YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 8

8
शूनेम येथील स्त्रीची जमीन तिला परत मिळते
1अलीशामुळे जो मुलगा जिवंत झाला होता त्या मुलाच्या आईशी अलीशा बोलला. अलीशा म्हणाला, “तू आपल्या कुटुंबियासह दुसऱ्या देशात जा. कारण परमेश्वर या प्रदेशात दुष्काळ पाडणार आहे. आणि तो सात वर्षे चालेल.” 2तेव्हा देवाच्या मनुष्याच्या म्हणण्याप्रमाणे तिने केले. पलिष्ट्यांच्या देशात ती आपल्या कुटुंबियांसमावेत जाऊन सात वर्षे राहिली. 3सात वर्षे उलटल्यावर ती पलिष्ट्यांच्या देशातून परत आली. मग ती राजाला भेटायला निघाली. आपले घरदार आणि जमीन आपल्याला पुन्हा परत मिळावी यासाठी तिला राजाची मदत हवी होती. 4अलीशा संदेष्ट्याचा सेवक गेहजी याच्याशी राजा बोलत बसला होता. राजा गेहजीला म्हणाला, “अलीशाने जी मोठमोठी कृत्ये केली ती कृपाकरून मला सांग.” 5अलीशाने एका मृताला पुन्हा जिवंत कसे केले याविषयी गेहजी राजाला सांगत असतानाच जिच्या मुलाला अलीशाने जिवंत केले होते ती स्त्री राजासमोर आली. आपली जमीन आणि घर परत मिळावे यासाठी राजाची मदत मागायला ती आली होती. गेहजी म्हणाला, “स्वामी, हीच ती स्त्री आणि अलीशाने जीवदान दिले तो हाच मुलगा.” 6राजाने त्या स्त्रीची विचारपूस केली आणि ती राजाशी बोलली. राजाने मग एका कारभाऱ्याला तिच्या मदतीला दिले आणि सांगितले, “तिच्या मालकीचे आहे ते सर्व तिला परत द्या. तसेच, ती हा देश सोडून गेली तेव्हापासून आतापर्यंतचे तिच्या शेतातले उत्पन्न तिला द्या.”
हजाएल अरामाचा राजा होतो
7अलीशा दिमिष्क येथे गेला. अरामाचा राजा बेन-हदाद तेव्हा आजारी होता. एकाने त्यास सांगितले, “आपल्या इथे एक देवाचा मनुष्य आला आहे.” 8तेव्हा राजा बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “नजराणा घेऊन त्या संदेष्ट्याच्या भेटीला जा. मी या दुखण्यातून बरा होईन की नाही ते परमेश्वरास विचारायला त्यास सांग.” 9तेव्हा हजाएल अलीशाच्या भेटीला गेला. दिमिष्कातील उत्तमोत्तम पदार्थाचा नजराणा तो अलीशासाठी घेऊन गेला. या गोष्टी त्याने चाळीस उंटांवर लादल्या होत्या. हजाएल अलीशाकडे जाऊन म्हणाला, “तुमचा शिष्य अरामाचा राजा बेन-हदाद याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. या दुखण्यातून आराम पडेल का असे त्यांनी विचारले आहे.” 10तेव्हा अलीशा हजाएलला म्हणाला, “बेन-हदादला जाऊन सांग, ‘तू खात्रीने बरा होशील.’ पण तो मरणार आहे असे खरे म्हणजे परमेश्वराने मला सांगितले आहे.” 11एवढे बोलून मग देवाच्या मनुष्याने, हजाएलास लाज वाटेपर्यंत त्याच्याकडे टक लावून पाहिले. नंतर अलीशा रडू लागला. 12हजाएलने त्यास विचारले, “माझ्या स्वामी, तुम्ही का रडत आहात?” अलीशाने सांगितले, “इस्राएलवर तू अत्याचार करणार आहेस हे मला माहित आहे म्हणून मला वाईट वाटते. त्यांची मजबूत नगरे तू जाळशील. आपल्या तलवारीने त्यांची तरुण माणसे कापून काढशील. त्यांच्या लहान मुलांना ठार करशील त्यांच्या गरोदर बायकांना चिरशील.” 13हजाएल म्हणाला, “मी पडलो कुत्र्यासारखा क्षुद्र मनुष्य एक दुबळामनुष्य या मोठ्या गोष्टी मी कसल्या करणार!” अलीशा म्हणाला, “तू अरामाचा राजा होणार असे परमेश्वराने मला सांगितले आहे.” 