रोमकरांस पत्र 12
12
नवीन जीवितक्रम
1म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
2देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.
आध्यात्मिक दानांचा योग्य उपयोग
3कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना.
4कारण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही,
5तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत.
6आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा;
7सेवा करताना सेवेत तत्पर असावे, शिकवणार्याने शिक्षण देण्यात,
8बोध करणार्याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणार्याने ते औदार्याने द्यावे, अधिकार्याने आपले काम आस्थेने करावे, दया करणार्याने ती संतोषाने करावी.
ख्रिस्ती जीवितक्रमाचे नियम
9प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्याला चिकटून राहा;
10बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसर्याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना.
11आस्थेविषयी मंद असू नका; आत्म्यात उत्सुक असा; प्रभूची सेवा करा;
12आशेने हर्षित व्हा; संकटात धीर धरा; प्रार्थनेत तत्पर राहा;
13पवित्र जनांच्या गरजा भागवा; आतिथ्य करण्यात तत्पर असा.
14तुमचा छळ करणार्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वादच द्या, शाप देऊ नका.
15आनंद करणार्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणार्यांबरोबर शोक करा.
16परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. स्वत:ला शहाणे समजू नका.
17वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा.
18शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा.
19प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,” असे प्रभू म्हणतो.
20उलटपक्षी, “तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे; तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखार्यांची रास करशील.”
21वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बर्याने वाइटाला जिंक.
सध्या निवडलेले:
रोमकरांस पत्र 12: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.