1 राजे 7
7
शलमोनाच्या इतर इमारती
1शलमोनाला स्वत:साठी महाल बांधण्यास तेरा वर्षे लागली. 2त्याने लबानोनगृह वनातील घरही बांधले. त्याची लांबी शंभर हात, रूंदी पन्नास हात व उंची तीस हात होती. ती ईमारत गंधसरुच्या स्तंभाच्या चार रांगावर असून प्रत्येक स्तंभावर गंधसरूच्या तुळ्या ठेवल्या होत्या. 3त्यावर छत म्हणून गंधसरुच्या लाकडाची पाटण होती. प्रत्येक ओळीत पंधरा खांब अशा पंचेचाळीस खांबांवर तुळ्या होत्या. 4तिन्ही मजल्यावर तुळ्या असून भिंतींवर समोरासमोर येतील अशा खिडक्यांच्या तीन ओळी होत्या. 5दोन्ही टोकांना तीन तीन दरवाजे होते. दाराची कवाडे आणि चौकटी काटकोन चौकोनात होत्या. 6शलमोनाने एक द्वारमंडपही उभारला होता. हा राजासनाचा मंडप पन्नास हात लांब आणि तीस हात रुंद होता. दर्शनी बाजूला आधार देणाऱ्या स्तंभाची रांग होती. 7मग सिंहासनावर बसून न्यायनिवाडा करण्यासाठी त्याने एक दालन बांधून घेतले. त्यास त्याने “न्यायासनाचा मंडप” असे नाव दिले होते. हे दालनही जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेले होते. 8याच्याच आतल्या बाजूला त्याचे घर होते. त्याची बांधणी न्यायासनाच्या मंडपासारखीच होती. मिसरच्या फारो राजाची कन्या म्हणजे शलमोनची पत्नी हिच्यासाठीही त्याने असाच महाल बांधून घेतला. 9या सर्व इमारतींच्या बांधकामात किंमती दगडी चिरे वापरले होते. पुढून मागून घासून ते करवतीने योग्य मापाने कातले होते. पायापासून वळचणीपर्यंत त्यांचाच वापर केला होता. अंगणाभोवतालच्या भिंतीही याच बहुमूल्य दगडांनी बांधल्या होत्या. 10पायासाठी वापरलेले चिरेही असेच प्रशस्त व भारी होते. काहींची लांबी आठ व इतरांची दहा हात होती. 11त्यांच्यावर आणखी चांगल्या प्रतीचे चिरे आणि गंधसरुचे वासे होते. 12महाल, मंदिर आणि द्वारमंडप यांच्या सभोवती भिंत होती. तिला दगडांच्या तीन चिऱ्या आणि गंधसरुच्या लाकडाची एक ओळ परमेश्वराच्या मंदिराचे आतले अंगण व त्या मंदिराची देवडी यांच्याप्रमाणे ही रचना होती.
मंदिराच्या कामात हीरामाने केलेले सहकार्य
13राजा शलमोनाने सोराहून (तायरहून) हिराम नावाच्या मनुष्यास निरोप पाठवून यरूशलेम येथे बोलावून घेतले. 14हिरामची आई नफताली वंशातील होती. त्याचे वडिल सोराचे (तायरचे) होते. ते चांगले तांबट कारागीर होते. हिराम हा एक ज्ञानाने, बुद्धीने, आणि कसबी तांबट होता. म्हणून शलमोन राजाने त्यालाच बोलावून घेतले. त्यानेही हे आमंत्रण स्विकारले. राजाने हिरामला सर्व पितळी कारागिरीवरील प्रमुख म्हणून नेमले. हिरामने पितळेपासून बनवलेल्या सर्व वस्तू घडविल्या. 15हिरामने दोन पितळी स्तंभ घडवले. ते स्तंभ अठरा हात उंचीचे होते. त्या प्रत्येकाला वेढावयास बारा हात दोरी लागे. 16शिवाय त्याने त्या खांबाच्या शेंड्यावर बसवण्यासाठी पितळेच दोन ओतीव कळस केले. त्या एकाएका कळसाची उंची पाच पाच हात होती. 