहारोकरी होता. त्याने येहूला मोठ्या जमावनिशी येताना पाहिले. तो म्हणाला, “मोठाच जमाव दिसतोय” योरामाने त्यास सांगितले, “कोणाला तरी घोड्यावरुन त्यांच्याकडे पाठव. ते शांतीने येत आहेत का ते त्या स्वाराला विचारायला सांग.” 18तेव्हा एक सेवक घोड्यावरुन येहूला सामोरा गेला. राजा योरामाच्या वतीने त्याने येहूला विचारले, “तुमचे येणे शांततेचे आहे ना?” येहू त्यास म्हणाला, “शांतीशी तुला कर्तव्य नाही. असा माझ्या मागेमाग ये.” पहारेकऱ्याने योथामाला सांगितले, “आपला तिकडे पाठवलेला मनुष्य अजून परत आलेला नाही.” 19तेव्हा योथामाने दुसऱ्या घोडेस्वाराला पाठवले, तो येहूकडे आला आणि राजा योरामाच्या वतीने सलोख्याचे अभिवादन केले. येहू म्हणाला, “तुला सलोख्याशी काय करायचे आहे? असा माझ्या मागोमाग ये?” 20पहारेकऱ्याने योथामाला सांगितले, “संदेश घेऊन गेलेला दुसरा मनुष्यही परत आलेला नाही. रथ चालवणारा तर वेड्यासारखा भरधाव रथ हाकतो आहे. निमशीचा मुलगा येहू याच्यासारखीच ती पध्दत आहे. 21योथामाने मग स्वत:चा रथ तयार ठेवण्यास सांगितले.” तेव्हा सेवकाने योरामाचा रथ आणला. इस्राएलचा राजा योराम आणि यहूदाचा राजा अहज्या या दोघांनी आपापले रथ येहूच्या दिशेने पळवले. इज्रेलचा नाबोथ याच्या शेतात त्यांची यहूशी गाठ पडली. 22येहूला पाहून योरामाने त्यास विचारले, “येहू तू शांततेसाठीच आला आहेस ना?” येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार आणि चेटके चालू असेपर्यंत कसली आली आहे शांतता?” 23योरामाने ताबडतोब आपले घोडे वळवले आणि पळ काढण्याच्या तयारीत तो अहज्याला म्हणाला, “अहज्या, दगा आहे.” 24पण येहूने सर्व शक्तीनिशी धनुष्य ओढून योरामाचा बरोबर दोन बाहूंच्यामध्ये वेध घेतला. बाण योरामाच्या हृदयातून आरपार गेला. योराम रथात मरुन पडला. 25येहूने आपल्या रथाचा सारथी बिदकर याला सांगितले, “योरामाचा मृतदेह उचल आणि तो इज्रेलचा नाबोथ ह्याच्या शेतात फेकून दे आपण दोघे, योरामाचा बाप अहाब याच्याबरोबर बसून चाललो होतो तेव्हा हे असे घडणार असे परमेश्वराने सांगितले होते, ते आठवते ना? 26परमेश्वर म्हणाला होता, ‘नाबोथ आणि त्याची मुले यांचे रक्त काल मला दिसले तेव्हा त्या शेतात मी अहाबाला शिक्षा करीन.’ प्रत्यक्ष परमेश्वरच असे म्हणाला. तेव्हा उचल तो मृतदेह आणि परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे दे टाकून त्या शेतात!”
येहू अहज्याला ठार मारतो
27यहूदाचा राजा अहज्या याने ते पाहिले आणि तेथून पळ काढला. मळ्यातल्या एका घराच्या बाजूने तो गेला. येहूने त्याचा पाठलाग केला. येहू म्हणाला, “अहज्याचाही वध करा.” तेव्हा येहूच्या मनुष्यांनी अहज्याला इब्लाम जवळच्या गूरच्या रस्त्यावर जखमी केले. तेव्हा अहज्या मगिद्दोकडे पळाला पण तिथेच मरण पावला. 28अहज्याच्या चाकरांनी त्याचा मृतदेह रथातून यरूशलेम येथे आणला. त्याचे त्यांनी दावीद नगरात त्याच्या पूर्वजांशेजारी दफन केले. 29अहाबाचा पुत्र योरामाचे इस्राएलचा राजा म्हणून अकरावे वर्षे चालू असताना अहज्या यहूदाचा राजा झाला होता.
ईजबेलीचा मृत्यू
30येहू इज्रेलला आला ते ईजबेलने ऐकले. तिने चांगले प्रसाधन केले, केशभूषा केली आणि खिडकीत बसून बाहेर बघू लागली. 31येहूने नगरात प्रवेश केला. ईजबेल म्हणाली, ते शांतीने येत आहेत काय? “काय रे जिम्री? त्याच्या सारखेच तू ही आपल्या स्वामीला मारलेस?” 32येहूने वर खिडकीकडे पाहत म्हटले, “माझ्या बाजूने कोण आहे? बोला!” तेव्हा खिडकीतून दोन तीन खोजांनी त्याच्याकडे पाहिले. 33येहू त्यांना म्हणाला, “त्या ईजबेलला खाली फेका.” तेव्हा त्या खोजांनी ईजबेलला खाली फेकून दिले. भिंतीवर आणि घोड्यांवर तिचे रक्त उडाले. घोडे तिच्यावरून चालून गेले. 34येहू घरात शिरला आणि त्याने फराळाच्या पदार्थांचा समाचार घेतला. मग तो म्हणाला, “आता त्या शापित स्त्रीला घ्या व तिचे दफन करा कारण ती राजकन्या होती.” 35लोक तिला पुरायला पुढे झाले पण त्यांना तिच्या देहाचा पत्ता लागला नाही. फक्त तिचे शिर, पाय आणि हाताचे तळवे सापडले. 36तेव्हा त्या लोकांनी येऊन येहूला हे सांगितले. येहू त्यांना म्हणाला, “आपला सेवक एलीया तिश्बी याच्या मार्फत परमेश्वराने हेच सांगितले होते. एलीया म्हणाला होता, ‘इज्रेलच्या परिसरात ईजबेलचा देह कुत्री खातील.’ 37शेणखतासारखा ईजबेलचा देह इज्रेलच्या भूमीवर पडेल. लोकांस तिचे प्रेत ओळखू येणार नाही.”
सध्या निवडलेले:
2 राजे 9: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.