1 राजे 8
8
शलमोन मंदिरात कोश आणतो
2 इति. 5:2-6:2
1इस्राएलमधील सगळी वडिलधारी मंडळी, सर्व घराण्यांचे प्रमुख आणि वंशातील मुख्य यांना राजा शलमोनाने आपल्याबरोबर यरूशलेम येथे यायला सांगितले. दावीद नगरातून म्हणजे सियोनेतून वरती परमेश्वराच्या कराराचा कोश मंदिरात आणण्यासाठी त्यांना त्याने बोलावले. 2तेव्हा इस्राएलाची सर्व मंडळी शलमोन राजासमोर एकत्र आली. तेव्हा एथानीम हा वर्षाचा सातवा सनाचा माहिना चालू होता. 3इस्राएलची सर्व वडिलधारी मंडळी एकत्र जमली. मग याजकांनी परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश उचलला. 4त्याबरोबरच दर्शनमंडप, परमेश्वराचा कोश, तेथील सर्व पवित्र पात्रे लेवींनी व याजकांनी वरती वाहून नेली. 5राजा शलमोन व इस्राएलचे सर्व लोक कराराच्या कोशासमोर आले. तेथे त्यांनी अनेक बली अर्पण केले. तेथे त्यांनी इतकी गुरे मेंढरे अर्पिली की त्यांची मोजदाद करता येणे शक्य नव्हते. 6मग याजकांनी परमेश्वराचा तो कराराचा कोश आतल्या दालनात ठेवला. मंदिरातील परमपवित्र गाभाऱ्याच्या आत करुबांच्या पंखाखाली तो ठेवला. 7करुबांचे पंख पवित्र कराराच्या कोशावर पसरलेले होते. कोश आणि त्याचे दांडे पंखांनी झाकलेले होते. 8हे दांडे इतके लांब होते की परमपवित्र गाभाऱ्यापुढच्या भागात उभे राहणाऱ्यालाही त्यांची टोके दिसत. बाहेरुन पाहणाऱ्याला मात्र ती दिसत नसत. हे दांडे अजूनही तेथे आहेत. 9कराराच्या कोशाच्या आत दोन पाट्या होत्या. होरेब येथे मोशेने हे पेटीच्या आता ठेवले होते. इस्राएली लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर होरेब या ठिकाणी परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार केला होता. 10परमपवित्र गाभाऱ्यात पवित्र कराराचा कोश ठेवल्यावर याजक तेथून बाहेर पडले, त्याबरोबर परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले. 11परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेले, व मेघामुळे याजकांना उभे राहता येईना.
12तेव्हा शलमोन म्हणाला,
“परमेश्वर म्हणाला आहे की,
मी निबीड अंधारात वस्ती करीन.
मंदिराचे समर्पण
13परंतु तुला युगानुयूग राहण्यासाठी,
हे मंदिर मी तुझ्यासाठी बांधले आहे.”
14इस्राएल लोकांकडे वळून राजाने त्यांना आशीर्वाद दिला, तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहीली. 15तो म्हणाला, “इस्राएलाचा परमेश्वर देव धन्य असो! माझे वडिल दावीद यांना म्हटल्याप्रमाणे त्याने स्वत:च्या हाताने ते पूर्ण केले परमेश्वर माझ्या वडिलांना म्हणाला, 16माझ्या इस्राएली प्रजेला मी मिसरमधून बाहेर आणले. पण या वंशातील कुठलेही नगर मी अजून माझे नाव राखण्यासाठी माझे मंदिर उभारण्यासाठी निवडले नाही. तसेच इस्राएल लोकांचा नेता म्हणून अजून कोणाची निवड केली नाही. पण आता माझा जेथे सन्मान होईल असे यरूशलेम हे नगर मी निवडले आहे, आणि इस्राएल लोकांचा अधिपती म्हणून मी दाविदाची निवड केली आहे.” 17इस्राएलाच्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ मंदिर बांधावे असे, माझे वडिल दावीद यांच्या फार मनात होते. 18पण परमेश्वर माझे वडिल दावीद यांना म्हणाला, “माझ्या नामासाठी मंदिर उभारण्याची तुझ्या मनातील इच्छा मी जाणून आहे, अशी इच्छा तू बाळगलीस ते चांगले आहे. 19पण तुझ्या हस्ते हे मंदिराचे काम होणार नाही, तर तुझ्या पोटी जो पुत्र होईल तो माझ्या नामासाठी हे मंदिर बांधील. 20परमेश्वर जे वचन बोलला ते त्याने खरे करून दाखवले आहे. आता माझे वडिल दावीद याच्या गादीवर मी आलो आहे. इस्राएलाच्या परमेश्वर देवासाठी हे मंदिरही मी बांधले आहे. 21त्यामध्ये पवित्र कराराच्या कोशासाठी एक जागा करवून घेतली आहे. त्या कोशामध्ये परमेश्वराने आपल्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले, तेव्हा केलेला तो करार यामध्ये आहे.”