17या खांबाच्या घुमटांना आच्छादण्यासाठी दोन जाळीदार, साखळीची आच्छादने केली. एकाला सात व दुसऱ्याला सात. 18याप्रकारे त्याने खांब तयार करून त्यांच्या शेडंयावर प्रत्येक कळसास झाकण्यासाठी जाळ्यांच्या एका रांगेवर डाळिंबाच्या दोन रांगा केल्या. 19जे कळस देवडीच्या खांबांच्या शेंड्यांवर होते त्यांच्या चार हात जागेत कमळांचे काम केले होते. 20हे घुमट स्तंभावर बसविलेले होते. परडीच्या आकाराच्या जाळीवर ते बसवले होते. या सगळ्या कळसांच्या भोवती रांगेने दोनशे डाळिंबे लावली होती. 21हे दोन पितळी स्तंभ हिरामने द्वारमंडपाशी लावले. दक्षिणेकडील खांबाला याखीन (तो स्थापील) आणि उत्तरे कडील खांबाला बवाज (त्याच्या ठायी सामर्थ्य) असे नाव ठेवले. 22कमळाच्या आकाराचे कळस या खांबांवर चढवले आणि या दोन स्तंभाचे काम संपले. 23मग त्याने एक गंगाळसागर ओतविला होता, त्याचा काठाकडला व्यास दहा हात होता; त्याचा आकार गोल असून त्याची उंची पाच हात होती व त्यास वेढायला तीस हात दोरी लागत असे. 24या हौदाच्या कडेल्या बाहेरच्या बाजूला एक पट्टी बसवली होती. तिच्याखाली पितळी रानकाकड्यांच्या दोन रांगा होत्या. या काकड्या हौदाचाच एक भाग म्हणून एकसंधपणे करून घेतल्या होत्या. 25बारा पितळी बैलांच्या पाठीवर हा हौद विसावलेला होता. बैलांची तोंडे बाहेरच्या बाजूला होती. तिघांची तोंडे उत्तरेला, तिघांची दक्षिणेला, तिघांची पूर्वेला आणि तिघांची पश्चिमेला होती. 26हौदाची जाडी वितभर होती; आणि वरची कड कटोऱ्याच्या कडेसारखी अथवा कमळफुलासारखी उमललेली होती. यामध्ये दोन हजार बथ#साधारण 40,000 लिटर पाणी मावत असे. 27मग हिरामने दहा पितळी चौरंग बनवले. प्रत्येक चौरंग चार हात लांब, चार हात रुंद आणि तीन हात उंच होते. 28चौरंग याप्रकारे बनविण्यात आले होते; त्यास पत्रे लावलेले होते आणि या पत्र्यास सभोवार कंगोरे होते. 29पितळी पत्रे आणि चौकट यांच्यावर सिंह, बैल व करुब देवदूत यांचे कोरीव काम होते. सिंह आणि बैल यांच्याखाली फुलांची वेलबुट्टी बसवलेली होती. 30प्रत्येक चौरंगाला पितळी धुऱ्यांवर पितळेची चारचार चाके लावलेली होती आणि चारही कोपऱ्यातून प्रशस्त घंगाळासाठी पितळी आधार दिलेले होते. त्यावरही फुलांचे सुबक काम केलेले होते. 31कळसाच्या आतल्या बाजूपासून वरपर्यंत त्याचे तोंड एक हात उंच होते हे तोंड बैठकीसारखे असून त्याचा व्यास दीड हात होता, त्यावर काही कोरीव काम होते, त्याच्या पट्टया गोल नसून चौकोनी होत्या. 32चारही चाके पट्यांच्या खाली होती व प्रत्येक चाकाच्या धुऱ्या तळाशी जोडल्या होत्या, त्या प्रत्येक चाकाची उंची दीड हात होती. 33रथाच्या चाकांसारखी ही चाके होती. आणि त्याच्या धुऱ्या धावा, आरे आणि तुंबे असे सर्वकाही ओतीव पितळेचे होते. 34प्रत्येक चौरंगाच्या चारही कोपऱ्यांना आधार दिलेले होते. तेही एकसंध होते. 35प्रत्येक चौरंगावर अर्धा हात उंच गोलाकार झाकण होते, व त्या झाकणाचे टेकावे व त्याच्या पट्टया ही चौरंगाशी अंखड होत्या. 