2 राजे 10
10
येहू अहाबाच्या घराण्याचा नाश करतो
1शोमरोनात अहाबाला सत्तर पुत्र होते. शोमरोनातील अधिकारी आणि वडिलधारी मंडळी यांना येहूने पत्रे पाठवली. व इज्रेलच्या अधिकाऱ्यांना तसेच ज्यांनी या अहाबाच्या मुलांना वाढवले त्यांनाही पाठवली. पत्रात त्याने लिहिले. 2“हे पत्र मिळाल्यावर तुमच्या धन्याच्या मुलांपैकी जो सगळ्यात गुणी आणि लायक मुलगा असेल त्याची निवड करा. रथ, घोडे इत्यादी तुमच्याजवळ आहेच. तुमचे वास्तव्यही मजबूत शहरात आहे. 3तुमच्याकडे शस्त्रास्त्रे आहेत. तुम्ही ज्या मुलाची निवड कराल तो उत्तम व योग्य असेल त्यास त्याच्या वडिलाच्या सिंहासनावर बसवा. मग आपल्या धन्याच्या घराण्यासाठी लढा द्या.” 4पण हे वाचून ती अधिकारी आणि वडिलधारी मंडळी फारच घाबरली. ते सर्व म्हणाले, “योराम आणि अहज्या हे दोन राजे सुद्धा येहूला रोखू शकले नाहीत, तेव्हा आम्ही काय त्यास अडवणार?” 5मग, अहाबाच्या घराची देखभाल करणारा अधिकारी, नगराधिकारी, वडिलधारी मंडळी आणि त्या मुलांचे पालक यांनी येहूला खालील प्रमाणे संदेश पाठवला, “आम्ही तुझे सेवक आहोत. तू म्हणशील ते आम्ही करु. आम्ही कोणालाच राजा करत नाही. तुला योग्य वाटेल ते कर.” 6येहूने मग त्या अधिकाऱ्यांना आणखी एक पत्र पाठवले. त्यामध्ये त्याने लिहिले, “तुमचा मला पाठिंबा असेल आणि तुम्ही माझ्या आज्ञेत असाल तर अहाबाच्या मुलांचा शिरच्छेद करा. साधारण याच वेळेला इज्रेल येथे त्यांना माझ्याकडे आणा.” अहाब राजाची सत्तर मुले होती आणि नगरातील अधिकाऱ्यांकडे ती होती. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना वाढवले होते. 7या अधिकाऱ्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी या राजाच्या सर्व सत्तर राजपुत्रांना एकत्र आणून ठार केले. मग त्यांची मस्तके टोपल्यांमध्ये भरली. या टोपल्या येहूकडे इज्रेल याठिकाणी पाठवल्या. 8निरोप्याने येऊन येहूला सांगितले, “या लोकांनी राजपुत्रांची मुंडकी आणली आहेत.” त्यास येहू म्हणाला, “नगराच्या वेशीजवळ त्या मुंडक्यांचे दोन ढीग करून सकाळपर्यंत तिथे ठेवा.” 9सकाळी येहू निघाला आणि लोकांपुढे उभा राहून त्यांना म्हणाला, “तुम्ही निरपराध आहात. मी माझ्या धन्याविरुध्द कट रचून त्यास ठार केले. पण अहाबाच्या या मुलांची हत्या कोणी केली? तुम्हीच त्यांना मारलेत. 10परमेश्वर बोलतो त्याप्रमाणेच सर्व घडते हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. अहाबाच्या कुटुंबाबद्दल परमेश्वराने एलीयाकडून वदविले होते. आता परमेश्वराने आपण ज्या गोष्टी करु म्हणून सांगितले होते त्या सर्व करून दाखवल्या आहेत.” 11आणि येहूने इज्रेलमधल्या अहाबाच्या सर्व कुटुंबियांना ठार केले. सर्व प्रतिष्ठित माणसे, जिवलग मित्र याजक यांची त्याने हत्या केली. अहाबाच्या नातलगांपैकी कोणीही जिवंत राहिले नाही. 12इज्रेल सोडून येहू शोमरोनला आला. वाटेत तो मेंढपाळांच्या तळावर थांबला. मेंढपाळ लोकर कातरतात त्या ठिकाणच्या एका घरात तो गेला. 13यहूदाचा राजा अहज्या याच्या नातेवाईकांना तो भेटला. येहूने त्यांची चौकशी केली, “तुम्ही कोण आहात?” ते म्हणाले, “आम्ही यहूदाचा राजा अहज्या याचे नातेवाईक. राजाची मुले आणि राजमातेची मुले यांची विचारपूस करायला आम्ही जात आहोत.” 14तेव्हा येहू आपल्याबरोबरच्या लोकांस म्हणाला, “यांना जिवंत ताब्यात घ्या.” तेव्हा येहूच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले. ते सगळे मिळून बेचाळीस होते. बेथ-एकेद जवळच्या विहिरीपाशी येहूने त्या सर्वांना ठार केले. येहूने कोणालाही जिवंत ठेवले नाही. 15तिथून निघाल्यावर येहूला रेखाबाचा मुलगा योनादाब भेटला. तो येहूला भेटायलाच निघाला होता. येहूने त्याचे कुशल विचारुन म्हटले, “मी तुझा विश्वासू मित्र आहे, तसाच तूही आहेस ना?” यहोनादाब म्हणाला, “होय, मी तुझा विश्वासू मित्र आहे.” येहू म्हणाला, “तसे असेल तर मला तुझा हात दे.” आणि येहूने त्याचा हात धरुन त्यास आपल्या रथात घेतले. 16येहू योनादाबाला म्हणाला, “चल माझ्याबरोबर. परमेश्वराबद्दल मला किती उत्कंठा आहे ती बघ.” तेव्हा यहोनादाब येहूबरोबर त्याच्या रथातून निघाला. 17शोमरोनला पोहोचल्यावर येहूने अहाबचे जे कोणी कुटुंबिय अजून जिवंत होते त्या सर्वांना मारले. एलीयाला परमेश्वराने सांगितले होते ते सर्व येहूने केले.