22शलमोन परमेश्वराच्या वेदीपुढे उभा राहिला व इस्राएलाच्या सर्व मंडळीसमोर दोन्ही हात आकाशाच्या दिशेने पसरले, 23तो म्हणाला, हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, तुजसमान दुसरा कोणी आकाशात किंवा पृथ्वीतलावर नाही. तू हा करार केलास, कारण तुझे आमच्यावर प्रेम आहे. तू आपला करार पाळतोस, जे सेवक तू दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याविषयी तू दयाळू आणि एकनिष्ठ असतोस. 24माझे वडिल दावीद या आपल्या सेवकाला तू वचन दिलेस, आणि ते खरे करून दाखवलेस. आपल्या मुखाने तू वचन दिलेस आणि तुझ्याच हाताने ते पूर्ण केले आहे; अशी आज वस्तुस्थिती आहे. 25माझ्या वडिलांना दिलेली इतर वचनेही हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, तू खरी करून दाखव तू म्हणाला होतास, दावीद, तुझ्याप्रमाणेच तुझ्या मुलांनीही माझा मार्ग अनुसरला, तर तुमच्या घराण्यातील पुरूषांची परंपरा कधीही खुंटावयाची नाही, एकजण नेहमी इस्राएलाच्या राजासनावर राहील. 26परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, हा माझे वडिल दाविदाला दिलेला शब्दही खरा ठरु दे अशी माझी प्रार्थना आहे. 27पण परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीवर राहशील का? हे विस्तीर्ण आकाश आणि स्वर्ग यातही तू मावत नाहीस. तेव्हा हे मी बांधलेले मंदिरही तुझ्यासाठी कसे पुरेल! 28पण कृपाकरून माझी प्रार्थना व कळकळीची विनंती ऐक. मी तुझा सेवक आणि तू माझा परमेश्वर देव आहेस. आजची ही माझी प्रार्थना ऐक.
29माझ्या नावाचा निवास याठिकाणी होईल, असे ज्या ठिकाणाविषयी तू म्हटले त्या या ठिकाणाकडे रात्रंदिवस या मंदिराकडे तुझी दृष्टी असू दे, जी प्रार्थना तुझा सेवक या स्थळाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक. 30परमेश्वरा, इस्राएलाचे सर्व लोक आणि मी इथे येऊन तुझी प्रार्थना करू तेव्हा त्या प्रार्थना ऐक. तुझे वास्तव्य स्वर्गात आहे हे आम्हास माहित आहे. तेथे त्या तुझ्या कानावर पडो आणि तू आम्हास क्षमा कर. 31जर एखादया व्यक्तीने आपल्या शेजाऱ्याविरूद्ध काही अपराध केल्यास त्यास शपथ घ्यावयास लावल्यास व या तुझ्या वेदीसमोर घेतली. 32तेव्हा ती तू स्वर्गातून ऐकून निवाडा कर. जर तो अपराधी असेल तर त्यास त्याप्रमाणे शिक्षा कर. आपल्या सेवकाचा न्याय करून दुष्टास दुष्ट ठरव व त्याची कृत्ये त्याच्या माथी येवो आणि धार्मिकास निर्दोष ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्यास बक्षिस देऊन त्याचे समर्थन कर. 33जेव्हा इस्राएल लोकांचा तुझ्याविरूद्धच्या पापामुळे शत्रूंच्या हातून पराभव होईल व ते त्यांच्या पापापासून मागे फिरतील, तुझ्या नावाने पश्चाताप करतील, प्रार्थना विनंती करून या मंदिरात क्षमा मागतील; 34तेव्हा स्वर्गातून तू त्यांचे ऐक, तुझे लोक इस्राएल यांच्या पापाची क्षमा कर आणि जो देश तू त्यांच्या पूर्वजांना देऊ केला त्यामध्ये त्यांना तू परत आण. 35त्यांनी तुझ्याविरूद्ध पाप केल्यामुळे आकाशकपाटे बंद झाली व पाऊस पडला नाही. तेव्हा ते जर या ठिकाणाकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील व तुझे नाव कबूल करतील व तू दीन केल्यामुळे तुझ्याकडे वळतील, 36तेव्हा स्वर्गातून इस्राएली लोक व तुझे सेवक त्यांची विनवणी ऐकून त्यांच्या पापांची क्षमा कर. त्यांना योग्य मार्गाने चालायला शिकव, आणि परमेश्वरा, तू त्यांना वतन म्हणून दिलेल्या भूमीवर पाऊस पडू दे. 37कधी जमीन ओसाड होऊन त्यावर कोणतेही पीक येणार नाही, किंवा एखादा साथीचा रोग पसरेल. कधी टोळधाड, भेरड, घुली येऊन सगळे पीक फस्त करतील. कधी शत्रूच्या हल्ल्याला काही ठिकाणचे लोक बळी पडतील, किंवा एखाद्या दुखण्याने लोक हैराण होतील. 38असे कधी झाल्यास, एकाने जरी आपल्या पापाची कबुली दिली किंवा सर्व इस्राएली लोकांनी आपल्या जीवाला होणारा त्रास ओळखून मंदिराकडे हात पसरुन क्षमा याचना करतील. 39तर त्यांची प्रार्थना स्वर्गातून ऐकून त्यांना क्षमा कर आणि कृती कर. लोकांच्या मनात काय आहे हे फक्त तूच जाणतोस. तेव्हा प्रत्येकाचा योग्य न्यायनिवाडा कर. 40आमच्या पूर्वजांना तू जी भूमी दिलीस तिथे लोकांनी त्यांचे वास्तव्य तिथे असेपर्यंत तुझा आदर ठेवून व भय धरुन रहावे म्हणून एवढे कर. 41इस्राएली लोकांशिवाय तुझ्या नावासाठी परदेशाहून कोणी आला, 42कारण तुझे महान नाव बलशाली हात व पुढे केलेला बाहू ही सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच, व त्यांनी या मंदिराकडे येऊन प्रार्थना केली, 43तर तू स्वर्गातून त्यांचीही प्रार्थना ऐक. त्यांच्या मनासारखे कर. म्हणजे इस्राएली लोकांप्रमाणेच या लोकांसही तुझ्याबद्दल भय आणि आदर वाटेल. तुझ्या सन्मानार्थ हे मंदिर मी बांधले आहे हे मग सर्व लोकांस कळेल. 44परमेश्वरा, कधी तू आपल्या लोकांस शत्रूवर चढाई करायचा आदेश देशील. तेव्हा तुझे लोक तू निवडलेल्या या नगराकडे आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या मंदिराकडे वळतील. आणि ते तुझ्याकडे प्रार्थना करतील. 45तेव्हा तू आपल्या स्वर्गातून त्यांची प्रार्थना विंनती ऐक आणि त्यांना मदत कर. 46जर लोकांच्या हातून तुझ्याविरूद्ध काही पाप घडले, (कारण पाप करत नाही असा कोणीच नाही) अशावेळी त्यांच्यावर संतापून तू त्यांचा शत्रूकडून पराभव करवशील. शत्रू मग त्यांना कैदी करून दूरदेशी नेतील. 47तर बंदी करून नेलेल्या देशात गेल्यावर मग हे लोक झाल्या गोष्टी विचारात घेतील. त्यांना आपल्या पापांचा पश्चाताप करतील तुझ्याकडून दयेची अपेक्षा करतील आणि ते प्रार्थना करतील, आम्ही चुकलो, आमच्या हातून दुष्टाई घडली अशी ते कबुली देतील. 48बंदी करून नेलेल्या शत्रुंच्या देशात असताना ते जर अंत:करणपूर्वक तुझ्याकडे वळले आणि तू त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीच्या दिशेने, तू निवडलेल्या या नगराच्या दिशेने आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने त्यांनी प्रार्थना केली तर 49तू ती आपल्या स्वर्गातील ठिकाणाहून त्यांची प्रार्थना व विनंती ऐक व त्यांस न्याय दे. 50त्यांच्या सर्व पापांची क्षमा कर. तुझ्याविरुध्द पाप केल्याबद्दल त्यांना क्षमा कर. त्यांच्या शत्रूसमोर त्यांच्या वर दया दाखव, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील, 51ते तुझे लोक आहेत हे आठव तू त्यांना मिसरमधून बाहेर आणलेस जसे काही लोखंड वितळविण्याचा तापलेल्या भट्टीतून बाहेर काढले हेच तुझे वतन होत. 52“तर तुझे डोळे तुझ्या सेवकाच्या विनंतीकडे व तुझ्या या इस्राएल लोकांची प्रार्थना कृपाकरून ऐक, ते तुझा धावा करतील त्यांच्या हाकेला प्रतिसाद दे. 