36चौरंगाची बाहेरची बाजू आणि चौकट यांच्यावर करुब देवदूत, सिंह, खजूरीची झाडे यांचे कोरीव काम पितळेचे केलेले होते. ही नक्षी अगदी भरगच्च असून त्यामध्ये कुठेही मोकळी जागा नव्हती. शिवाय भोवताली फुलांची नक्षी होती. 37हिरामने अशाप्रकारे अगदी एकसारखे एक असे दहा पितळी चौरंग घडवले. हे सर्व ओतीव काम होते त्यामुळे ते तंतोतंत एकसारखे होते. 38हिरामने अशीच दहा गंगाळे केली. ती या दहा चौरंगासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे होती. प्रत्येक गंगाळाचा व्यास चार हात होतो. त्यामध्ये चाळीस बथ #साधारण 800 लिटरपाणी मावू शकत असे. 39त्याने पाच बैठकी मंदिराच्या उत्तरेला आणि दक्षिणेला पाच व गंगाळसागर मंदिराच्या उजवीकडे पूर्व दिशेला ठेवल्या. 40याखेरीज हिरामने वाडगी, पावडी, लहान गंगाळे बनवली. शलमोन राजाने सांगितले ते सर्व हिरामने केले. परमेश्वराच्या मंदिरासाठी हिरामने ज्या वस्तू घडवल्या 41त्यांची यादी पुढीलप्रमाणे: दोन स्तंभ स्तंभाच्या कळसांवर बसवायच्या दोन घुमट्या त्यांच्या भोवतीच्या दोन जाळ्या 42या दोन जाळ्यांसाठी चारशे नक्षीदार डाळिंबे तयार केली खांबाच्या शेंडयावरील प्याल्याच्या आकाराचे कळसाचे भाग झाकावयाच्या जाळ्यासाठी या डाळींबाच्या दोन-दोन रांगा होत्या. 43दहा चौंरग व त्यांच्यावरील दहा गंगाळे, 44एक गंगाळसागर व त्याच्याखालचे बारा बैल; 45याखेरीज हंडे, पातेली, पावडी अशी परमेश्वराच्या मंदिरासाठी वेगवेगळी पात्रे शलमोन राजाच्या इच्छेखातर हिरामने बनवले. ते सर्व लखलखीत पितळेच होते. 46सुक्कोथ आणि सारतान यांच्यामध्ये यार्देन नदीच्या तीरावर असलेल्या मैदानावर शलमोन राजाने हे काम करायला सांगितले. पितळ वितळवून मातीच्या साच्यात हे ओतकाम करण्यात आले. 47या सगळ्यासाठी किती पितळ लागले ते शलमोन राजाने बघितले नाही. वजन करायचे म्हटले तरी ते खूपच होते. त्यामुळे या सर्व वस्तूंचे नक्की वजन कधीच माहीत झाले नाही. 48शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरासाठी सोन्याच्याही कितीतरी वस्तू करवून घेतल्या. त्या अशा: सोन्याचे मेज (देवाची सोन्याची वेदी समर्पित भाकर ठेवण्यासाठी) 49शुद्ध सोन्याच्या समया. (या परमपवित्र गाभाऱ्यासमोर उजवीडावीकडे पाच पाच लावलेल्या होत्या) सोन्याची फुले, दिवे आणि चिमटे ही सोन्याची करवली होती. 50पेले, कातरी, कटोरे, चमचे व धूपदाने ही शुद्ध सोन्याची करवली होती; तसेच मंदिराचा आतील भाग म्हणजे परमपवित्रस्थान यांचे दरवाजे व पवित्रस्थानाच्या दाराच्या बिजागऱ्या सोन्याच्या बनवल्या होत्या. 51परमेश्वराच्या मंदिराचे हे काम शलमोन राजाने स्वत:च्या हाती घेतले ते संपवले. मग आपले वडिल दावीद यांनी समर्पिलेले सोने, चांदी व पात्रे ही शलमोनाने आत आणून परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारात ठेवली.
सध्या निवडलेले:
1 राजे 7: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.