देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले.
स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले;
आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केली.
ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनांत असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले; असे की, त्यांच्या देहांची त्यांच्यात्यांच्यातच विटंबना व्हावी.
त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली, आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मित वस्तूंची भक्ती व सेवा केली; तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन.
ह्या कारणांमुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले.
तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठायी भोगले.
आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.
सर्व प्रकारची अनीती, जारकर्म, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा ह्यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी ह्यांनी पुरेपूर भरलेले होते.
ते चहाडखोर, निंदक, देवाचा तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बढाईखोर, कुकर्मकल्पक, मातापितरांची अवज्ञा करणारे,
निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते.
जे ह्या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत, हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करत असतात; इतकेच केवळ नव्हे तर त्या करणार्यांना संमतीही देतात.