53प्रभू परमेश्वरा, पृथ्वीतलावरील सर्व मनुष्यांमधून निवड करून तू यांना वेगळे केले आहेस. तू तुझे अभिवचन दिले आहेस. त्यानुसार हे लोक तुझे वतन व्हावे म्हणून मिसरमधून तू आमच्या पूर्वजांना बाहेर नेलेस तेव्हा आपला सेवक मोशे याच्याकडून हे कार्य करवून घेतलेस.” 54शलमोनाने आकाशाकडे हात पसरून व परमेश्वराच्या वेदीसमोर गुडघे टेकून ही सर्व प्रार्थना व विनवणी परमेश्वरास करण्याचे संपवल्यावर तो तेथून उठला. 55मग त्याने इस्राएल लोकांस उभे राहून उंच आवाजात आशीर्वाद दिला, तो म्हणाला. 56“परमेश्वराचे स्तवन करा. इस्राएल लोकांस विसावा देण्याचे त्याने कबूल केले होते. त्याप्रमाणे त्यांने केले आहे. आपला सेवक मोशे याच्यामार्फत वचने दिली होती. त्यापैकी एकही शब्द वाया गेला नाही. 57आपल्या पूर्वजांना आपला देव परमेश्वर याने जशी साथ दिली तशीच तो पुढे आपल्यालाही देवो. त्याने आम्हास कधी सोडू नये व कधी त्यागू नये. 58आम्ही त्यास अनुसरावे. त्याच्या मार्गाने जावे. म्हणजेच आपल्या पूर्वंजांना त्याने दिलेल्या आज्ञा, सर्व नियम, निर्णय यांचे आम्ही पालन करावे. 59आजची माझी प्रार्थना आणि माझे मागणे परमेश्वर सतत लक्षात ठेवो. हा राजा त्याचा सेवक आहे. त्याच्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी त्याने एवढे करावे. एकदिवसही त्यामध्ये खंड पडू देऊ नये. 60परमेश्वराने एवढे केले तर हा एकच खरा देव आहे हे जगभरच्या लोकांस कळेल त्याच्याशिवाय दुसरा देव नाही. 61तुम्ही सर्वांनीही आपल्या परमेश्वर देवाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक असले पाहिजे. त्याच्या सर्व आज्ञा आणि नियम यांचे पालन केले पाहिजे. आत्ताप्रमाणेच पुढेही हे सर्व चालू ठेवले पाहिजे.” 62मग राजासहीत सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरासमोर यज्ञबली अर्पण केले. 63शलमोनाने बावीस हजार गुरे आणि एक लाख वीस हजार मेंढरे बली अर्पिली. ही शांत्यर्पणासाठी होती. अशाप्रकारे राजा आणि इस्राएल लोकांनी मंदिर परमेश्वरास अर्पण केले. 64मंदिरा समोरचे अंगणही राजा शलमोनाने त्यादिवशी अर्पण केले. त्याने तेथे होमबली, धान्य आणि आधी शांत्यर्पणासाठी अर्पण केलेल्या जनावरांची चरबी हे सर्व तेथे अर्पण केले. परमेश्वरापुढील पितळेची वेदी त्या मानाने लहान असल्यामुळे त्याने हे अंगणात केले. 65शलमोनाने आणि त्याच्याबरोबर सर्वांनी त्यादिवशी मंदिरात उत्सव साजरा केला. हमाथ खिंडीपासून मिसरच्या सीमेपर्यंतच्या भागातील सर्व इस्राएल लोक तेथे हजर होते. हा समुदाय प्रचंड होता. सात दिवस त्यांनी परमेश्वराच्या सान्निध्यात खाण्यापिण्यात आणि मजेत घालवले. आणखी सात दिवस त्यांनी आपला मुक्काम लांबवला. अशाप्रकारे हा सोहळा चौदा दिवस चालला. 66नंतर शलमोनाने सर्वांना घरोघरी परतायला सांगितले. राजाला धन्यवाद देऊन, त्याचा निरोप घेऊन सर्वजण परतले. परमेश्वराचा सेवक दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक यांचे परमेश्वराने कल्याण केले म्हणून ते आनंदात होते.
सध्या निवडलेले:
1 राजे 8: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.