जखर्या 4
4
दीपवृक्ष व जैतुनाची झाडे
1मग माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत माझ्याकडे पुन्हा आला व जसे झोपेतून एखाद्यास जागे करतात तसे त्याने मला जागे केले.
2त्याने मला विचारले, “तुझ्या दृष्टीस काय पडते?” मी म्हणालो, “माझ्या दृष्टीस असे पडते की, एक सबंध सोन्याचा दीपवृक्ष आहे, त्याच्या शिरावर एक कटोरा असून त्याला सात दिवे आहेत व त्याच्यावरील सात दिव्यांना सात नळ्या आहेत.
3आणि त्याच्याजवळ कटोर्याच्या उजव्या व डाव्या बाजूंना दोन जैतुनाची झाडे आहेत.”
4तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणार्या दिव्यदूताला मी विचारले, “माझ्या प्रभो, ही काय आहेत?
5माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, “ही काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय?” मी म्हणालो, “नाही, माझ्या स्वामी.”
6तेव्हा त्याने मला उत्तर केले, “जरूब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे : बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
7हे महान पर्वता, तू काय आहेस? जरूब्बाबेलपुढे तू सपाट मैदान होशील; व तो ‘त्यावर अनुग्रह, त्यावर अनुग्रह,’ असा गजर करत कोनशिला पुढे आणील.”
8मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे की,
9“जरूब्बाबेलच्या हातांनी ह्या मंदिराचा पाया घातला, त्याचेच हात ते बांधायचे पुरे करतील व सेनाधीश परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे तू समजशील.
10तर कार्याच्या अल्पारंभाचा दिवस कोणी तुच्छ मानतो काय? ते सात डोळे जरूब्बाबेलच्या हातातील ओळंबा आनंदाने पाहतील; ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात.”
11मग मी त्याला विचारले, “दीपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूंना ही दोन जैतुनाची झाडे आहेत ती काय?”
12दुसर्यांदा मी त्याला विचारले, “ह्या दोन सुवर्णाच्या तोट्यांजवळच्या सुवर्णरूप तेलाचा प्रवाह स्रवणार्या ह्या दोन जैतुनाच्या फांद्या काय आहेत?”
13त्याने मला म्हटले, “त्या काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय?” मी म्हटले, “नाही, माझ्या स्वामी.”
14तेव्हा त्याने म्हटले, “अखिल पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे राहणारे हे दोन अभिषिक्त आहेत.”
सध्या निवडलेले:
जखर्या 4: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.