येहू बआल दैवताची उपासना समूळ नष्ट करतो
18येहूने मग सर्वांना एकत्र बोलावले. त्यांना तो म्हणाला, “अहाबाने बआलाची थोडी सेवा केली. पण येहू मात्र त्याची बरीच सेवा करणार आहे. 19आता बआलाच्या सर्व संदेष्टयांना आणि याजकांना बोलावून घ्या. तसेच जे जे बआलाची पूजा करतात त्यांनाही बोलवा. यामध्ये कोणीही गैरहजर असता कामा नये. बआलसाठी मला मोठा यज्ञ करायचा आहे. इथे जो येणार नाही त्यास मी ठार करीन हे नक्की,” येहूची ही सर्व बतावणी होती. त्यास बआलाच्या पूजकांचा संहार करायचा होता. 20येहू म्हणाला, “बआलसाठी पवित्र मेळ्याची तयारी करा.” तेव्हा याजकांनी त्याची घोषणा केली. 21येहूने मग इस्राएलभर संदेश पाठवला. बआलाचे समस्त पूजक जमले. एकही मागे राहिला नाही. बआलाच्या देवळात ते आल्यावर देऊळ भरुन गेले. 22वस्त्र भांडार सांभाळणाऱ्याला येहू म्हणाला, “बआलाच्या या सर्व पूजकांसाठी वस्त्रे दे.” तेव्हा त्याने सर्वासाठी वस्त्रे दिली. 23मग येहू आणि रेखाबाचा मुलगा योनादाब बआलाच्या देवळात शिरले. येहू तेथे जमलेल्या बआलाच्या सर्व पूजकांना म्हणाला, “तुमच्यात कोणी परमेश्वराचा सेवक नाही ना ते एकदा पाहून खात्री करून घ्या. बआलाच्या पूजा करणारेच सर्व इथे आहेत ना ते पाहा.” 24यज्ञ आणि होमार्पणे करण्यासाठी बआलाचे सर्व पूजक बालाच्या देवळात शिरले. बाहेर येहूने ऐंशीजणांना तयार ठेवले होते. त्यांना येहूने सांगितले होते, “कोणालाही आतून निसटू द्यायचे नाही. एखादा कोणी गेलाच तर त्यास जाऊ देणाऱ्याला आपला जीव गमवावा लागेल.” 25स्वत: यज्ञात होमबली अर्पण केल्यावर लगेच हुजऱ्यांना आणि सरदारांना येहूने सांगितले, “आता, आत जा आणि बालाची पूजा करणाऱ्यांना ठार करा. कोणालाही देवळातून जिवंत बाहेर येऊ देऊ नका.” तेव्हा सरदारांनी धारदार तलवारींनी सर्व पूजकांना ठार केले. त्यांनी आणि हुजऱ्यांनी बाल देवतेच्या पूजकांचे मृतदेह बाहेर टाकले ते बआलाच्या देवळाच्या गर्भगृहात गेले 26स्मृतीस्तंभ त्यांनी उखडून टाकले आणि बआलाची देऊळ जाळले. 27बआलाच्या स्मृतीस्तंभाचा त्यांनी चुराडा केला. बआलाच्या देवळाचाही विध्वंस केला. त्या देवळाचे त्यांनी प्रसाधनगृह करून टाकले. अजूनही लोक त्याचा तसाच वापर करतात. 28अशा प्रकारे इस्राएलमधली बआलाची पूजा येहूने मोडून काढली. 29पण नबाटचा मुलगा यराबाम याने जी पापे इस्राएलाला करायला लावली त्यापासून येहू पूर्णपणे परावृत्त झाला नाही. बेथेल आणि दान इथली सोन्याची वासरे त्याने उध्वस्त केली नाहीत. 30परमेश्वर येहूला म्हणाला, “तू चांगली कामगिरी केलीस. माझ्या मते जे उचित तसेच तू वागलास. अहाबाच्या कुटुंबाचा मला हव्या त्या पध्दतीने तू विध्वंस केलास. तेव्हा आता तुझ्या पुढच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील. 31पण परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन मन:पूर्वक वर्तन ठेवणे येहूला जमले नाही. यराबामाच्या ज्या दुष्कृत्यांमुळे इस्राएल पापाच्या गर्तेत गेला ते करण्यापासून तो स्वत:ला थोपवू शकला नाही.” 32याचवेळी परमेश्वराने इस्राएल प्रदेशाचे लचके तोडायला सुरुवात केली. अरामाचा राजा हजाएल याने इस्राएलच्या सर्व सीमांवर पराभव केला. 33यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेश त्याने जिंकला गाद, रऊबेन आणि मनश्शे यांच्या कुटुंबांच्या ताब्यातील प्रदेशासकट सगळा गिलाद त्यामध्ये आला. तसेच आर्णोन खोऱ्यातील अरोएर पासून गिलाद आणि बाशानपर्यंतचा प्रदेश हजाएलने जिंकला. 34“इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात येहूच्या इतर पराक्रमांची नोंद आहे. 35येहू मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दफन शोमरोनात केले. येहूचा मुलगा यहोआहाज त्यानंतर इस्राएलचा राजा झाला. 36येहूने शोमरोन मधून इस्राएलवर अठ्ठावीस वर्षे राज्य केले.
सध्या निवडलेले:
2 राजे 10: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.