स्तोत्रसंहिता 79
79
यरुशलेमेच्या नाशामुळे विलाप
आसाफाचे स्तोत्र.
1हे देवा, तुझ्या वतनात परराष्ट्रे शिरली आहेत; त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे; त्यांनी यरुशलेमेचे ढिगारे केले आहेत.
2त्यांनी आकाशातल्या पाखरांना तुझ्या सेवकांची प्रेते, व पृथ्वीवरील पशूंना तुझ्या भक्तांचे मांस खाण्यास दिले आहे.
3त्यांनी यरुशलेमेभोवती त्यांचे रक्त पाण्यासारखे वाहवले; त्यांना पुरण्यास कोणी राहिले नाही.
4आम्ही आमच्या शेजार्यांना निंदास्पद आणि आमच्या सभोवतालच्या लोकांना तुच्छ व हास्यास्पद झालो आहोत.
5हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्वकाळ कोपायमान राहणार काय? तुझा रोष अग्नीसारखा भडकत राहणार काय?
6जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, जी राज्ये तुझे नाव घेऊन धावा करीत नाहीत, त्यांच्यावर तू आपल्या क्रोधाचा मारा कर.
7कारण त्यांनी याकोब वंशाला गिळून टाकले आहे, व त्यांची वस्ती ओसाड केली आहे.
8आमच्याविरुद्ध आमच्या पूर्वजांची दुष्कर्मे आठवू नकोस; तुझी करुणा आमच्यावर सत्वर होवो; कारण आम्ही फार दुर्दशेत पडलो आहोत.
9हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या महिम्यासाठी आम्हांला साहाय्य कर; आपल्या नावासाठी आम्हांला सोडव व आमची पातके धुऊन टाक.
10“ह्यांचा देव कोठे आहे,” असे राष्ट्रांनी का म्हणावे? तुझ्या सेवकांचा रक्तपात झाला त्याबद्दल सूड उगवण्यात आला आहे, हे आमच्यादेखत राष्ट्रांना कळू दे.
11बंदिवानांचे कण्हणे तुझ्या कानी येवो; ज्यांचा वध करण्याचे ठरले आहे त्यांना तू आपल्या बाहुबलाने वाचव.
12हे प्रभू, आमच्या शेजार्यांनी केलेली तुझी निंदा उलट त्यांच्या पदरी सातपटीने घाल.
13मग जे आम्ही तुझी प्रजा व तुझ्या कुरणातली मेंढरे, ते आम्ही सर्वकाळ तुझे उपकारस्मरण करीत राहू; तुझी कीर्ती पिढ्यानपिढ्या वर्णन करीत जाऊ.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 79: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.