14मग हजाएल तिथून निघाला आणि आपल्या धन्याकडे आला. बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “अलीशा तुला काय म्हणाला?” हजाएल म्हणाला, “तुम्ही जगणार आहात असे अलीशाने मला सांगितले.” 15पण दुसऱ्या दिवशी हजाएलने एक रजई घेतली आणि पाण्यात ती भिजवली मग ती बेनहदादच्या तोंडावर टाकली. त्याने बेन-हदाद गुदमरला आणि मरण पावला. अशा प्रकारे हजाएल नवा राजा झाला.
यहूदाचा राजा यहोराम ह्याची कारकीर्द
2 इति. 21:1-20
16यहोशाफाटाचा मुलगा यहोराम यहूदाचा राजा होता. इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना यहोराम इस्राएलच्या राज्यावर आला. 17त्यावेळी यहोराम बत्तीस वर्षाचा होता. यरूशलेमेवर त्याने आठ वर्षे राज्य केले. 18पण इस्राएलच्या इतर राजाप्रमाणेच यहोराम वागला. परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये त्याने केली. अहाबाच्या घरचे लोक वागत तसाच तो वागला. त्याची पत्नी अहाबाची मुलगी होती. 19पण परमेश्वराने आपला सेवक दावीद याला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वराने यहूद्यांचा नाश केला नाही. दाविदाच्या वंशातीलच कोणीतरी सतत गादीवर येईल असे वचन परमेश्वराने दाविदाला दिले होते. 20यहोरामाच्या कारकिर्दीत अदोम फितूरी करून यहूदापासून वेगळा झाला. अदोमी लोकांनी स्वत:च राजाची निवड केली. 21तेव्हा यहोराम आपले सर्व रथ व अधिकाऱ्यास घेऊन साईर येथे गेला. अदोमी सैन्याने त्यास वेढा घातला. यहोराम आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि आपली सुटका केली. यहोरामाचे लोक पळाले आणि घरी परतले. 22अशाप्रकारे अदोमी यहूदाच्या सत्तेपासून वेगळे झाले आणि अजूनही ते तसेच मुक्त आहेत. सुमारास लिब्नानेही बंड केले आणि यहूदापासून ते मुक्त झाले. 23“यहूदाच्या राजांचा इतिहास” या ग्रंथात यहोरामाने जे जे केले त्याची नोंद आहे. 24यहोराम मरण पावला आणि दावीद नगरात आपल्या पूर्वजांसोबत त्याचे दफन झाले. यहोरामाचा मुलगा अहज्या मग राज्य करु लागला.
यहूदाचा राजा अहज्या ह्याची कारकीर्द
2 इति. 22:1-6
25इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहोरामाचा मुलगा अहज्या यहूदाचा राजा झाला. 26त्यावेळी अहज्या बावीस वर्षाचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या. इस्राएलचा राजा अम्री याची ती मुलगी. 27परमेश्वराने जे करु नये म्हणून सांगितले ते ते अहज्याने केले. तो अहाबाचा जावई होता. त्यामुळे अहाबाच्या घराण्यातल्या लोकांसारखीच त्याची वागणूक होती. 28अहाबाचा मुलगा योराम यासह अहज्या रामोथ-गिलाद येथे अरामाचा राजा हजाएल याच्यावर चढाई करून गेला. अराम्यांनी योथामाला जखमी केले. 29आणि रामा येथे योरामाचा राजा हा अरामाचा राजा हजाएल याच्याशी लढत होता, तेव्हा झालेल्या दुखापतीतून बरे होण्यासाठी तो परत इज्रेलास गेला. आणि त्यास भेटायला यहूदाचा राजा यहोराम याचा मुलगा अहज्या खाली इज्रेलला अहाबाचा मुलगा योराम ह्याला पाहायला गेला होता.

सध्या निवडलेले:

2 राजे 8: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन